आई वडील ‘ती’ आणि ‘तो’

प्रेम करणं म्हणजे गुन्हा आहे असा तुमच्या मनाचा समज असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे.

साधारणपणे २० व्या शतकात म्हणजेच आजपासून ५० वर्षांपूर्वी प्रेम करणं म्हणजे घोर पाप असे मानले जायचे. आज पाहायला गेलात तर अतिशय साधारण बाब बनली आहे. पण त्यातही अजूनही प्रेम म्हणजे घोर पाप आहे असं समजले जाण्याची काहींची मानसिकता आहे.

आपल्या मुलीने बाहेर प्रेम प्रकरण न करता आपल्या जातीतील आणि परिचयातील अथवा समाजातील व्यक्तीशीच विवाह करावा असे या पालकांना वाटत असते. त्यामुळे अश्या पाल्यांच्या मुली देखील आपल्या आई वडिलांच्या मान सन्मानासाठी प्रेम करण्यापासून चार हात लांब राहतात आणि घरच्यांच्या संमतीने लग्न करतात. त्यांना असे वाटते की घरच्यांचं नाक न कापता त्यांची मान ताठ रहावी.

खैरेवाडीची ही एक लहान पण मोठी वैचारिक गोष्ट. दोन लहानपणीच्या मैत्रिणी कोमल आणि जुलिशा. एकत्रितपणे शाळा कॉलेज शिकून मोठे झाल्या. मात्र जेव्हा कॉलेजची पायरी चढले त्यावेळी दोघीही प्रेमाच्या विरहात बुडून गेल्या.

कोमलच्या आयुष्यात आदित्य तर जुलिशाच्या आयुष्यात आकाशने घर केले होते. तसे दोघींच्याही घरचे प्रेम विवाहाच्या विरोधात होते. पुढे काही वर्षे अशीच शिक्षणात जात जोती. आणि हळूहळू सर्वांचे शिक्षण पूर्ण होऊन चौघेही चांगले नोकरीला लागले होते.

कोमल आणि जुलीशाच्या घरी लग्नाची बोलणी सुरू होती. कोमलने आदित्य विषयी सर्व काही घरी सांगून दिले होते. अगोदर घरच्यांनी प्रचंड विरोध दाखवला. मात्र या नंतर आदित्य बाबत कोमलच्या घरच्यांनी सर्व माहिती घ्यायला सुरुवात केली. आदित्य एका चांगल्या घरातील, सुसंस्कारि व चांगल्या हुद्द्यावर नोकरी करणारा युवक असल्याने घरच्यांनी या लग्नाला मान्यता दिली आणि कोमल आदित्यच्या प्रेमाचे लग्नात रूपांतर झाले.

कोमलच्या प्रेम विवाहामुळे जुलिशाच्या घरचे नाक मुरडत होते. त्यामुळे जुलिशा आकाश बद्दल घरात बोलण्यास घाबरत होती. ती आकाशला वेगळे होण्यासाठी समजावत होती.

अशाच एका एकांताच्या ठिकाणी दोघे बोलण्यासाठी भेटतात

“जुली तू एक प्रयत्न तर कर यार. आदित्य कोमलने समजावले ना तुला. तू प्रयत्न कर. आपले प्रेम आहे एकमेकांवर” भिजल्या डोळ्यांनी आकाश तिला विनवणी करत होता.

“आकाश… माझ्या घरचे या सर्वाला विरोधात आहेत रे. त्यांना ही सगळी फालतूगिरी वाटते रे. हे शक्यच नाही” जुलिशाही रडून सांगत होती.

“अग पण वाईट काय आहे माझ्यात ? तुझ्या शिवाय कधी कुणाचा विचार तरी केला का मी ? घरच्यांचा आदर करतो, वडील धाऱ्यांचा मान राखतो, चांगला सुशिक्षित आणि नोकरीला पण आहे ? कुठे कमी पडतोय मी ?” आकाश तिचा हात हातात घेऊन विचारत होता.

“नाही तू कमी नाही रे कुठेच. पण प्रेम विवाह ही पद्धतच मुळात माझ्या घरच्यांना नकोय. त्यांची बेइज्जती होईल गावात. माफ कर पण मला माझ्या आई वडिलांचा विचार आहे. आणि मी आधीपासूनच म्हणत आले की लग्ना बाबत मी तुला कोणताही शब्द नाही देऊ शकत” जुलिशा आपल्या पद्धतीने त्याला समजवत होती.

“जुलिशा एक प्रयत्न कर ग. कोमलच्या घरी काय वेगळं होत? बघतेस ना सहा महिने झाले किती छान सुरुये” आकाश तिला जवळ घेऊन बोलू लागला.

“प्लिज आकाश… मी माझ्या घरच्यांना समजवेल एवढी डेरिंग नाय माझ्यात. तू प्लिज समजून घे आणि इथेच थांब” रुमालाने स्वतःचे डोळे पुसत जुलिशा म्हणाली.

“जुलिशा… तू एकदा हिंमत दाखव ग फक्त. नायतर मी भेटतो तुझ्या वडिलांना.” आकाश स्वतः तिच्या जवळ जाऊन बोलला.

“आकाश तू असे काही करणार नाहीस. माझी शपथ आहे तुला” जुलीशाने त्याचा हात डोक्यावर ठेवला.

“जुलिशा… तू हे चुकीचं केलंस. ठीक आहे प्रेमा खातर मी तुझी शपथ मोडणार नाही. पण एक लक्षात ठेव. या जीवनात तू नाही तर कोणी नाही. आजन्म एकटाच राहील” असे म्हणत आकाश तिथून निघणार तोच जुलिशाचा भाऊ जयवंत समोर आला. त्याला पाहताच आकाश घाबरला. मात्र जयवंत जागेवर उभा असल्याने आकाश त्याच्या बाजूने निघून गेला. आकाश निघून जाताच जुलिशा पुरती घाबरली.

“दादा…. ते…. तो… माझा कॉलेजचा मित्र… आम्ही ते बोलायला भेटलो इथे… एक डिस्कशन…” पैलवान असलेल्या धिप्पाड भावा समोर उभा राहून जुलिशाची पाचावर धारण बसत नव्हती. तिला काय बोलावे सुचेना. ती रुमालाने डोळे आणि चेहरा पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली. जयवंतने तसेच तिच्या हाताला धरून जीपमध्ये बसवले आणि घरा कडची वाट धरली.

गाडी रस्त्यातून पुढे आली आणि गावात घुसण्या ऐवजी त्याने सरळ नेली.

“दादा… आपण कुठे जातोय?” दबक्या आवाजात जुलिशाने प्रश्न केला.

मात्र जयवंत काही बोलला नाही. गाडी आकाशच्या गावाच्या दिशेने निघालेली पाहून जुलिशा घाबरली.

“दादा अरे तू मला सांग ना काय करतोयस ? प्लिज चल घरी दादा” जुलिशा रडू लागली.

जयवंत तिच्याकडे न पाहता काहीही न बोलता शांतपणे जीप चालवत होता. पाहता पाहता आकाशचे गाव आले आणि जीप त्याचे गाव सोडूनही पूढे निघाली. आधी आकाशला मारहाण होईल असे वाटत असताना दादा आता गाडी कुठे घेऊन चाललाय हे तिला कळेना.

काही वेळा नंतर एका गावातील वाडीत जयवंतने गाडी नेली आणि एका घरा समोर उभी केली. जयवंत गाडीतून उतरला तसे जुलिशाही त्याच्या मागे गेली.

“हे कुणाचं घर आहे दादा ? मला इथे का आणलं आहेस ?” जुलिशा विचारू लागली.

जयवंतने तिचा हात धरला आणि तिला घरात नेले. घरातील हॉल मध्ये एक फोटो लावला होता. त्यासमोर दोघेही उभे राहिले.

“दादा काय तरी बोल… कोण आहे ही ? मला का आणलेस इथे” जुलिशा फोटो कडे पाहून गोंधळून बोलली.

“वैष्णवी….” जयवंतच्या तोंडून पहिल्यांदा शब्द फुटले.

“वैष्णवी ??? कोण आहे ही ? मला काय कळेना दादा.” जुलिशाला काही सुचेना.

“माझी पोरगी आहे ती. माझी एकुलती एक लेक” पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने उत्तर दिले.

तसे जुलिशा मागे वळली. जयवंतची नजर मात्र फोटोवरून हटत नव्हती.

“मी गणपत ढोले पाटील… या गावचा पोलीस पाटील. एके काळचा राजा माणूस. आज पण पैशाने रुबाबाने राजाच आहे. पण पैसा असून हा राजा शेवटी भिकारीच आहे” असे म्हणून ती व्यक्ती ओसरीवर बसली. अंगात जॅकेट, खाली धोतर, डोक्यावर ऐटदार टोपी आणि चष्मा घालून तो व्यक्ती बसला होता.

“जुलिशा तुला काय वाटलं ? आकाश आणि तुझं प्रेम प्रकरण मला माहित नाही ? सगळं माहीत होतं मला. आज मुद्दाम तुमच्यातील बोलणं ऐकायला मी तिथे आलो होतो. पण तुमचं बोलणं ऐकून मला काय करावं कळेना. म्हणून तुला तुझ्या हातून नेमकं काय पाप घडतंय हे दाखवून द्यायला इथे आणलं” जयवंत बोलू लागला.

“दादा सॉरी पण आता मी तुम्ही सांगाल त्याच्याशी लग्न करणार आहे. मी आकाशला लग्नाचं वचन पण दिल नाही. आणि आमच्यात असं काही चुकीचं पण घडलं नाही कधी” जुलिशा बोलू लागली.

“जुलिशा तुला माहिती का हा फोटो कुणाचा आहे ते ?” जयवंतने पुन्हा तिचे लक्ष फोटोकडे वेधले.

“हा… या काकांची मुलगी आहे ना ती ? वारली ना” जुलिशा कुतूहलने बोलली.

“त्यांची मुलगी आहेच पण ही कदाचित तुझी वहिनी असती.” जयवंतच्या डोक्यात पाणी आले.

“काय दादा ??? तुझं हिच्या सोबत ?” जुलिशाला आश्चर्याचा धक्का बसला.

“होय… मघाशी तिथे आकाश बोलत होता… पण मला असं वाटत होतं की हा मीच आहे काय ? जो प्रेम मिळवण्यासाठी स्वतःचा जीव मारतोय. तो बाजूने गेला आणि मी बघतच राहिलो.” जयवंत ओसरीवर चालून बोलू लागला.

” पण दादा मग लग्न का नाही झालं?” जुलिशा विचारू लागली.

“माझ्यामुळे नाही झालं लग्न…” पाठीमागे बसलेल्या गणपत पाटलांनी बसल्या बसल्या खाली मान घालून उत्तर दिलं.

“म्हणजे काय काका ?” जुलिशा त्यांच्याकडे पाहून विचारू लागली.

“गावचा पाटील ना मी ? पाटलाला काळजी त्याच्या फेट्याची. माझा लेकीन मला कधी ही भानगड नाय कळू दिली. पण तुझा भाऊ जयवंतने एकदा स्वतः इथं येऊन माझ्या लेकीचा हात मागितला. गर्वाने माजलेला मी तुझ्या भावाला लाथा बुक्क्यांनी मारून घराबाहेर काढला. आणि त्याच लगीन सराईत लेकीच हात पिवळे करून लांबच्या गावी पाठवली. काय माज होता या पाटलाला. मिश्या ताणून गावात हिंडायचं म्हणजे जणू काय गावचा राजाच. पण एकुलत्या एका माझ्या लेकीच सुख नाय ओळखू शकलो. तिच्या काळजावर घाव करून तिला आमच्याच समाजातल्या एका तालेवार घरात दिली.” असे म्हणून गणपत पाटलांचे डोळे पाणावले.

“मग… पुढे काय झालं काका ?” जुलिशाने खाली बसून गणपत पाटलांच्या खांद्यावर हात ठेवून प्रश्न केला.

“जातीनी माझ्या पोरीची माती केली” असे म्हणत गणपतराव ढसा ढसा रडू लागले.

“काका… शांत व्हा… नक्की काय झालं ताई सोबत…” जुलिशा विचारू लागली.

“गळा दाबून मारून टाकलं तिच्या इज्जतदार नवऱ्याने.” जयवंतने पाठीमागून उत्तर दिले.

“दादा…… पण का ???” हे ऐकून जुलीशाला धक्का बसला.

“त्याला काय विचारते पोरी… या कमनशिबी बापाला विचार…” असे म्हणत ते आपले डोळे हाताने पुसू लागले.

“काका मला प्लिज नीट सांगा. मला काय कळेना. आधीच दादा इथे का घेऊन आला तेच समजेना” जुलिशा गोंधळून गेली.

“तिचा प्रेम विवाहाला विरोध करून जातीत लग्न लावून दिल. पण त्या सैतानानी माझ्या पोरीचं हाल हाल केलं. बापाची इज्जत राखावी म्हणून पोरगी एका शब्दाने बापाला काय बोलली नाही. वर्षभर संसार झाला आणि एका रात्रीत भाडखाऊ पक्का दारू पिऊन माझ्या लेकीला घाणघाण श्या देऊ लागला आई बापावरून. तिला काय ते ऐकवना. ती ओरडली त्याच्यव. त्या सैतानाने त्या दारूच्या नशेत कोयता फिरवला माझ्या बाळाच्या मानगुटीवरून…” गणपतराव ढसा ढसा रडू लागले.

“तळ हाताच्या फोडा सारखी जपली ग तिला. पण तीच सुख नाय ओळखु शकलो ग नाय ओळखू शकलो. असलं प्रेमाच लग्न लावावं तर गावात नाक कापलं जाईल वाटायचं. काय म्हणतील गावातली लोक ? असं वाटायचं. पण आज गणपत पाटील जेवलाय की मरून पडलाय घरात एक भाडखावं डोकवना गावातला माझ्याकडे. आणि यांचा विचार केला मी माझ्या पोरीसाठी” आपले दोन्ही हात फोटोकडे जोडून रडू लागले.

“आबा शांत व्हा… जे झालं ते झालं. आता ते बदलता येणार नाही. पण आपण दुसऱ्यांना पण बदलू शकतो ना.” असे म्हणत जयवंत ने गणपत पाटलांना सावरले.

“दादा तुला आता नेमकं काय म्हणायचं आहे?” जुलिशा त्याच्याकडे पाहत म्हणाली.

“सांगतो तुला… चल घरी..” असे म्हणत जयवंत जुलिशाला घेऊन घराकडे निघतो.

जयवंत जुलिशाच्या प्रेम प्रकरणा बद्दल घरात सर्व काही सांगून टाकतो. हे सर्व सांगितल्या नंतर त्याने त्याच्या प्रेम प्रकरणा बद्दल जे काही घडले ते ही त्याच्या घरात सांगितले. घरच्यांनी या गोष्टीवर खूप विचार केला आणि त्यांनी आकाशची माहितीही काढली. आकाश आपल्या व्यक्तीमत्वात कुठेच कमी पडत नव्हता. शिक्षण, नोकरी, घरदार या सर्वात त्याने स्वतःला घडवले असल्याने त्याला नाकारण्यासाठी प्रेम विवाह हेच एक कारण बनले होते. शेवटी सर्व बाजूने विचार केल्या नंतर कोमल आदित्य पाठोपाठ आकाश आणि जुलिशाचे प्रेम देखील विवाहात रुपांतरीत झाले.

आज शहरातील गाव खेड्यातील कित्येक पालक प्रेम विवाहाला अनेक कारण देऊन नाकारतात. कुणाची जात आडवी येते, कुणाची आर्थिक परिस्थिती तर इतर मतभेद. यामुळे जातीचा नादात कितीतरी मुलींचा आयुष्याची माती झाल्याचे नेहमी दबक्या कानांनी ऐकायाला मिळते. पण याचा अर्थ असा नाही की प्रेम विवाहच काय तो चांगला. बऱ्याचदा इथेही काही गोष्टी बदलतात. काही प्रेमविवाह देखील फसतात. त्यामुळे थेट परवानगी अथवा विरोध न करता काय योग्य आणि अयोग्य याची पारख करा आणि मगच आपल्या मुलीला योग्य घरात द्या. एक गोष्ट लक्षात घ्या. चार लोक काय म्हणतील हा विचार करू नका. ही चार लोक कधीच आपली नसतात. ना सुखात ना दुःखात. त्यामुळे आपल्या पुरता विचार करा, आपल्या लेकरांचा अगोदर विचार करा. लोकांना त्यांचा विचार करू देत. शेवटी चांगले केले तर जळणार आणि वाईट केले तर हसणार. ही चार लोक आहेच तशी.

समाप्त !!!

लेखन :- संतोष दिवाडकर

St. Mary’s High School कल्याणचा एसएससीमध्ये १००% निकाल

St. Mary’s High School :- दहावी बोर्ड परीक्षेत सेंट मेरी हायस्कूल, कल्याणचे विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करून आले आहेत. एसएससी बोर्ड परीक्षामध्ये 100℅ निकाल मिळविण्याची परंपरा कायम ठेवत, शाळेतील ssc च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेचा झेंडा फडकवत ठेवला आहे.

या वर्षी १९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ज्यात 24 विद्यार्थ्यांनी 90℅ आणि त्यावरील 107
विद्यार्थ्यांनी 75℅ गुण मिळवले आहेत. यात टॉपर्स आहेत साक्षी तांबे 95.60℅, श्रेया वंजारी.
95% आणि आर्यन साहू 94℅.

सेंट मेरीज हायस्कूलच्या प्राचार्या दिव्या बोरसे यांनी उत्कृष्ट निकालाबद्दल शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, “मला माझ्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांनी सर्वोत्तम प्रयत्न केल्याबद्दल मला खरोखर अभिमान आहे. हे सर्व त्यांचेच आहे परिश्रम आणि समर्पण ज्याचे फळ मिळाले. आर्य ग्लोबलचे चेअरमन भरत मलिक, नीलम मलिक, बिस्कुटे मॅडम यांनी सेंट मेरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संतोष दिवाडकर

St. Mary’s High School Kalyan 100% Result in SSC

आर्य गुरुकुल, कल्याण शाळेच्या एन.सी.सी.नेवल विंग छात्र सैनिकांचा CATC कॅम्प मध्ये डंका

कल्याण : आर्य गुरुकुल शाळेच्या एन.सी.सी. नेवल विंग छात्रसैनिकांचा वार्षिक प्रशिक्षण शिबीर क्रं ५३८ कॅम्प डी.ए.वि पब्लिक स्कुल, पनवेल येथे दि.२२ मे २०२३ ते ३१ मे २०२३ दरम्यान संपन्न झाला. सदर कॅम्प मध्ये शाळेचे २५ कॅडेट्स सहभागी झाले होते. या शिबिरात मुंबई ठाणे नाशिक येथील विविध नऊ शाळा आणि काही महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.

शिबिरादरम्यान विविध प्रकारच्या उपक्रम आणि स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. विद्यार्थी चित्रकला, रीले टग ऑफ वार, ड्रिल, डॉजबॉल इ. स्पर्धेमध्ये भाग घेऊन शाळेला विजेतेपद मिळवून दिले. आर्य गुरुकुलच्या नेवल छात्र सैनिकांनी ड्रील स्पर्धेत द्वितीय तसेच नवल एन.सी.सी. छात्रा अनुश्री अग्रे हिने उत्कृष्ट छात्रा सैनिक या प्रकारात स्वर्ण पदक मिळविले व सांस्कृतिक कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर आर्य गुरुकुल शाळेने व्हॉलीबॉल मध्ये द्वितीय पदक व रिले रेस मध्ये द्वितीय पदक मिळविले. तसेच केयुर पवार व नायजेल कुटिल यांना आदर्श सुत्रसंचालक म्हणून सन्मानित केले. या शिबिरात आर्.डि.सी कमानडऱ सीनियर कैडेट कॅप्टन मुन्ना चौधरी यांच्याशी एन.सी.सी. छात्रा सैनिकांना परस्पर संवाद साधता आला.

विद्यालयाच्या प्राचार्या राधामणी अय्यर यांनी शिबिरात सहभागी छात्रसैनिकांचे त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन आणि कौतुक केले. शाळेचे क्रीडा अधिकारी दीपक वर्मा तसेच माजी एअरफोर्स ऑफिसर आणि शाळेचे व्यवस्थापन अधिकारी अनुप नायर यांचे छात्रसैनिकांना शिबिरापुर्वी मार्गदर्शन लाभले होते. त्यांनीही सर्वांचे अभिनंदन केले. तसेच १ महा. नेवल एन.सी.सी.चे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन के.के. कुर्रा तसेच शिबिर प्रशिक्षक पेटी र्ऑफिसर अर्विन्द शाह यांनीही छात्रसैनिकांचे कौतुक केले. शाळेच्या एन.सी.सी.नेवल विंग थर्ड ऑफिसर भारती नरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.

संतोष दिवाडकर

Arya Gurukul, Kalyan School NCC Naval Wing Student Soldiers strike at CATC Camp

The Kerala story impact : हिंदू धर्मीय मुलीने मोडले नियोजित लग्न ?

The Kerala story impact : ‘द केरला स्टोरी’ हा लव जिहादवर आधारित असलेला चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाचे पडसाद देखील देशभरात उमटू लागलेले आहेत. तर धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही राज्यांनी या चित्रपटाला बॅन केले आहे. मात्र या चित्रपटामुळे काही मुलींनी आपले ठरलेले लग्न मोडल्याच्या पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागल्या आहेत.

फेसबुकच्या एका ग्रुपवर आलेल्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. हिंदू धर्मीय मुलीने नुकताच ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहून तरुणीने २३ मे रोजी होणारे आंतरधर्मीय नियोजित लग्न रुद्ध केले. असे या पोस्टमध्ये लिहण्यात आले आहे. सोबत या तरुणीचा एका कार्यालयातील पाठमोरा फोटो व एका नोटीशीचा फोटो शेअर केला गेला आहे. या मध्ये तरुणीची माहिती लपवण्यात आली आहे. समाज माध्यमांवरील ही पोस्ट असल्याने तिच्या सत्येतेची पुष्टी आम्ही करीत नाही.

व्हायरल केलेल्या पोस्ट नुसार हा प्रकार गुजरात राज्यातील वडोदरा जिल्ह्यातील आहे. स्पेशल मॅरेज कायद्यानुसार सदर हिंदू तरुणीचे साजिद नावाच्या २७ वर्षाच्या मुस्लिम व्यावसायिक तरुणाशी विवाह होणार होता. मात्र या तरुणीने चित्रपट पाहिल्या नंतर हे लग्नच रुद्ध केल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर कमावलेल्या पैशां पेक्षा मुलींचे जीव वाचवणे जास्त महत्त्वाचे असल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

संतोष दिवाडकर

The Kerala story impact : Hindu religious girl broke the arranged marriage?

https://www.facebook.com/groups/360609144576990/permalink/1246592649311964/?mibextid=Nif5oz

‘आजी’ एक वटवृक्ष अर्थात आधारवडाची सावली

आई …. दोनच शब्दात साऱ्या ब्रम्हांडाची ताकद सामावली आहे. देवाधिकातही आईला प्रथम स्थान आहे. जिच्यामुळे पाहिले हे सुंदर जग ती आई म्हणजे आपल्यासाठी पहिली देवी. आणि बाप हा देव. फक्त एका दिवसा पुरता गोड गोड बोलणे नव्हे तर आयुष्यभर तिच्या उपकाराची जाण ठेवणं म्हणजे जन्माचे सार्थक.

आजच्या या मातृ दिना निमित्त एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करतोय. जी नुकत्याच तीन महिन्यांपूर्वी घडली होती. ते सर्व प्रसंग आज मला सर्वांना सांगायचे आहेत ज्यांना ते माहीत नाहीत. ही गोष्ट माझ्या आईच्या आईची म्हणजेच माझ्या आजीची आहे.

आजी आणि आजोबांचे तरुण पणातील छायाचित्र

दिवाडकरांची लेक गोसाव्याची सून झाली आणि पोमगावच्या मारुती गोसावी यांच्याशी तिचा ७० च्या दशकात विवाह झाला. पहिली मुलगी म्हणजे माझी आई, त्या नंतर माझे मामा आणि मग माझ्या तीन मावश्या. अश्या चार बहिणी आणि एक भाऊ असे पाच मुलांचे संगोपन मोठ्या हलाखीत झाले. इतकेच नाहीतर विठ्ठल आणि लक्ष्मण गोसावी हे लहान दिर देखील पाठच्या भावा प्रमाणे होते. सासू आणि सासर्याचे हित पाहून तिने संसार नेटाचा केला.

आजीची सासू बबा बाई आणि माझी लहान मावशी

आजकाल सर्व सुखसोया आहेत. पण २० व्या शतकात खेडेगावात काय होत हो ? साधा रस्ता देखील शहराला जोडला नव्हता. जे काय दळणवळण असायचे ते धरणातून व्हायचे. मुळशी धरणातील लाँचेने गावखेडी जोडली गेली होती. पैसा तर बघण्यातच नसायचा. अश्या हलाखीच्या परिस्थितीत तिने सर्व मुलांना मोठे केले. आणि पुढे ज्याची त्याची लग्न होऊन संसार सुरू झाले.

आजी आजोबा सोबत आजोबांचे लहान भाऊ व भाऊजय

साधारणपणे २१ व्या शतकात परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. कुटुंब वाढली होती. सुखसोयी गावात पोहोचल्या होत्या. जुन्या लोकांना जुने दिवस आठवत होते. पण नव्या पिढीला मोबाईलच्या नेटवर्क पुढे जुन्या दिवसातील त्रास कळणारा नव्हता. माझ्या आजीने लहानपणा पासून लेक, लेकी, नातवंड असं सर्वांना जीव लावला. त्यामुळे तिची माया कुणी विसरणार नाही. आता मी त्या प्रसंगावर येतो जो मला सांगायचा आहे.

फेब्रुवारी महिन्यात माझ्या बहिणीचे लग्न होते. नातीचे लग्न म्हणून माझी आजी शिळीमला आमच्या गावी आली होती. तसं सुरुवातीला तिला सर्दी होती. पण जस जसे लग्नाचे काही दिवस जवळ आले तिच्या सर्दीचे रूपांतर कफ मध्ये झाले. तिच्या छातीत हळूहळू कफ वाढू लागला होता. लग्नाच्या दोन दिवस आधी तिला आम्ही जवणला असलेल्या डॉक्टर कडे नेले होते. त्या डॉक्टरने वाफ दिली आजी औषध गोळ्या देऊन नॉर्मल असल्याचे सांगितले. यानंतर आजीला दोन दिवस काहीसे बरे वाटत होते.

लगीन घर असल्याने जो तो आपल्या घाईत आणि तंद्रीत होता. कार्यक्रम, विशेष रसम, बांगड्या, मेहंदी, सामानाची आवरा आवर, अक्षता, मंडप, लायटिंग, साऊंड, गाणी, उटणे, असे सर्व रसम असल्याने फारसे लक्ष आजीकडे जात नव्हते. मुळात ही वेळ अशी असते की कोणता पाहुणा कुठे असतो हे देखील कुणाला माहीत नसते. आणि इतक्या गडबडीत मात्र आजीचा दम वाढू लागला. तसे दिसताना ती नॉर्मल वाटत होती. कारण जेवतेय, बसतेय असं सर्व दिसत होतं.

लग्नाच्या दिवशी आजी लग्नालाही आली. लग्न पाहीले आणि रात्री घरी आलो. आणि त्या रात्री तिला खूप जास्त त्रास झाला. त्या रात्री ती शिंदू मावशीच्या घरी झोपली होती. रात्रभर तिला श्वास घेता येत नव्हता. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की त्रास बळावला आहे. सकाळी तिने अंघोळ केली. थोडावेळ बसली आणि ती खाटेवर जाऊन झोपली. तिला प्रचंड दम लागला होता. कोणीतरी मला दवाखान्यात न्यावं असं तिला वाटत होतं. पण तिला जास्त बोलता येत नव्हते. मी, विकास, गणेश उशिरा उठलो होतो. आम्ही नाश्ता केला, पीक आप गाडी घेऊन मंडप वाल्याचे सामान पोहोचवले. दुपारचे जेवणही केले.

दुपारी कुंदा काकूने आजीची तब्येत पाहिली तेव्हा तिला जास्त त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तिला पुन्हा एकदा डॉक्टर कडे न्यावे लागेल असे वाटले. विकासने पिक अप काढली आणि आजीला पवना नगरला नेले. सोबत काकू आणि गणेश होता.

पवना नगरला डॉक्टरानी तपासल्यानंतर छातीत खूप कफ झाला असून न्यूमोनिया झाला असल्याचे सांगितले. शिवाय एडमीट करून ऑक्सिजन लावावे लागेल असे सांगितले. यानंतर तिला घेऊन गेलेल्यांना तिची तब्येत खालावली असल्याचे समजून आले. यानंतर घरी फोन आला. घरी फोन आल्यानंतर वातावरण देखील बदलले. मी पटकन फोन करून माझ्या मित्राची गाडी बोलवली. पप्पा, रंगनाथ काका, आणि सुरेखा असे तिघे जण त्या गाडीतून कामशेतला निघाले.

कामशेत मधील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात आजीवर उपचार सुरू झाले. आता घरात माझी आई, सुरेखा मावशी दोघेही चिंता करीत होते. बाळू मामा आणि बापू दोघेही बाईक घेऊन पोमगावला डॉक्युमेंट आणायला गेले होते. लोणावळ्याहुन उमेश मामा, रमेश मामा देखील कामशेतला आले होते.

घरी फक्त मी, आई, मावशी, राणी आणि अण्णा एवढेच होतो. त्यात अण्णा खूप जास्त पिले असल्याने त्यांनाही आम्हाला सांभाळावे लागत होते. गावात पाणी नसल्याने लग्नासाठी मागवलेला निम्मा टँकर खाली करून घरात रिकामे झालेले पाण्याचे ड्रम भरायचे होते. अंधार पडायच्या आत आम्ही सर्व पाणी भरले.

रात्री आठ वाजता मामा आणि बापू आले. यावेळी उमेश मामा चा बाळू मामा शी फोनवरून बोलणे झाले. तब्येत जास्त असल्याचे बाळू मामला समजले आणि मामा एकटेच वरहंड्यात बसून राहिले. खात्री साठी मी पप्पांना फोन केला. तर त्यांनी तब्येत ठीक आहे रिपोर्ट आले की आम्ही निघू असे सांगितले. मग गणेश सोबत बोललो. आणि मग उमेश मामाला विचारले. तोवर मामा आणि मावशी आई घरी नुसते अधून मधून रडत होते. खूप भावुक आणि नाजूक असं वातावरण होत. त्यात हे सर्व बीपीचे पेशंट असल्याने मला विशेष काळजी घ्यावी लागत होती. कारण मामा म्हणाले की तिचं काही खरं नाही. आणि तिथून मग तिघेही रडायला लागले.

उमेश मामा ला फोन लावल्या नंतर परिस्थिती समजली. आणि मी फोन स्पीकरला टाकला. तेव्हा आजी ठीक असल्याचे समजले आणि तिघेही शांत झाले. रात्री दहा वाजता हॉस्पिटलमध्ये गेलेली सर्व माणसे घरी आली. आम्ही सर्वांनी जेवण केले. आजीने आम्हाला माझ्या बहिणीच्या जागरण गोंधळाला जायला सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व तिकडे होतो.

तिसऱ्या दिवशी आम्ही सर्व आजीला पाहायला कामशेतला आलो होतो. हॉस्पिटलमध्ये मी आणि बापू आजीला भेटायला गेलो आणि ती पाहून रडायला लागली. तिला नीट बोलताही येत नव्हते. मी फक्त काळजी घे असं बोललो आणि तिथून निघून आलो. कारण डॉक्टर फार वेळ थांबू देत नाहीत. मात्र हॉस्पिटलमधून निघताना माझी आई, मावशी, मी आम्ही पुन्हा तिला भेटलो. कोणास ठाऊक ही भेट शेवटची ठरावी. कारण तिची किडनी निकामी होत असल्याचे डॉक्टर सांगत होते. कफ पूर्ण छातीत पसरला होता. मात्र आता काहीसा कमी झाल्याचे जाणवत होते.

आजीची सून माया मामी तिची विशेष काळजी घेत होती. मात्र हॉस्पिटलचे बिल जवळपास लाखभर रुपयांवर आले होते. हे हॉस्पिटल परवडणारे नसल्याने इथून दुसरीकडे शिफ्ट करण्याचे प्लॅनिंग सुरू होते. धोका मोठा होता. मात्र पाण्या सारखा पैसा हॉस्पिटल ओरबाडत होते.

चौथ्या दिवशी मी माझ्या बायकोला घेऊन सासरी आलो. कारण तिची तपासणी होती. त्याच दिवशी आजीला दुपार नंतर पुण्यातील सिम्बॉयसिस या मोठ्या मात्र नामांकित हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. हॉस्पिटल बदलल्यानंतर तिच्या तब्येतीत आणखीन बिघाड झाल्याचे समजले. ती रात्र गेल्यानंतर तिच्या जगण्याची शक्यता धूसर झाली. आम्ही देखील दुसऱ्याच दिवशी बायकोचे चेकअप करून घ्यायचे ठरवले.

पाचव्या दिवशी सकाळीच आम्ही हडपसर कडे निघालो. उमेश मामा सोबत बोलणेही झाले. डॉक्टरानी जगण्याची शक्यता नसल्याचे सांगितले असून आता आजीला गावी नेण्याचे विचार असल्याचे सांगितले. गावी नेणार म्हणजे खेळ संपलेला आहे असाच थोडक्यात त्याचा अर्थ होता. बायकोचे चेकअप झाल्यानंतर आम्ही धनकवडी येथे नातेवाईकांकडे गौरी ताई कृष्णा कुरावले यांच्या घरी मुक्काम केला.

याच रात्री शिळीम मध्ये मोठा हाहाकार माजला होता. सर्व काही संपलं असे समजून माझी आई, काकू, मावशी सर्वजण रडायला लागले. दुसऱ्या दिवशी गाडी करून पोमगावला जायचे असे त्यांचे ठरले. आणि कसेबसे झोपले. रात्रभर कुणाच्या डोळ्याला डोळा नव्हता.

सातव्या दिवसाची सकाळ उजडताच सर्वांनी आवराआवर सुरू केली. आणि तितक्यात एक फोन कॉल पप्पांचा झाला.

“हा बोल उमेश. निघाले का तुम्ही तिकडून ?” पप्पांनी हलक्या आवाजात विचारले.

तोवर घरात आई आणि काकू कोमेजल्या चेहऱ्याने आवराआवर करीत होते. आणि इकडे घराबाहेर फोन सुरू होता.

“दाजी… अहो तुम्ही काय गडबड करू नका निघायची. आईची तब्येत आता वैशि बरिये.” उमेश मामा म्हणाले.

असे ऐकताच पप्पांना आश्चर्याचा धक्का बसला.

“डॉक्टर आलथे आता तपासायला ते म्हणाले पेशंटच्या तब्येतीत सुधारणा जाणवतेय. तुम्ही काही घाई करू नका अजून राहुद्यात इकडे” असे मामांनी सांगितले.

“अच्छा अच्छा वा… देवाला काळजी बाकी. बरं झालं. आता अक्का आणि आम्ही सगळे निघणार होतो थोड्या वेळानी नवनाथची गाडी करून” पप्पा म्हणाले.

हा फोन कॉल संपताच पप्पा ही बातमी सांगायला आतमध्ये आले.

“उमेशचा फोन होता. तो म्हणाला तुम्ही काय तिकडं येऊ नका. मामी आहेत ठीक” पप्पांनी आई आणि काकुला सांगितले.

हे ऐकताच त्यांना कानावर विश्वास बसेना झाला. कोमेजलेले चेहरे पुन्हा एकदा खुलले. आणि सर्वांनी देवाचे आभार मानले. सकाळी ९ वाजता मी देखील असाच कॉल उमेश मामाला केला. त्यांनी देखील मला असेच सांगितले. मलाही छान वाटले. हा एक दैवी चमत्कार होता असे आम्हाला सर्वांना आजही वाटते. मग पोमगावला न जाता आम्ही सरळ पुन्हा राजगुरूनगरला आलो.

दुसऱ्या म्हणजेच आठव्या दिवशी आजीची तब्येत आणखी सुधारली आणि तिला आयसीयू मधून जनरल वॉर्डात शिफ्ट केले. याचा अर्थ हा की धोका आता टळलेला होता. मी, बायको आणि माझे सासू, सासरे, मेव्हणा आम्ही तिला पहायला हॉस्पिटलमध्ये आलो. तिला भेटलो, बोललो, एकदम छान वाटलं. आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही कल्याणला आलो.

पुढे काही दिवस आजी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत राहिली. सर्वांनी तिची खूप काळजी घेतली. सासू सुनेचे भांडण म्हणजे काही नवीन नाही. मात्र तरीही सून म्हणून माझ्या मामीने तिचे कर्तव्य बजावले. मामी दिवस रात्र तिच्या सोबत हॉस्पिटलमध्ये होती व अजूनही सेवा करीत आहे. अनेकांनी खूप धावपळ आणि मेहनत घेतली. आणि शेवटी काही दिवसानंतर आजीला डिस्चार्ज देण्यात आला.

आजी घरी तर आली पण आता नवा प्रश्न निर्माण झाला होता. ते म्हणजे तिला संडास येत नसल्याने तिचे पोट फुगत होते. शिवाय उलटी होत असल्याने पोटात अन्नही जात नव्हते. थोडाफार फळांचा रस, काहीतरी खाणे आणि पाणी यावरच ती जगत होती. तेव्हाही सर्व जण तिला बघून जात होते. आता काही दिवसांपूर्वी राणीने व्हिडिओ कॉल केला होता. ज्यात जवळपास तीन महिन्यांनंतर आजी आपल्या मूळ रुपात नऊ वारी साडीत आम्हाला दिसली होती. पूर्वी प्रमाणेच ती चालत आणि बसत होती. शिवाय जेवणही हळूहळू सुरू केले होते. म्हणजेच थोडक्यात आता ती पहिल्या सारखी होत आहे. देव करो आणि ती आधी सारखीच धड धाकट होवो.

स्वर्ग रिटर्न आहेस तू… असे अनेक जन तिला म्हणतात. कारण सर्व संपलेले असतानाही ती त्यातूनही सावरून बाहेर आली. तिची जगण्याची प्रचंड इच्छा, तिच्यासाठी प्रार्थना करणारे असंख्य हात, आजारपणातही देवाचा धावा करणारे तिचे मन, जागेवर पडूनही दुसऱ्यांच्या काळजीने खालीवर होणारा तिचा जीव. खरंच देवाच्याही मनात काहीतरी आलं असावं म्हणून देवाने तिला पुनर्जन्म दिला असावा असं आम्हाला वाटत. सारं काही संपलेलं असताना सारं काही सुरू राहतं यामागे कोणती मोठी दैवी शक्ती आहे ? हे आपल्या सारख्या सामान्य माणसाला कळणारे नाही.

आजच्या मातृ दिनाच्या निमित्ताने आज हा ताजा असलेला प्रसंग तुम्हाला मी आज सांगितला. कारण ती आईच असते जिच्या मायेच्या पंखात आम्ही विसावलेलो असतो. एकच सांगेल की जमत असेल तर शक्य तितकी काळजी घ्या, आणि जमत नसेल तर त्रास होणार नाही असे वागू नका. कारण स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…

संतोष दिवाडकर

Raj Thackeray in Kalyan : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा कल्याण डोंबिवली दौरा ठरला

Raj Thackeray in Kalyan : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अलीकडेच कोकण दौऱ्यावर असल्याचे पहायला मिळाले होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता १२ तारखे पासून ते ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. याच जिल्ह्यात सर्वाधिक बळ असलेल्या कल्याण डोंबिवलीचा दौरा ते १४ आणि १५ तारखेला करणार आहेत. अशी माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बदलापूर येथे झालेल्या आढावा बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांना दिली.

जवळपास अडीच वर्षे प्रलंबित असलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक यावर्षी होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मनसे आता या शहरात सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी बदलापूर येथे मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी राज ठाकरेंच्या दौर्याविषयी माहिती दिली. रविवार दि.१४ मे रोजी ते कल्याण मधील पदाधिकार्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तर सोमवारी १५ मे रोजी डोंबिवलीतील मनसे पदाधिकार्यांची ते भेट घेऊन चर्चा करणार आहेत. पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी हा दौरा असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली प्रमाणेच राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे पार पडण्याची शक्यता आहे. मात्र मागील महापालिका पंचवार्षिक निवडणूकित मनसेची सर्वाधिक ताकद ही याच महानगरपालिकेमध्ये आहे. मनसेचे या महानगरपालिकेत १० नगरसेवक तसेच विरोधी पक्ष नेतेपद होते. शिवाय याच मनपा क्षेत्रात मनसेचे आमदार देखील आहेत. मनसेला याच मनपा क्षेत्रात दोन वेळा आमदारपद मिळाल्याने कल्याण डोंबिवलीत असलेली मनसेची ताकद आणखीन वाढविण्यासाठी मनसे आता काय प्रयत्न करणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

संतोष दिवाडकर

Raj Thackeray in Kalyan: MNS President Raj Thackeray’s Kalyan Dombivali Tour

लिटिल आर्यन्स प्री-के, कल्याणचा एक मंत्रमुग्ध करणारा वार्षिक कार्यक्रम संपन्न

कल्याण : लिटिल आर्यन्स प्री-के चे छोटी छोटी मुले, सेंट मेरीज हायस्कूलचा हा उजवा हात, चक्कीनाका, कल्याण यांनी 18 मार्च 2023 रोजी सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन दिनाच्या कार्यक्रमात जादू केली. “द व्हाय डू वुई लँड” थीम असलेला वार्षिक कार्यक्रम स्वामिनी विमलानंद आणि राधिका कृष्णकुमार यांनी लिहिलेल्या “व्हाय डू वी” या पुस्तकावर आधारित होता.

2 ते 6 वयोगटातील 300 हून अधिक मुलांनी गायन केले, नृत्य केले, संवाद सादर केले, यश मिळविणार्‍यांची नावे वाचली आणि कार्यक्रम स्वतंत्रपणे केला.

शिक्षकांच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय मुलांनी नाटकाचा प्रत्येक संच कसा सादर केला हे पाहणे अभूतपूर्व होते. लहान आर्य आपल्या मुलांना स्वतंत्रपणे विचार करायला तयार करतात. त्यामुळे मुलं संवाद विसरली किंवा चुका झाल्या तरी त्यांनी जागेवरच परिस्थिती हाताळली आणि यामुळे उपस्थित श्रोते थक्क झाले.

या शोमध्ये भारतीय विधी आणि चालीरीतींमागील खरा अर्थ दाखवण्यात आला आणि आपण दिवा का लावतो, देवाला नारळ का अर्पण करतो, प्रदक्षिणा का करतो, पुस्तकांना आणि कागदांना पायांनी हात लावू नये असे न सांगितलेले नियम आणि त्यामागील अर्थ अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. नमस्ते हा शब्द स्थापित करणे. व्हर्च्युअल रिअॅलिटी व्हिडीओ गेमद्वारे अप्रतिम चित्रण मुलांसाठी तसेच तरुण पालकांसाठी अधिक मनोरंजक बनले. सुंदर संस्कृत मंत्रोच्चार, मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादरीकरण आणि शानदार होस्टिंगने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. निवेदिता चासकर, सहाय्यक. महाव्यवस्थापक, निप्पॉन पेंट इंडिया प्रा. लिमिटेड आणि रोटरी क्लबच्या अध्यक्षा, रिजन्सी इस्टेट यांनी व्यक्त केले की तरुणांना स्टेजवर अशा कृपेने आणि आत्मविश्वासाने सादरीकरण करताना पाहून मला आनंद झाला. मॉडेल कॉलेजच्या पर्यवेक्षिका आणि लेक्चरर निशा नरेंद्र पिल्ले, मुलांनी आपल्या अभिनयातून सर्व मोठ्यांना खूप काही शिकवले असे दिसून आले.

व्यासपीठावर आपली मते मांडताना डॉ. नीलम मलिक, डायरेक्टर, लिटिल आर्यन प्री-के यांनी विचारले, “आमच्या सर्व लिटिल आर्यन शाळांमध्ये इतके उपक्रम का आहेत? कारण क्रियाकलापां दरम्यान शिकलेली कौशल्ये मुलांना पुढील शिक्षण आणि त्यांच्या व्यावसायिक जीवनात मदत करतात. अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि त्यात सहभागी होणे हा आजच्या जगात अत्यंत आवश्यक असलेल्या डिझाइन थिंकिंगचा आधार आहे.”

सेंटचे माजी विद्यार्थी. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मेरीज हायस्कूलने विशेष पाहुणे म्हणून सांगितले की शाळेने त्यांना स्वतःला शोधण्यासाठी आणि आत्मविश्वास आणि उत्तम व्यक्तिमत्त्वात तयार होण्यासाठी एक अद्भुत व्यासपीठ कसे दिले. कु. अंकित अय्यर म्हणाले, “सेंट येथील शैक्षणिक मेरी नेहमीच वेळेच्या पुढे होती आणि हे वार्षिक दिवसाच्या कार्यक्रमात स्पष्ट होते. शाळा चांगली मूल्ये रुजवते आणि ज्ञान ही शक्ती आहे.” तिने सेंट. मेरी जेथे मुले नृत्य, गायन, वक्तृत्व आणि अशा अनेक क्रियाकलापांद्वारे ते काय चांगले आहेत हे शोधू शकतात.

अक्षय अय्यर यांनी मत व्यक्त केले, “शाळेतील वार्षिक दिवस आयोजन समितीचा एक भाग असल्याने विद्यार्थ्यांना नेतृत्वाच्या अनेक पैलूंबद्दल माहिती मिळाली आणि व्यवस्थापन कौशल्ये विकसित झाली. शाळा बॉलीवूडच्या बरोबरीने बायोपिकचे चित्रण करत आहे. शाळेने तंत्रज्ञान कसे सहज आत्मसात केले याचे त्यांनी कौतुक केले.

सेंट. मेरीज हायस्कूल आणि लिटल आर्यन प्री-के या मायक्रोसॉफ्ट शोकेस शाळा आहेत.
सर्वात शेवटी, सौ. विंदा भुष्कुटे, सीईओ, अनुपालन येथे सेंट. मेरी च्या चार्ज अप

तिच्या प्रेरणादायी भाषणातून श्रोते. वार्षिक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये मुलांना सहभागी होण्यासाठी तयार करण्यात पालकांच्या सहभागाचे तिने कौतुक केले आणि शिक्षक, केंद्रप्रमुख, पालक आणि लिटिल आर्यन प्री-के मधील छोट्या आश्चर्यांसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला.

संतोष दिवाडकर

Annual program of Little Aryan’s Pre-K Kalyan concluded

लिटल आर्यन्स चा वार्षिक स्नेह संमेलन दीन साजरा

कल्याण :- लिटल आर्यन्स प्री-के, आर्य गुरुकुल शाळेची प्री-स्कूल शाखा, नांदिवली यांनी 11 मार्च 2023 रोजी सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे त्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन दिन कार्यक्रम आयोजित केला होता. “द व्हाय डू वुई लँड” थीम असलेला वार्षिक कार्यक्रम स्वामिनी विमलानंद आणि राधिका कृष्णकुमार यांनी लिहिलेल्या “व्हाय डू वी” या पुस्तकावर आधारित होता.

2-6 वर्षे वयोगटातील 500 हून अधिक मुलांनी गायन केले, नृत्य केले, संवाद सादर केले, यश मिळविणार्‍यांची नावे वाचून दाखवली आणि कार्यक्रम स्वतंत्रपणे केला.हा शो भारतीय विधी आणि चालीरीती आणि त्यामागे दडलेला अर्थ याभोवती फिरत होता. त्यामुळे आपण दिवा का लावतो, देवाला नारळ का अर्पण करतो, प्रदक्षिणा का करतो, पुस्तकांना आणि कागदांना पायांनी हात लावू नये असे न सांगितलेले नियम आणि नमस्ते या शब्दामागील अर्थ उलगडला.

हे व्हर्च्युअल रिअॅलिटी व्हिडीओ गेमच्या रूपात चित्रित करण्यात आले आहे जेणेकरून ते मुलांसाठी तसेच तरुण पालकांसाठी अधिक मनोरंजक बनले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. वैभव एस. भानावत, वैद्यकीय संचालक आणि भारतीय वैद्यकीय सल्लागार आणि सन्माननीय पाहुण्यांसह, मास्टर आराध्या पांडेजी, महाराष्ट्र एअर एनसीसी युनिटच्या कॅडेट सार्जंट आणि आर्य गुरुकुल, नांदिवलीच्या विद्यार्थिनी, मिस श्रिया पारेख, माजी विद्यार्थी एलए आणि एजी, राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटर आणि वैद्यकीय विद्यार्थी, डॉ. भित्रलेखा रे, व्हीपी- महिला कल्याण संस्था, ऑर्डिनन्स फॅक्टरी आणि श्री. गुरुदत्त रे, डायरेक्टर एचआर, यंत्र इंडिया.

असा अनोखा कार्यक्रम पाहून पाहुण्यांना अत्यानंद झाला आणि त्यांनी चिमुरड्यांबद्दलचा गौरव उद्गार काढले. कु. श्रिया पारेख म्हणाल्या, “लिटल आर्यनमध्ये मला आत्मविश्वासाने व्यक्त होण्याच्या दिशेने पहिले पाऊल मिळाले आणि पुढे आर्य गुरुकुलमध्ये मला उडण्यासाठी पंख मिळाले.”

संचालक, डॉ. नीलम मलिक यांनी खुलासा केला, “लिटल आर्यन प्री-के मुलांना चुका करण्याची, शिकण्याची आणि अधिक आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी देण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे, हे लक्षात आले आहे की संपूर्ण कार्यक्रम शिक्षकांच्या कमीतकमी हस्तक्षेपासह लहान मुलांनी चालवला आहे. प्रत्येक गाणे मुलांनी स्वतः गायले आहे आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये प्री-रेकॉर्ड केलेले आहे. आम्ही कोणत्याही चित्रपटातील गाणी वापरत नाही.

कार्यक्रमादरम्यान एक साक्षीदार तरुण प्रीस्कूलर सहजतेने संस्कृत शोलाचे पठण करतात, सरस्वती वंदना आणि गणेश आरती गातात आणि पूर्ण आत्मविश्वासाने आणि योगासने करतात.

अध्यक्ष, श्री. भरत मलिक म्हणाले, “चिन्मय मिशन स्कूल असल्याने भारतीय संस्कृती आणि परंपरा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आजच्या वार्षिक दिवसाचा उद्देश हे दाखविण्याचा होता की आपल्या बहुतेक प्रथांमध्ये काही वैज्ञानिक आणि तार्किक तर्क असतात आणि आपल्या मुलांनी, भावी भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा समान अभिमान बाळगावा आणि तिचे वेगळेपण जपावे अशी आमची इच्छा आहे.”

चांगली मूल्ये आत्मसात करण्यासाठी, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि फरक असलेले प्रीस्कूल बनण्यासाठी यासारखे प्रयत्न करावे लागतात.

संतोष दिवाडकर

Celebrating Little Aryan’s annual love meeting

खडेगोळवलीत भव्य शिवजयंती मिरवणूकीचे आयोजन

कल्याण :- संपूर्ण महाराष्ट्रभरात आज तिथी प्रमाणे असलेल्या शिवजयंती उत्सव सुरू आहे. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथे शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. श्री राम चौकापासून सुरू झालेली ही मिरवणूक पुढे खडगोळवली मार्गे कैलाश नगर पर्यंत मार्गस्थ झाली.

या मिरवणुकीत पारंपारिक ढोलताशा पथकाचा एकच नाद घुमला होता तर मुलींची लेझीम देखील पहावया मिळाली. त्याचबरोबर चित्ररथ देखील आकर्षणाची बाब ठरले. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती असलेली वाहने देखील सामील झाली होती. त्याचबरोबर असंख्य रिक्षा मिरवणुकीचा भाग बनल्या होत्या.

दरवर्षी आम्ही अशाचप्रकारे भव्य मिरवणूक काढतो. या मिरवणुकीला शेकडो नागरिकांचा सहभाग असतो. आणि ही पुढेही अशीच सुरू ठेवणार असून आणखीन भव्य मिरवणूक काढत राहणार असल्याची प्रतिक्रिया माजी उपमहापौर विक्रम तरे व समाजसेवक मयुरेश तरे यांनी याप्रसंगी दिली.

संतोष दिवाडकर

Organizing a grand Shiv Jayanti procession in Khadegolvali

गावखेड्यांचा कायापालट; अर्थात हरवत चाललेलं गावपन, भाग दुसरा

आजपासून दोन दशकांपूर्वी म्हणजे २० वर्षांपूर्वीचं माझं गाव आणि आताचं माझं गाव. यात खूप मोठा फरक पडला आहे. म्हणूनच काही जुन्या आठवणींवर उजाळा टाकण्यासाठी त्याचबरोबर आजच्या पिढीला जरा पाठीमागचा आरसा दाखवण्यासाठी म्हणून मी ही नवीन लेख मालिका सुरू केली आहे. तसे फारसे अवघड शब्द न वापरता सोप्या शब्दात परंतु वाचकाला त्या काळात घेऊन जाणे हेच प्रथम उद्दिष्ट. मुळात वाचकाला त्या काळात नेण्या आधी लेखकाला त्या काळात जावे लागते. मागील लेखाला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील भाग आणखीन सुंदर बनतील असा आशावाद मला नक्की आहे. परंतु ज्यांनी मागील पहिला भाग वाचला नसेल त्यांनी लिंकवर क्लिक करून आधी तो वाचावा. लिंक https://mhmarathi.in/shilim-village-the-lost-of-rurality/

पूर्वी जी गावाकडची ओढ असायची ती आता कमी होऊ लागली आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे गावाचे हरवत चाललेलं गावपन. गाव आणि शहर यातील फरक हा तोच व्यक्ती सांगू शकतो ज्याने शहरी आणि ग्रामीण जीवनपद्धती लहान पणापासून जगलेली आहे. गावातील पिढीला आपला गाव बदलला आहे एवढेच फक्त जाणवू शकते. या कथा मालिकेतून आपला गाव आणि शहर या दोघांमध्ये काय फरक होता याचेही दर्शन घडणार आहे. तर आता मागील भागापासून पुढे जाऊयात.

शहरातून गावाला पोहोचल्यानंतर अंगणात पोहोचे पर्यंत जवळपास दुपारचे दोन वाजलेले असे. डोक्यावर रनरनत ऊन जरी असलं. तरी फारसे उकडत नसे. शिवाय कोणत्याही दिशेने येणारा सोसाट्याचा वारा हवा घालण्याचे काम करीत होता. वाऱ्यामुळे झाडांची पाने खळखळून आवाज करीत होते. जसे की स्वागताला टाळ्या. उंच उंच फांद्या वाऱ्यावर डोलत होत्या. आणि मध्येच काही चाफ्याची फुल पुष्पवृष्टी करीत होती.

काल्पनिक प्रतिमा

अंगणाच्या पुढे एका बाजूला भला मोठा खड्डा. त्याला म्हणतात उकिरडा. उकिरड्यात काय ? तर घरातील केर कचरा, जेवणातील खरकटे आणि जनावरांचे शेण. सहज सांगायचं तर डंपिंग ग्राउंड. परंतु कसलाही दुर्गंध न सोडणारं.

आणि त्याच्याच जवळपास एका मांडवा खाली उभी असलेली पाखर्या पपट्याची बैल जोडी. दावणीला बांधून असलेली ही काळी कुट्ट बैल आलेल्या पाव्हण्यांकडे बघत राही. आकर्षण असे की त्यांच्या वेसणीला धरून मी त्यांना गोंजारत असे. तसा पाखऱ्या माझा लाडका बैल. कारण तो शांत आणि समजदार होता. आणि पपट्या जवळ गेला तरी फुसकरायचा. लहानपणी चुकून मी माझा हात दावणी समोरील आडव्या खांबावर ठेवला तर त्याने माझं बोटावर शिंग आदळलं होतं. म्हणून पपट्याचा राग यायचा. पण एक सांगू का तो जो गंध यायचा ना बैलांचा आणि शेणाचा त्याच्या पुढे आजचे रूम फ्रेशनरही फिक्केच. एक वेगळाच गंध होता तो. त्यात कुठेतरी आपलेपणा होता.

पाखऱ्या पपट्या

गावात तेव्हा सगळ्यात जास्त चिवचिवाट कोंबड्या आणि त्यांची पिल्ले करायची. ज्याच्या त्याच्या घरात १०-१५ कोंबड्या असायचा. दिवसा मोकळ्या सोडल्या जात असल्याने अंगणात किंवा उकिरड्यात पायाने माती हुसकून दाणे टिपायचा. कधी कधी बैलाच्या समोर टाकलेल्या पेंढ्यातही उस्तरायला जात होत्या. प्रत्येक कोंबडीच्या मागे तिची आठ नऊ पिल्ले. आणि त्या पिल्लां मागे धावणारा मी. कोंबड्या असो किंवा अजून कुठला प्राणी. मला लहानपणापासून त्यांच्या सोबत खेळायचा नाद बनला आहे.

बराच वेळ अंगणातच थांबल्याने घरातून आजी बाहेर यायची.
“बये आला बाई माझा बच्चा, ये बाळा उन्हात नको खेळू घरात ये. जेवून घे ये” अशी आजीची हाक.
शेणाने सारवलेले मातीचे अंगण आणि डोक्यावर गवताच्या झावळीचा मांडव खूप छान सावली देत होता. लाकडाच्या मेढ्या (खांब) जमिनीत रोवून त्यावर मेसकाट (बांबू) बांधून त्याच्यावर पत्र्यां ऐवजी गवताच्या झावळी पसरल्या जायचा. हे मांडव पावसाळा संपला की बनवले जायचे. आणि तीच खरी थंडगार सावली.

काल्पनिक

घरात जाण्यापूर्वी पहिली पायरी म्हणजे एक भला मोठा दगड. हीच घराची पहिली पायरी. त्या चौकोनी दगडावर पाय देऊन लाकडी दाराचा उंबरा ओलांडून घरात प्रवेश व्हायचा. शेणाच्या सारवलेल्या जमिनीवर ना गरमी जाणवत होती ना गारवा. कपडे घाण होतील असे कधी मनातही यायचे नाही. प्लॅस्टिक खुर्ची वगैरे असले काही नव्हते त्या काळी. लाकडी फळ्यांची बनवलेली एक खाट आमच्या घरात होती. गावातील सुताराकडून तासून तासून ती आजोबांनी बनवुन घेतली होती. आणि त्याच आजोबांचा फोटो एका खांडा खाली तिरका लटकत होता. आता खांड म्हणजे काय ? तर ज्याला आज आपण पिलर म्हणतो. दगड माती पासून उभ्या असलेल्या आमच्या घराला लाकडी फळ्यांचा माळा होता. आणि घराला संपूर्ण कौल. या काळात सिमेंटचे पत्रे वगैरे असे खेडोपाडी पोहोचलेच नव्हते.

एका उंचवट्यावर असलेलं आमचं उंच घर. आणि ते ही तितकेच प्रशस्त होते. घरात बैलांचा गोठा, त्यासमोर एक पडघी. पडघी म्हणजे अशी जागा जिथे काही पेंढा, लाकूड फाटा असे काही सामान ठेवतात. आणि त्यानंतर आमची ओटी. आजच्या भाषेत आपण हॉल म्हणतो. तसे पाहता ओट्या सारख्या वाटणाऱ्या भागाला ही ओटी म्हणतात. परंतु आमची ओटी अथवा हॉल हा प्रशस्त होता. आणि मधोमध एका रांगेत सर्व खांब. ज्यावर सुतारांनी त्यांच्या केलेचे उत्तम प्रदर्शन करून नक्षीकाम केलेले होते. या खांबांना ऑइल पेंट मारून अथवा इतर कोणते रंग मारून सजवले जात असे.

काल्पनिक

पुढे उजव्या हाताला एक खोली होती. ज्याला आम्ही आतलं घर म्हणायचो. आजच्या भाषेत त्याला म्हणतील बेड रूम. त्या आतल्या खोलीच्या भिंतींना लागून धान्याचे डबे रचून ठेवले जाई. तसेच एका कोपर्याला जमिनीवर देवघर असे. आणि ओटीच्या डाव्या बाजूला स्वयंपाक घर.

स्वयंपाक घराला लागूनच पुढे मोरी असे. आज सहजपणे बाथरूम बोलतो आपण. तेव्हा मोरीच म्हटले जाई. आताही म्हणतात म्हणा गावाला काही लोक. ती मोरी पण पूर्ण नाही. तर अर्धीच बांधलेली असे. एका कोपऱ्यात अर्धी भिंत बांधली आणि तिला हॉल काढून पाणी बाहेर जायला आउटलेट दिलं की झालं काम. घरातील महिला पुरुष उठण्या पूर्वी आंघोळी आटपत. आणि तिथेच पुढे स्वयंपाकाला बसत. मुळात बसून अंघोळ करीत असल्याने मोरीच्या भिंती अर्ध्या होत्या. आणि त्या अर्ध्या भिंतीवर हंडे कळशी एकावर एक रचून ठेवले जाई. म्हणजे मोरीच्या अर्ध्या भिंतीवर पाणीसाठा केला जायचा. आता असे चित्र दिसणे दुर्लभ.

काल्पनिक

मोरीच्या जवळ लागूनच दुहेरी चूल होती. तशा चुली आताही आहेतच. पण अजून किती काळ असतील सांगू शकत नाही. दुहेरी चूल म्हणजे सर्वसामान्य. एक तोंड आणि दोन बाजू. एका बाजूला कालवण कढत (शिजत) असेल तर एका बाजूला तव्यावर भाकरी भाजल्या जाई. ही भाकर थोडी कच्ची ठेवून तिला चुलीच्या तोंडावर शेकवले जाते. आणि याच चुलीच्या शेजारी कोवळाभर (हातात मावतील एवढी) फाटी (चुलीला जाळायची लाकडं) रचलेली असायची. एखादं फाट जळून संपलं की लगेच दुसरं लावायचं. ही फाटी क्रॉस जाळली जातात. जेणेकरून दोन्ही बाजूला आग पसरेल असं. याच चुलीच्या वरच्या बाजूला लागून असलेल्या भिंती धुराने काळ्या पडलेल्या असायचा.

काल्पनिक

स्वयंपाक घरातील भिंती शेणामातीने रंगवल्या जायचा. याच भिंतीवर बत्त्या लटकवलेल्या असायचा. आता बत्त्या म्हणजे काय ? तर औषधाच्या किंवा दारूच्या बारक्या बाटलीत रॉकेल ओतून त्याच्या झाकणाला हॉल पाडून त्यातून चिंधीची वात करून सोडली जाई. जसं की आपण देवाला दिवा लावतो तसे. पण त्या बत्त्या असायचा रॉकेलच्या. त्या काळात गावागावांत रात्रीच्या वेळी तासनतास लाईट जायची. त्यावेळी या बत्त्या घरोघरी पेटवून ओटीवर ठेवल्या जायचा.

स्वयंपाक घराला दार असायचे. ते म्हणजे घराचे मागचे दार. माझ्या आजोबांनी इथेही एक अंगण बनवले होते. आणि याच ठिकानी तुळस उभारली होती. तर उंच उंच डोलणारी निलगिरीची भलीमोठी झाडं काही अंतरांवर उभी होती.

घरातील एका कोपऱ्यात अण्णांनी म्हणजे माझ्या चूलत्यांनी एक लाकडी शोकेस टाइप कपाट बनवले होते. ज्यावर ब्लॅक एन्ड व्हाइट टीव्ही ठेवला होता. त्याकाळी गावात टीव्ही हा प्रकार कुणा कडेही नसे. रेडिओ जरी असला तरी खूप मोठे आपरुक मानले जाई. घराच्या प्रत्येक भिंतीला चौकोनी अथवा त्रिकोणी देवळ्या होत्या. देवळी म्हणजे काही वस्तू ठेवता येईल अशी जागा. एखाद्या देवळी मध्ये देव पुजलेले असायचे तर एखाद्या देवळीत काचेचा कंदील. तर कुणाचं पाटी पुस्तक.

काल्पनिक

एवढं मोठं घर आणि घरात एकही पंखा त्याकाळी नव्हता. उलट उन्हाळा असला तरी अंगावर घेऊन झोपायला लागते. जे आता कमी होऊ लागले आहे. आता काही लोक आम्हाला टेबल फेन शिवाय झोप येत नाही असे सांगतात. त्याकाळी शहरात असलेली पांढरी शुभ्र ट्युबलाईट अजूनही गावखेड्यात पोहोचली नव्हती. पिवळ्या रंगाचा ब्लब हाच सर्व काही होता. आणि त्याची बटनही एकदम निराळीच होती.

जेवताना सगळी मंडळी सगळं जेवण घेऊन एकत्र बसत. प्रत्येकाच्या ताटात पाहिजे तसं जेवण वाढलं जाई. आता जेवण काय ? तर आमचा गावात भाजीपाला नसायचा. रानात भाज्या असायचा त्या पण पावसाळ्यात. मग उन्हाळ्याच काय जेवण ? उन्हाळ्यात डाळ, मसूर, वाल, काळा घेवडा, काळा वाटाणा अशी वाळवलेली कडधान्याची आमटी असे. भाकरीला पण तीच आणि भाताला पण तीच. पण तोंडी लावायला प्रत्येकाच्या भाकरीच्या टोपलीत एक भला मोठा मिरचीचा गोळा असायचा. लाल मिरच्या पाट्यावर ठेचून, त्यात लसूण, मीठ असं काही टाकून तयार केलेली चटणी. घरात काही भाजी नसेल तर हीच चटणी भाकरीवर घ्यायची आणि लावून लावून खायची. किंवा आणखीन एक म्हणजे तीळकुटाची चटणी. जी आजही गावाला खायला मिळते त्याला आपण भुगी म्हणतो. तेव्हा आम्हाला भूक लागली तर आमची आजी त्या भुगीमध्ये तेल टाकून आम्हाला चपाती बरोबर खायला देई. तेलामुळे ओलावा मिळे आणि तिखटपणा कमी होई. तसं शहरात भूक लागली तर आम्ही जॅम चपाती खायचो. पण गावाला गेलो की मिळेल ते गोड लागायचं. जेवणात फारसे मसाले मिष्टान्न नव्हतं. पण प्रत्येक पदार्थाला आणि कालवणाला एक वेगळीच चव असायची. ती चव पिजा बर्गर समोर पण फेलच.

आता ही सर्व झाली घराची रचना आणि एकंदर राहणीमान. यातील किती गोष्टी तुम्हाला आठवल्या ? तुमचं घर तुम्हाला कस दिसलं ? वीस वर्षांपूर्वी मागचा प्रवास करून तुम्हाला कसं वाटलं ? आणि शहरी भागातील ज्यांनी हा अनुभव घेतला नाही. त्यांना हे चित्र कसं वाटलं ? हे सर्व मला पर्सनली सांगायला विसरू नका. तुम्हाला वाचताना काय अनुभव येतोय हे मला कळण जास्त गरजेचं आहे. भले तुम्ही माझ्यासाठी ओळखीचे असोत किंवा अनोळखी. पण तुमच्या शब्दात मला तुमचा अभिप्राय कळवा. काही लोकांना सांगायचं तर असतं पण लिहायचा कंटाळा करतात पण तुम्ही मला भावना कळल्या नाहीत तर तुम्ही लेख वाचत आहात हे मला अजिबात समजणार नाही. २००३ पासून सुरू झालेल्या या मागच्या प्रवासात कोण कोण सामील आहे हे मलाही बघायला आवडेल. पुढील भागात करूयात नवी सैर एका वेगळ्या प्रसंगासह. तूर्तास धन्यवाद !!!

-संतोष दिवाडकर ( 8767948054 )
या माझ्या व्हॉट्सऍप वर आपल्या कमेंट पोहोचवा.

शिंदेवाडी होळीमाळ येथील जुना फोटो. बैलगाडी पुढे नामदेव शिंदे. बैलगाडीत बसलेले पांढऱ्या वेशात नारायण दिवाडकर, खंडू शिंदे आणि तेव्हाची तरुण पिढी.

या लेखाबद्दल वाचकांनी व्यक्त केलेल्या निवडक भावना

“लहान होता तेव्हा गावाकडं खुप मजा मस्ती केली. आणि मोबाईल नव्हता त्यामुळे पूर्ण वेळ खेळण्यात जायचा. आता सगळे एकत्र बसले तरी प्रत्येकाच्या हातात फोन असतो.”

– दिपाली शिंदे

“वा खुपच छान लिहिलं आहेस तू लहानपणी चा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला आम्ही पण शिळिंम ला मामाच्या गावाला जाण्यासाठी खुप आतुर असायचो खूपच छान होते ते लहानपणी चे दिवस आणि गाव आणि गावाकडची प्रेमळ स्वभावाची माणसं गावाला जाऊन आल्या सारखं च वाटलं मला”

– कादंबरी गोसावी

“ज्यांनी हे जगले त्यांच्या चेहऱ्यावर शेवट पर्यंत एक छान स्मितहास्य नक्किच राहत असनार. शिळीम गावच्या आठवनीत. व्यावं पुन्हा लहान आणि जगावं ते बालपण परत. काळाची पावलं मागं नेता आली असती तर किती बरं झालं असतं ना.”

– उज्वला पवार

“खरंच मला त्या काळात गेल्यासारखं वाटलं. क्षणभर सगळं काही ठळकपणे आठवलं. लग्ना नंतरचे आठवत नाही. पण बालपण आठवलं. मस्त लेख आहे.”

– भावना दिवाडकर

“२ रुपयांना जाळीत झाकून ठेवलेला वडा पाव. खरंच बालपण किती छान होत. त्या काळी खिशात २ रुपये जरी असले तरी खूप वाटायचे आणि आता. काय सुख होत त्या बालपणात. आता गूगल पे ने पूर्ण अकाउंट कितीही पैश्यानी भरुदे पण त्या बालपणासारखे सुख नाही कुठेच.

– ओमकार चासकर

“छान वाटलं. जुन्या आठवणी खरच ताज्या झाल्या. क्षणभर अस वाटलं अजून मी तिथेच आहे का. वाचता वाजता रुळून गेली.

– पुजा कदम

“खूप छान लिहलय. आता मोबाईल मुळे गावाचे गावपण हरवल आहे. गावा सारखी मज्जा शहरात नाही घेता येत.”

– अश्विनी इंगळे

“मस्तच! मस्त रमलो जुन्या आठवणीत. पण आज गावाचं गावपण हरवत चाललं आहे. गावांचाही विद्रुप शहरीकरण होत चाललंय. आणि खेदाची बाब म्हणजे आपण यालाच विकास समजतोय. गावाशी जुळलेली नाळ आणि भावना नष्ट होत चालल्या आहेत. आठ वाजताच निद्रिस्त होणारे गाव मध्यरात्री पर्यंत पण मोबाइलच्या स्क्रीनमुळे काजव्याप्रमाणे चमकत आहे. सगळं काही आपल्या हातातून सुटत चाललंय, हि खूप मोठी धोक्याची घंटा आहे.”

– गोपाळ दंडगवळे

“दादा तुमचा लेख वाचला. सत्य परिस्थितीचें वर्णन केले आहे. तुम्ही खरच मावळच काय अशी अनेक पुण्या नजिक गाव आहेत जी आता गाव म्हणून ओळखणे कठीण होत आहे .सतत चालणारे काँक्रिटीकरण, झाडं मुळासकट उखडून टाकली जात आहे खेडी लोप पावत आहेत. मी मूळची कोकणातली पण महाड पोलादपूर जिथे माझ गाव होत तिथे फक्त आता शहरी सांगाडा दिसत आहे. गाव कुठे तरी हरवला आहे. खूपच वाईट वाटत आहे. येणाऱ्या पिढीला गाव काय असतं कधी कळेल का??? हे विचार करूनच खंत वाटत आहे.”

– रोहिणी जाधव