डोंबिवलीत कॉलेज विद्यार्थ्यांना गांजा सप्लाय करणाऱ्या तिघांना अटक; अतिदुर्गम भागातून आणल्या जात होत्या गोण्या

डोंबिवली (Dombivli Crime) : शहरातील मानपाडा पोलिसांच्या हद्दीत असलेल्या शिवम हॉटेल जवळील मैदानात अमली पदार्थ विकण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. यानंतर तात्काळ मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांनी पोलिसांसह सापळा रचून आनंद शंकर देवकर या 32 वर्षीय इसमाला 20 किलो 300 ग्राम गांजाच्या दोन गोण्यासह एनडीपीएस एक्ट अंतर्गत अटक करून पुढील तपास सुरू केला.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या गांजाच्या गोणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर या आदिवासी अति दुर्गम भागातून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांचे पथक थेट शिरपूर येथील अतिदुर्गम भागात पोहोचले आणि त्यांनी रेमन डुल्या पावरा, संदीप छोटू पावरा या दोघांना अटक करून डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात आणले. हा गांजा डोंबिवलीतील कॉलेज परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. अशा प्रकारचे कोणतेही गांजा विकणारी टोळी आढळल्यास ठाणे नियंत्रण कक्ष किंवा कल्याण नियंत्रण कक्ष येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कॉलेजात शिकणारी तरुण पिढी गांजाच्या आहारी गेल्याने गांजाची मोठी मागणी शहरी भागात वाढली आहे. यामुळे अतिदुर्गम भागात गांजाची लागवड करून तो माल शहरी भागात आणला जातो. शहरी भागात विविध ठिकाणी गांजा विक्रीचे छुपे अड्डे बनवून त्याची विक्री केली जाते. अशा प्रकारची विक्री कोठे होते याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-संतोष दिवाडकर

Three arrested for supplying cannabis to college students in Dombivali

भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक; ठाणे वनविभागाची धडक कारवाई

कल्याण : भेकराच्या पिल्लाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आले असून ठाणे वनविभागाने (Thane Forest) हि  धडक कारवाई केली आहे.  रमेश तुकाराम वाळिंबे रा.आल्यानी, बारकु गणपत हिलम रा.कळगाव, गणेश गुरुनाथ वाघ रा.कळगाव अशी आरोपींची नावे असून हे तिघेही शहापूर तालुक्यात राहणारे आहेत.

वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार उपविभागीय वन अधिकारी मांडवी स्थित ठाणे सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. देवरे वनक्षेत्रपाल पडघा यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध सापळा रचून रेंज स्टाफ वनपाल वनरक्षक पडघा यांच्या समवेत नाशिक मुंबई महामार्गावर सर्व्हिस रोड जवळ मौजे कासने गाव हद्दीतील पॅरामाउंट हॉटेल शेजारी भेकर जातीचे पिल्लू अवैध विक्री व्यवहार करताना तीन आरोपींना जिवंत भेकराच्या पिल्ला सोबत पकडले. या आरोपींना भिवंडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

या कारवाईत दिनेश माळी (वनपाल पडघा), विलास निकम (वनपाल वडपा), श्याम चतुरे (वनपाल दिघाशी), अजय राठोड (वनरक्षक सांगावं), अमित कुलकर्णी (वनरक्षक पाच्छापूर), जमीर इनामदार (वनरक्षक लोनाड), पंकज भाऊसाहेब (कार्यालयीन लेखापाल), महेंद्र भेरे (कार्यालयीन कर्मचारी), वाहन चालक विकास उमतोल, संतोष गोडांबे, वनमजूर यांनी सहभाग घेतला. या कारवाईत आरोपीने वापरलेल्या दोन मोटार सायकल जप्त केल्या असल्याची माहिती वनपाल साहेबराव खरे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

Three arrested for selling deer calves; Action taken by Thane Forest Department

रस्त्यावरील बेवारस उभी वाहनं KDMC ने हटवली

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी काही निर्देश घालून दिले होते. यानुसार ‘4-जे’ प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व परिसरातील तिसगाव रोड, सुचकनाका, पत्रीपुल, कचोरे या ठिकाणी रस्त्यावर उभी असलेली व दैनंदिन साफसफाईस बाधा ठरणारी बेवारस व मोडकळीस आलेली एकुण १६ बेवारस वाहने जप्त करुन खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली आहेत.

आज सकाळी करण्यात आलेली ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, आर.टी.ओ. चे अधिकारी यांच्या सहाय्याने व टोइंग मशीन, डंम्‍पर व जेसीबी च्या मदतीने करण्यात आली.

सध्या महानगरपालिका शहरातील स्वच्छता या विषयावर मोठा भर देत असून वास्तवात शहराला बकालपणातुन बाहेर काढीत सौन्दर्यदृष्टी प्रमाणे कामकाज सुरू आहे. वेळोवेळी नागरिकांचा कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या, घनकचरा प्रकल्प, सार्वजनिक ठिकाणी रोषणाई, भिंतीवर रंगकाम अश्या सर्व बाबींवर महापालिका बारकाईने काम करत आहे. मात्र शहराला स्मार्ट करण्यासाठी शहरातील नागरिकांनी आधी स्मार्ट होणं गरजेच आहे.

-कुणाल म्हात्रे

KDMC removed unattended vehicles on the road

जामिनासाठी बनावट दस्तवेज तयार करणाऱ्या टोळीला न्यायालयात सापळा लावून केले अटक

कल्याण : कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अटक आरोपींच्या नातेवाइकांकडून हजारो रुपयांच्या मोबदल्यात त्या आरोपीला जामिनावर मुक्त करण्यासाठी बनावट कागदपत्रासह बोगस जामीनदारांचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कल्याण गुन्हे (Kalyan Crime) शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात टोळीतील ५ जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.

महमद रफीक अब्दुल सत्तार शेख (रा. मालाड पुर्व, मुंबई ), जयपाल समाधान मजोगीरी (रा.धारावी मुंबई), संतोष कन्हैयालाल मौर्या (रा, विरार पुर्व), महमद हबीब महमद रफीक हश्मी (रा. जोगेश्वरी, पश्चिम), चंदु ऊर्फ चंद्रकांत अर्जुन खामकर (रा. ज्युचंद्र, वसई पुर्व जि.पालघर), असे अटक केलेल्या टोळीचे नाव आहे.

डोंबिवली रेल्वे स्थनाकात एकाची हत्येप्रकरणी अटक आरोपीला बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन देण्यासाठी काही जण सोमवारी कल्याण न्यायालयात येणार असल्याची खबर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, किशोर शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार कल्याण न्ययालयात सापळा रचला होता. त्यावेळी डोंबिवली रेल्वेच्या परिसरात हत्या करणाऱ्या आरोपीला हि टोळी बनावट कागदपत्रासह बोगस जमीनदाराला घेऊन आली असता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना आरोपीला जामीन देण्याआधीच न्यायालयाच्या आवारात झडप घालून बनावट दस्तऐवजासह ताब्यात घेतले.

या टोळीतील मुख्य आरोपी चंदू उर्फ चंद्रकांत खामकर हा आरोपीना जामीन मिळवून देण्यासाठी लागणारे बनावट दस्तऐवज करण्यात माहीर असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या टोळीत आणखीही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून या टोळीने आतापर्यत किती बोगस जामीनदार न्यायालयात उभे करून आरोपींना जामीन मिळून देण्यात मदत केली. याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. तर आज पाचही आरोपीना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली आहे.

-रोशन उबाळे

Arrested for making fake documents for bail in kalyan

‘आर के बझार’च्या नव्या शाखेचं उदघाटन; डोंबिवली अनंतम रेजन्सी मध्ये भव्य सुपर मार्केट सुरू

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अश्या रामकृष्ण बझारच्या (Ram Krushna Bazar) १७ व्या शाखेचे उदघाटन २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्ताने करण्यात आले. डोंबिवली गोळवली येथील अनंतम रेजन्सी येथे नव्या शाखेचे उदघाटन करण्यात आले आहे.

अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहरातील ग्राहकांचा विश्वास आर के बझारने (R K Bazar) संपादित केला आहे. उत्तम दर्जाच्या वस्तू विशेष सवलतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून रामकृष्ण बझारची ओळख आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या सुपर मार्केटचे संचालक मनोज डुंबरे हे स्वतः प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात. नवीन शाखेच्या उद्घाटना निमित्ताने अनेक मित्रमंडळी, हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले.

गरीब असो अथवा श्रीमंत अनेक ग्राहकांची पसंद आर के बझारला मिळताना दिसते. यानिमित्ताने उदघाटनाच्या दिवशी खरेदी करणाऱ्या लकी ग्राहकाला लकी ड्रॉ द्वारे वॉशिंग मशीन बक्षीस स्वरूपात देण्यात आली. आर के बझार वरून मोफत होम डिलिव्हरी देखील करता येत असून. आता घरबसल्या किराणा सामान ग्राहक मागवू शकतात. यासाठी आर के बझारचा एप डाउनलोड करावा लागणार आहे.

-संतोष दिवाडकर

Inauguration of new branch of R K Bazar at Anantam Regency, Dombivli

Video – New Branch
रविवारचा वापर असाही ! दुर्ग संवर्धकांनी दिली भिवगडावरील पाण्याच्या टाकीला नवसंजीवनी

राजेप्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभाग कर्जत आणि अखंड भिवगड संवर्धन समिती गौरकामथ यांच्या संयुक्त सहभागाने किल्ले भिवगडावरील अनेक वर्षांपासून गाळाखाली लोप पावत चाललेल्या पाण्याच्या टाकीला पुनर्जीवित करण्यात आले आहे. किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत वर्षानुवर्षे साचलेला गाळ बाहेर काढणे हे जिकरीचे काम होते. मात्र दुर्ग संवर्धकांनी हे काम पार पाडले.

मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यापासून टाकीत साचलेला गाळ उपसण्याची मोहीम साधारण ३ महिन्यांपूर्वी सुरू केली होती. या कालावधीत १२ रविवार मोहिमा घेऊन हे काम आता पूर्ण झाले आहे. ह्या मोहिमेला महाराष्ट्रभरात दुर्गसंवर्धन करत असणाऱ्या विविध संघटनांनी एकत्र येऊन हे कार्य पूर्ण करून समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला आहे. सर्व संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील गडकोट येणाऱ्या पिढीला बघता येईल ह्यासाठी प्रयत्न करत असल्याचा भावना व्यक्त केल्या. याच मोहिमेत शिवशाहीर गणेश तानाजी ताम्हाणे (रायगड जिल्हा अध्यक्ष,
महाराष्ट्र शाहीर परिषद) यांनी संपूर्ण भिवगड आपल्या शाहिरीने दुमदुमून सोडला. यामुळे काम करताना शिवभक्तांमध्ये अधिक ऊर्जा निर्माण झाली होती.

भिवगड मोहिमेसाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, कर्जत, मुरबाड, खालापूर, नवीमुंबई, पुणे अशा विविध भागातुन दुर्गसंवर्धक आले होते. किल्ले भिवगड पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान (अंबरनाथ), शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, दुर्गजागर प्रतिष्ठान (रायगड/ठाणे), सज्जनगड संवर्धन समिती (सातारा), शिवकार्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आदींनी पुढाकार घेतला होता. तसेच भिवगडावरील आणखीन तीन टाक्यांच्या संवर्धनाच काम बाकी असून संपूर्ण काम होई पर्यंत प्रत्येक रविवारी ही मोहीम सुरू राहणार असल्याचे राजे प्रतिष्ठाण दुर्ग संवर्धन विभाग महाराष्ट्र अध्यक्ष राहुल महाजन यांनी एम एच मराठीशी बोलताना सांगितले.

-संतोष दिवाडकर

Water tank on Bhivgada fort cleaned by fort keepers

Video – मोहिमेत गायलेली शाहिरी
कॅन्सर बरा करतो सांगून भोंदू बाबाने लाटले 32 लाख रुपये

कळवा : कळव्यात राहणाऱ्या एका महिलेने डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात एक धक्कादायक तक्रार नोंदवली आहे. जळगावच्या भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातला आहे.

कळव्यातल्या खारीगाव येथील एका गृहिणीने डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातल्या भडगावातील गंजेवाडा शनि चौकात राहणारा पवन पाटील नामक इसमाच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर २०१९ पासून आजतागायत पवन बापुराव पाटील या भोंदूबाबाने तक्रारदार यांच्यासह डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडला राहत असलेल्या त्यांच्या आईची देखील फसवणूक केली आहे. तक्रारदार महिलेसह त्यांचा भाऊ आणि आईला त्यांच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले. साऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबाने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकु व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चांदीची प्रतिमा हातचलाखीने काढून दाखवली.

तसेच या बाबाने त्यांच्या कुटुंबावर कुणीतरी करणी केल्याची भीती घातली. करणी काढण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याचे सांगून या बाबाने तक्रारदार महिलेच्या व तिच्या आईच्या खात्यामधून वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यामध्ये ३१ लाख ६ हजार ८७४ रूपये ऑनलाईन ट्रान्स्फर करवून घेतले. तसेच १ लाख ९ हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या. अशाप्रकारे पवन पाटील या भोंदू बाबाने ३२ लाख १५ हजार ८७४ रुपयांची फसवणूक करून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या प्रकरणी वपोनि सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि सुरेश सरडे अधिक तपास करत आहेत.

-संतोष दिवाडकर

In Kalwa, under the guise of cancer, Bhondu Baba looted Rs 32 lakh

कल्याणच्या गौरी पाडा तलावात मृत कासवांचा खच; मृत कासवांवर अग्नीसंस्कार

कल्याण : दोन दिवसांपूर्वी कल्याण (Kalyan) पश्चिमेतील गौरी पाडा (Gouri Pada) तलावात मृत झालेल्या कासवांवर (Turtle) वन विभागाने नियमाप्रमाणे अग्निसंस्कार केले आहेत. तर १३ कासवांना वाचविण्यात वॉर रेस्क्यू टीमला (War Rescue Team) यश आले आहे.

कल्याण पश्चिम येथील गौरीपाडा तलाव हा मस्त्य व्यवसाय आणि गौरी गणपती विसर्जनासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात येथे मासे पकडुन विक्री केली जाते. या तलावात दोन दिवसांपासून खूप दुर्गंधी पसरली होती आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आले होते. मा.नगरसेवक दया गायकवाड यांनी वॉर संस्थेच्या हेल्पलाईन वर संपर्क केला असता त्यांची टीम घटनास्थळी गेली. त्यानंतर त्यांना मन विचलित करणारे दृश्य दिसले. त्याठिकाणी दोन-चार नव्हे तर ५० ते ६० मृत कासवांचा खच पडला होता. तर अनेक कासव शेवटचा श्वास घेत होते.

भारतीय मृदूपाठीचे कासव हे संकटग्रस्त उभयचर जीवांपैकी एक आहे. डासांनी पाण्यात सोडलेली अंडी, किडे व मृत मासे त्यांचे प्रमुख अन्न आहे. पाणी शुद्ध आणि स्वच्छ करणारे जीव हे एक प्रकारे मानवी जीवाला फायदेशीर आहे. घटनास्थळी वनविभागाकडून पंचनामा होत असताना काही कासव किनाऱ्यावर तडफडत असल्याचे आढळून आले. त्यात ९ भारतीय मृदू पाठीचे कासव आणि ४ रेड इयर्ड स्लाइडर जातीचे कासव असे एकूण १३ कासवांना वॉर टिम ने तत्काळ सुखरूप बाहेर काढले आहे. तर ५३ कासवांवर वनविभागाने नियमाप्रमाणे अग्निसंस्कार केले आहेत.

मृत कासवां पैकी काही कासव शवविच्छेदना करिता वनविभागाने पाठवले आहेत. लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल. कासवांचा मृत्यू कशामुळे झाला? तलावात कोणी औषध टाकले आहे का? पाण्यात रासायनिक सांडपाणी सोडले गेले आहे का? तलावात मासे देखील असून मग त्यांचा मृत्यू कसा झाला नाही? असे एकना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यामुळे कासवांचा मृत्यू मानवनिर्मित असेल तर दोषींवर लवकरच कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वॉर संस्थेच्या सुहास पवार यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

Many turtles die in Gauri Pada lake of Kalyan

आजपासून शाळा सुरू! विद्यार्थ्यांनी सजवल्या शाळेच्या भिंती

कल्याण : पुन्हा एकदा शाळा भरल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. त्या निमित्ताने कल्याण येथील श्री गजानन विद्यालय शाळेच्या आवाराबाहेरील भिंतींवर विविध समाज प्रबोधन पर चित्र काढण्यात आली आहेत. मुलगी वाचवा मुलगी शिकवा, लेक माझी भारताची शान, स्वच्छता अभियान आदी विषयांबाबत चित्रांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. या कामासाठी केडीएमसी शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी विजय सरकटे, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांची मदत झाली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव यांनी दिली.

शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश आले असून शहर सौंदर्यीकरणासाठी यापुढील पाऊल म्हणून शहरातील शाळांच्या भितींवर पर्यावरण पूरक संदेश देणारी चित्र काढण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन‍ आणि शिक्षण विभागातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती.

 या बैठकीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शालेय स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी, शिक्षक- पालकांच्या सहभागातून साजरी करणे, सर्व प्राथमिक- माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये दर्शनी भागातील भिंतीवर, शालेय परिसरातील सार्वजनिक भितींवर सार्वजनिक तसेच पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्रण करण्याचा ठराव मंजूर झाला. कलाकृती बनवण्यासाठी लागणारे रंग, ब्रश आणि इतर सामग्री प्रत्येक शाळेला महापालिकेमार्फत देण्यात येत आहे.

-कुणाल म्हात्रे

Schools in Maharashtra resume from today

“नाना पटोले डोक्यावर पडलेले नेते” – भाजप शहर जिल्हाध्यक्ष

डोंबिवली : कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना अक्कल नसून, ते डोक्यावर पडलेले राजकारणी नेते आहेत. तसेच नाना पटोले सडलेल्या मेंदूचे राजकारणी आहेत. असे खळबळजनक वक्तव्य कल्याण डोंबिवली भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे (Shashikant Kamble) यांनी केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वीच तथाकथीत गावगुंड मोदीच्या नावे केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वादाची ठिणगी पडली होती. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभरात  उमटताना दिसत असून भाजपा अधिक आक्रमक झाली आहे. असे असताना रविवारी देखील नाना पटोले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली रेल्वे स्थानकासमोरील  स्वर्गीय इंदिरा गांधी चौकात नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करून भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

-कुणाल म्हात्रे

BJP protests against Nana Patole in Dombivali