कल्याण डोंबिवलीत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाया सुरूच

कल्याण : महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या प्रभागातील पथके पोलिसांच्या मदतीने महापालिका परिसरात दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत असूनही अजून काही नागरिक रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

१० जानेवारी ते १४ जानेवारी या पाच दिवसात सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणा-या ७७९ व्यक्तींकडून महानगरपालिका कर्मचारी पथकाने पोलिसांच्या मदतीने ३ लाख ८९ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. तरी गर्दीच्या ठिकाणी, अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावा तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. तसेच कोविड अनुरुप वर्तनाचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

“क.डों.म.पा.च्या जम्बो कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार” – राष्ट्र कल्याण पार्टीचा आरोप

कल्याण : वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांवर उपचार करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवलीच्या एमआयडीसी भागात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. मात्र या कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर यांनी केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

 डॉबिवली औद्योगिक क्षेत्र फेज – १ मधील इंडस्ट्रियल युनिट मेकानो इंडीया प्रा. लि. या कंपनीतील इमारत क्र. २ मध्ये डेडिकेटेड कोविद हॉस्पिटल तयार करण्यात येत आहे. हे हॉस्पिटल तयार करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे हॉस्पिटल तयार करण्याचे काम मे. एम अंक इंजिनियर्स या कंपनीला दिलेले आहे. याठिकाणी सार पत्रकाप्रमाणे कोणतेही काम करण्यात आलेले नाही. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे.

याठिकाणी प्लायवुड ज्या कंपनीचे व जेवढ्या जाडीचे लावण्यास सांगितले होते ते लावण्यात आलेले नाही. तसेच जे लावण्यात आलेले आहेत ते देखील निकृष्ट बर्जाचे भंगार मधील घेऊन लावण्यात आलेले आहे. सनमाईका देखील सुमार दर्जाच्या लावण्यात आल्या असून त्यामध्ये देखील बरेचसे सनमाईका तुटलेले वापरण्यात आले आहे. अल्युमिनियम व स्टील अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आलेले आहे. बाथरूम मध्ये लावण्यात आलेले सर्व साहित्य निकृष्ट व दुष्यम दर्जाचे आहेत. लोकल कंपनीचा कलर वापरण्यात आला आहे, तसेच तो देखील योग्य प्रकारे लावण्यात आलेला नाही. तात्पुरते स्वरूपात सर्व बाजूने लावण्यात आलेले पत्रे भंगार मधून घेऊन लावण्यात आलेले आहेत.

निविदा प्रमाणे कंपनी ने दुसऱ्या कोणालाही काम देऊ नये असे असताना कंपनी ने थर्ड पार्टीला काम दिले आहे. मे. एम डॅक इंजिनियर्स या कंपनीचे मालक दिलीप महादेव गावडे यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच कंपनीचे मालक यांच्या बनावट सही करून महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व कामांची तृतीय पक्षातर्फे तपासणी करण्यात यावी, जेणेकरून कामाची गुणवत्ता आपल्या निदर्शनास येईल. निविदा देण्यात आलेल्या कंपनीचे एकही बिल देण्यात येऊ नये तसेच आतापर्यंत देण्यात आलेल्या बिलाची रक्कम देखील कंपनी कडून वसूल करण्यात यावी आणि या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे, तसेच ज्यांनी महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणूक करून भ्रष्टाचार केला आहे त्यांच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा व कर्त्यव्यात कसूर करून कंत्राटदार यांना पाठीशी घालणाऱ्या जबाबदार अधिकारयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीने केली आहे.

-कुणाल म्हात्रे

संक्रातीच्या सणाला कल्याण डोंबिवलीत हजारो कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण :- नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वेगाने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाले होते. मात्र संक्रांतीच्या दिवसाला समाधानकारक अशी बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात आज तब्बल १२१६ रुग्णांना डिस्चार्ज म्हणजेच बरे झाले असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. यामुळे या वाढत्या आकड्यांमधून काहीसे दिलासादायक वृत्त संक्राती निमित्त कल्याण डोंबिवलीकरांना मिळाले आहे.

मागील काही दिवसांपासून क.डों.म.पा. क्षेत्रात दररोज हजारो नवे कोरोना रुग्ण नोंदवले जात आहेत. जवळपास १० हजारांहून अधिकचे रुग्ण या १४ दिवसांत नोंदवले गेले आहेत. मात्र आज नव्या रुग्णापेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक प्रमाणात नोंदवले गेले आहेत. या आकडेवारी मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंदही करण्यात आलेली आहे. आजच्या आकडेवारी नुसार क.डों.म.पा. क्षेत्रात एकूण ११ हजार ३५७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. बदलत्या वातावरणामुळे सध्या प्रकृतीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.

-संतोष दिवाडकर

राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने ‘आम्ही यशस्वी महिला’ परिसंवाद

कल्याण : विविध पदांवरील अधिकाऱ्यांचे जीवन कसे असते. त्या पदावर जाण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास व कष्ट घ्यावे लागतात. अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने आम्ही यशस्वी महिला ऑनलाइन परिसंवाद आयोजित केला होता.

 शाळेतील मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना टिळक नगर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका लीना मॅथ्यू म्हणाल्या, शिक्षणातून सुसंस्कारित होणे आवश्यक आहे. मला माझ्या आई-वडिलांच्या आणि शिक्षकांच्या योगदानामुळे मी खेळाडू  झाली आणि शिक्षण पूर्ण करून शिक्षिका झाली आता मुख्याध्यापिका आहे. उच्च न्यायालयातील वकील मनीषा भिलारे यांनीही मुलांना आपण कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा सल्ला दिला. प्रत्येकाचं जीवन कष्टमय असते असंही त्या म्हणाल्या.

उद्योजक लीना शिर्के यांनी चिकाटी आणि परिश्रम महत्त्वाचे आहेत अपयश येते पण खचून न जाता प्रयत्न करा. माझ्यासारख  तुम्हालाही यश मिळेल असे त्या म्हणाल्या. परिसंवादात शाळेतील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील सह शिक्षक विद्यार्थी उपथित होते. गायत्री चव्हाण. सुहानी चौधरी. सुवार्ता पवार. प्रशिक थोरात  या मुलींनी सहभाग  घेतला. परिसंवादाचे प्रस्ताविक व आभार सहशिक्षिका माधुरी काळे यांनी मानले. जिजामातांच्या भूमिकेत मनस्वी मढवी व बाल शिवाजी मंथन मढवी हे आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण होते.

-कुणाल म्हात्रे

भूमिपूजन सोहळे आटपून खासदार श्रीकांत शिंदेंचं निकटवर्तीयाच्या घरी स्नेहभोजन

मलंगगड :- मलंगगड भागात विविध ठिकाणच्या रस्ते कामाच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे निकटवर्तीय अक्षय बाळाराम काठवले यांच्या निवास्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. याच ठिकाणी श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या समवेत असलेल्यांनी स्नेहभोजन केले. अक्षय काठवले यांच्याशी विविध कामाच्या विषयांवर चर्चा केली.

या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, गोपाळ लांडगे, वामन म्हात्रे, धनंजय बोडारे, महेश गायकवाड तसेच असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदारांनी काठवले यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन मलंगगड भागातील रखडलेल्या कामांबाबत चर्चा केली. लवकरात लवकर कामे केली जातील असे आश्वासन शिंदे यांनी काठवले यांना दिले. अक्षय काठवले यांनी खासदारांना महाराष्ट्र ग्रामीणमधील खेडेगावांची गावठाण विस्ताराची समस्या तात्काळ मार्गी लावण्यासंदर्भात एक निवेदन देखील दिले आहे. या निवेदनाचा स्वीकार करत खासदार श्रीकांत शिंदेंनी अक्षय काठवले यांच्याशी सविस्तर चर्चा देखील केली आहे.

-संदेश दाभने

ताडीच्या अतिसेवनाने डोंबिवलीत दोघांचा मृत्यू

डोंबिवली :- ताडीचे सेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली शहरात घडली आहे. कोपर भागात राहणाऱ्या सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके या तरुणांचा यात मृत्यू झाला आहे. विष्णू नगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरू केला आहे.

विषारी ताडीमुळे हा मृत्यू झाल्याची आधी चर्चा होती मात्र ताडीच्या अतिसेवनामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना डॉक्टरांकडून मिळाली आहे. स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता. सचिन आणि स्वप्नील हे दोघे मित्र सोमवारी सायंकाळी आपल्या आणखी दोन मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरमध्ये ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन आणि स्वप्नील घरी परतत असताना रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला.

ताडी पिऊन इतर दोघांची तब्येत सुद्धा खालावली होती, मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दोन्ही मृतकांचे शवविच्छेदन केले असता ताडीचे अति सेवन केल्यामुळे त्यांना झोप लागली आणि त्यात त्यांच्या हृदयावर ताण येऊन त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली असे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले.

-संतोष दिवाडकर

‘एपीएमसी’ मार्केटमध्ये किरकोळ ग्राहकांना ‘नो एन्ट्री !’ – क.डों.म.पा. आयुक्त

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ ग्राहकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून घाऊक व्यापारी आणि त्यांचे कर्मचारी यांचे लसीचे दोन डोस झालेले असणे बंधनकारक असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगतिले आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीदार देखील जात असतात. त्यामुळे पहाटेच्या वेळेला मोठी गर्दी पाहायला मिळते. यासाठी बाजार समितीला किरकोळ ग्राहकाला परवानगी देऊ नये, घाऊक व्यापारी आहेत त्यांचे कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा लस घेतली असेल त्यांनाच परवानगी द्यावी. बाजार समितीमध्ये  गर्दी होणार नाही यासाठी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची संख्या नियंत्रित करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

 लक्ष्मी मार्केट मध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते तिथे देखील एक दिवसा आड ओटे सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्रातील आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहेत. मोठ्या गृहसंकुलांमध्ये २५ टक्के सदनिका मधील रहिवासी पॉझिटिव आले तर त्या गृह संकुलातील सर्वांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना पालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे घरकाम करणारे किंवा अजून काही नोकरचाकर असतील त्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले असणे बंधनकारक असणार आहे. संसर्ग असलेल्या घरांमध्ये कोणालाही परवानगी देऊ नये ही सर्व जबाबदारी त्या हाउसिंग सोसायटीचे असणार आहे. या नियमांचे उल्लघन करणाऱ्या गृहसंकुलाला पहिल्यांदा ५ हजारांचा दंड असून दुसऱ्या वेळी देखील नियम मोडल्यास त्या गृहसंकुलाला १० हजारांचा दंड करण्यात येणार आहे.

 वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता जेवढ्या खाटा लागतात त्याच्यापेक्षाही जास्त व्यवस्था केलेली आहे. नऊ हजार सहाशे पंचावन्न आपल्याकडे खाटा असून त्यामध्ये २९९५ ऑक्सिजनचे बेड असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण मधील पोलिसाची त्याच्याच पत्नी आणि मुली कडून हत्या

कल्याण :- पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या नाना पावशे चौकातील एका इमारतीत रहाणाऱ्या पोलिस हवालदार कुटूंबाचा घरगुती वाद इतका विकोपाला गेला की या वादातून पत्नीने पेशाने पोलिसात असलेल्या पतीच्या डोक्यावर जबरी मारहाण केल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. या मारहाणीत मयत इसमाची मुलगीही सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पत्नी आणि मुलगी या दोघां विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नाना पावशे चौकातील हिरा पन्ना अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्या वरील रूम नं १५ मध्ये रहाणाऱ्या बोरसे कुटूंबामध्ये ६ जानेवारीच्या रात्री ९ चे सुमारास कौटूंबीक वाद होऊन या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. विकोपाला गेलेल्या या हाणामारीत मयत प्रकाश राजाराम बोरसे (५५) याला त्यांची पत्नी ज्योती प्रकाश बोरसे (४५) आणि मुलगी भाग्यश्री प्रकाश बोरसे (२७) या दोघींनी कपाळावर, तोंडावर जड वस्तूने मारहाण करीत ठेचून मारल्याने या मारहाणीत जबरी जखमी झालेले प्रकाश बोरसे यांना औषधोपचारासाठी रुग्णालयात नेले असता औषधोपचार सुरु होण्या पूर्वीच प्रकाश बोरसे याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जिवे ठार मारण्याच्याच उद्देशाने केलेल्या मारहाणीत प्रकाश बोरसे यांचा खून केल्या प्रकरणी पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भा . द . वि . ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री . बशीर शेख यांचे मार्गदर्शना खाली पोलिस निरिक्षक सी. एम . कदम अधिक तपास करीत आहेत. मयत प्रकाश बोरसे हे कुर्ला येथील पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार या पदावर कार्यरत होते.

-शरद शिंदे

कल्याण आरटीओ परिसरात बेकायदेशीरपणे उभ्या राहिलेल्या टपऱ्या हटवल्या

कल्याण :- बिर्ला कॉलेज जवळील परिवहन प्रादेशिक कार्यालय परिसरामध्ये असणाऱ्या बेकायदेशीर टपऱ्या व अतिक्रमणावर नुकतीच कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या ‘ब’ कार्यालयातील आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी आपल्या पथकासह ३० ते ४० अतिक्रमानावर धडक कारवाई केली आहे. परिसरामध्ये अनेक बेकायदेशीर टपर्‍या लावल्याने लोकांना येण्या जाण्यास आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण केला होता.

चंद्रमणी उपाध्याय यांनी होणाऱ्या त्रासा विषयी प्रशासनाकडे तक्रार केली होती. यानंतर जेसीबी, पोलीस फाटा आणि महापालिका कर्मचारी बाळू शिंदे, म्हात्रे , शेवाळे, महाले आणि पथक कर्मचारी उपस्थित होते. या छोट्याशा पण महत्त्वाच्या कारवाई नंतर रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

-रोशन उबाळे

व्यापाऱ्यांनो प्लॅस्टिक पिशव्या वापरताय तर सावधान! प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात केडीएमसीची सुरू आहे जोरदार कारवाई

कल्याण : प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेने आपली कारवाई सुरू ठेवली असून महानगरपालिकेच्या विविध  प्रभागात प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या पथकांनी गेल्या दोन दिवसात सुमारे १६७  किलो प्रतिबंधित प्लास्टिक विविध दुकानातून जप्त केले आणि १ लाख ६० हजार  इतका दंड संबंधितांकडून आकारला आहे.

डोंबिवली येथील फ आणि ग प्रभागात रेल्वेस्थानक लगतच्या परिसरात ग प्रभाग क्षेत्र अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांनी तेथील नागरिक व व्यापाऱ्यांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करणे बाबत अवाहन करून जनजागृती केली त्याच प्रमाणे फ प्रभागातील भाजी विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. आय प्रभागात ही प्लास्टिक बंदी बाबत सहा. आयुक्त संजय साबळे यांनी व्यापारी संघटना व महिला बचत गट यांची एकत्रित सभा घेऊन त्यांना प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल न वापरणे बाबत सूचना केल्या.

-कुणाल म्हात्रे