Kalyan East मध्ये शिंदेंच्या Shivsena पक्षात अंतर्गत धुसफूस; सर्व पद घेतली काढून

Shivsena Kalyan East : एकनाथ शिंदे यांच्या कल्याण पूर्वेतील शिवसेनेत फार आधीपासूनच अंतर्गत धुसफूस असल्याचे समोर येत आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतर एकनाथ शिंदें सोबत असलेल्या पदाधिकारी वर्गातही गटतट बनल्याने पक्षासाठी हे नुकसानकारक बनले आहे. कोळसेवाडी पोलीस स्थानकात शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राढ्यानंतर आता शिंदेंच्या सेनेने शेवटी कल्याण पूर्वेतील महत्त्वाच्या फळीची कार्यकारिणी बदलून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी गुरुवारी एक परिपत्रक जारी केले असून त्यांनी कल्याण पूर्वेतील पुरुष व महिला उप शहरप्रमुख पर्यंतची सर्व पदे स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे. तर आजवर केलेल्या कामाचा आढावा घेऊन नव्याने मुलाखती घेऊन पुन्हा नव्याने पद नियुक्ती केली जाईल असेही त्यांनी या परीपत्रकात म्हटले आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मागील महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना हा कल्याण पूर्वेतील मोठा पक्ष ठरला होता. पुढे शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने तरीही आपलं पारडं जड ठेवलं. अगोदरच पक्षात गटातटाचे राजकारण असताना त्यातच विधानसभा निवडणुकीत शहर प्रमुखाने बंड पुकारल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. यानंतर आता पुन्हा एक अंतर्गत वाद बाहेर पडल्यानंतर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगेंनी मोठा निर्णय घेत पदांची नवनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण पूर्वेतील अंतर्गत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता खासदारांना विशेष लक्ष द्यावे लागतेय का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. परिस्थिती न बदलल्यास याचा फटका पक्षाला आणि लाभ मात्र इतरांना मिळू शकतो.

Internal dispute within Shinde’s Shivsena party in Kalyan East

Dombivali Ro Ro Boat ने होणार मुंबईचा प्रवास सोपा

Dombivali Ro Ro Boat : रेल्वेची जीवघेणी गर्दी आणि रस्त्यावरील वेळघेणी वाहतूक कोंडी यामुळं डोंबिवलीकर त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता लवकरच डोंबिवलीकरांना मुंबईचा प्रवास जलमार्गाने करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. डोंबिवली मोठागाव जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात झाली असून रो-रो बोटसाठी जेट्टीच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून सुमारे १००० कोटी रुपयांचा डी.पी.आर. तयार करण्यात आला असून प्राथमिक स्वरूपात ८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील डोंबिवली मोठागाव जेट्टीसाठी २२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर डोंबिवलीहून मुंबई, नवी मुंबई, वसई आणि विरार या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या वाहनांसह जलमार्गाने रो-रो बोटीने प्रवास करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन खर्च वाचणार आहे. शिवाय वाहनांमुळे होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होईल. वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणारा असून सागरी परिवहन क्षेत्रालाही मोठी चालना मिळू शकते.

डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, वसई आणि विरार यांना जलमार्गाने जोडणारा हा ऐतिहासिक प्रकल्प नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला सुलभ, वेगवान आणि पर्यावरणस्नेही सिद्ध करू शकतो. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास ही मार्गिका कल्याण शहराला देखील जोडली जाऊ शकते. एका रो रो बोटमध्ये शेकडो प्रवासी आपल्या वाहनांसह प्रवास करू शकतात. सध्या ही सेवा मुंबई ते भाईंदर येथे सुरू असून चारचाकी वाहन धारकांना २४० रुपये तर दुचाकी धारकांना ६० रुपये तिकीट आकारले जात आहे. या प्रवासातून पैसे, वेळ, इंधनाची बचत होत असून वाहतूक कोंडी व प्रदूषणमुक्त प्रवास डोंबिवलीकरांना करता येणार आहे. सागरी मार्गाने सुरू होणारी ही परिवहन सेवा येत्या काळात क्रांती घडवून आणू शकते.

Travel to Mumbai will be easier with Dombivali Ro Ro Boat

कल्याण डोंबिवलीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना; रवींद्र चव्हाण यांची प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा

डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण, डोंबिवली विभागातील खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रत्येक लाभार्थी घटकाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना माजी मंत्री तसेच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुंंबईतील अधिकाऱ्यांना दिले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात किती अंमलबजावणी झाली? आणि करायची असेल तर ती कशा पध्दतीने करता येईल? लाभार्थींना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल? तसेच कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, या दृष्टीने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी अश्विनी जोशी, तहसीलदार विजय वाकोडे, साहाय्यक अधिकारी हर्षद घोटेकर उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात कल्याण डोंबिवली पालिकेसह, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था भागात ही योजना तातडीने राबविण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तेथे या योजनेचा विनाविलंब शुभारंभ करावा. या योजनेतून खरा लाभार्थी अजिबात वंचित राहता कामा नये. प्राधिकरणाच्या अन्य क्षेत्रातही खासगी, शासकीय जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे, गतिमानतेने राबविता येईल यासाठी प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरू कराव्यात. या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे येत असतील तर त्याचे शासन पातळीवर निराकरण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आमदार रवींद्र चव्हाण यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही ही योजना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले.

Slum rehabilitation scheme in Kalyan Dombivali; Ravindra Chavan discusses with authority officials

Vitthalwadi Police : पासपोर्ट पडताळणीसाठी आलेला निघाला बांगलादेशी

Vitthalwadi Police : उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात १५ फेब्रुवारी रोजी एका बांगलादेशी इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. जोहरुल शेख (वय ३३ वर्षे) हा इसम बांगलादेशहुन घुसखोरी करून भारतात शिरला होता. पासपोर्ट पडताळणी करिता बनावट कागदपत्रांसह सदर इसम पोलीस स्थानकातील गोपनीय कक्षात आला असता त्याच्याजवळ असलेल्या बनावट कागदपत्रांमुळे तो पकडला गेला. यानंतर तो भारतीय नसून बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले.

विठ्ठलवाडी पोलीस स्थानकातील गोपनीय कक्षात नियमितपणे काम करणाऱ्या महेंद्र भोई, दिनेश शिर्के, चेतन खांबेकर, संतोष कुडले या पोलीस कर्मचाऱ्यांसमोर शनिवारी एक इसम कागदपत्रे घेऊन पासपोर्ट पडताळणी करिता आला होता. सदर इसमाला हिंदी भाषा येत नसल्याने तो बंगालीतच बोलत होता. त्याने दिलेल्या कागदपत्रांमध्ये पोलिसांना त्याने दिलेला जन्म दाखला संशयास्पद आढळून आला. सातवी शिकलेल्या जोहरुलने स्वतःच्या हाताने तो बनवला असावा असा संशय पोलिसांना आला. शिवाय जन्म दाखल्याचा कागद हा त्याच्या जन्माच्या वेळीचाही वाटत नव्हता. हाच नवा कोरा बनावट जन्मदाखला पोलीसांच्या नजरेत आला आणि पोलिसांनी जोहरुलची झाडाझडती सुरू केली.

जोहरुल बंगालीत बोलत असल्याने पोलिसांनी तात्काळ बंगाली भाषिकाला बोलावून घेतले. जोहरूलचा मोबाईल फोन तपासला असता त्यात बांगलादेशी नंबर आढळून आले. व्हॉट्सअप वरूनच अगोदर डाईल केलेल्या नंबरवर पुन्हा कॉल केले असता समोरून सदर इसम बांगलादेशी असल्याचे सांगत त्याचा पत्ताही पोलिसांना दिला. यानंतर पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेत त्याचा पुढील तपास सुरू केला आहे.

अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोरी वाढली असून कोलकत्तासह मुंबई व उपनगरात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने हे आश्रय घेत आहेत. आशेळे, माणेरे तसेच कल्याण शहराबाहेर असलेल्या ग्रामीण पट्ट्यात नव्याने उभ्या राहणाऱ्या चाळींमध्ये हे बांगलादेशी आश्रय घेत असल्याच्या जोरदर चर्चा आहेत. असे असल्यास अनेकांनी बनावट कागदपत्रे बनवली असण्याची शक्यताही आहे. असाच एक इसम पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. असे अजून किती बांगलादेशी शहरात लपले आहेत याची विशेष शोधमोहीम तसेच जनजागृती करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.

Vitthalwadi Police : Bangladeshi intruder arrested during passport verification

ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील EVM मशिन्सची होणार Checking

EVM Checking : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक उमेदवारांनी निकलांवर संशय व्यक्त करून ईव्हीएम मशीनच्या तपासणीची मागणी केली आहे. यासाठी आवश्यक असणारा भरणा देखील त्यांनी केलेला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील १० विधानसभा क्षेत्रांतील ईव्हीएम मशिन्सची पडताळणी १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातून जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पडताळणीची मागणी करणाऱ्या पराभूत उमेदवारांसह बैठक आयोजित करण्यात आली होती.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनच्या ब्रँट मेमरी/मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी संदर्भात बेल कंपनीच्या नियोजनावर आज बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगलोर (BEL) यांच्याकडून तपासणी व पडताळणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच, संपूर्ण प्रक्रिया निवडणूक प्रतिनिधी व उमेदवारांना समजावून सांगण्यात आली.

आयोजित बैठकीत उमेदवारांनी एकमताने या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण त्रुटींची आणि अनुत्तरित प्रश्नांची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. उमेदवारांना अपेक्षित असलेली पारदर्शक प्रक्रिया नसेल किंवा त्यांच्या शंकांचे समाधान न झाल्यास या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल असाही ईशारा यावेळी उमेदवारांकडून देण्यात आला.

उमेदवारांच्या मागणीनुसार पडताळणी केली जाणारे विधानसभा क्षेत्र :-

1धनंजय बोडारे १४२, कल्याण पूर्व
2सचिन बासरे१३८, कल्याण पश्चिम
3राजू पाटील, सुभाष भोईर१४४, कल्याण ग्रामीण
4दीपेश म्हात्रे१४३, डोंबिवली
5सुभाष पवार१३९, मुरबाड
6पांडुरंग बरोरा १३५, शहापूर
7राजन विचारे१४८, ठाणे
8केदार दिघे१४७, कोपरी पाचपाखाडी
9मनोहर मढवी१५०, ऐरोली
10संदीप नाईक१५१, बेलापूर

शिवसेना उबाठा पक्षाचे डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे काय म्हणाले? पहा खालील लिंकवर

https://www.facebook.com/share/r/1N1rML3Fub

Checking of EVM machines in Assembly elections in Thane district will be start from February 10

Ganesh Vidya Mandir शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लंगडी संघात निवड

Ganesh Vidya Mandir : शिर्डी व कोपरगाव येथे नुकत्याच राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा पार पडल्या. शिर्डी येथे १८ वर्षे वयोगटा खालील तर कोपरगाव येथे १४ वर्षाखालील मुलांची स्पर्धा पार पडली. या स्पर्धांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत १४ वर्षाखालील मुलांचा संघ उपविजेता ठरला. यानंतर आता १८ वर्षाखालील मुलांची राष्ट्रीय लंगडी स्पर्धा आंध्र प्रदेश येथे व १४ वर्षाखालील मुलांची राष्ट्रीय लंगडी स्पर्धा तामिळनाडू येथे होणार आहे. या दोन्ही वयोगटात होणाऱ्या स्पर्धेत कल्याणच्या गणेश विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले असून ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे.

महाराष्ट्राच्या १८ वयोगटा खालील संघात गितेश काकडे व लवेश क्षेत्री तर १४ वर्षाखालील संघात साईराज मळेकर यांची निवड करण्यात आली आहे. नागरीक सेवा मंडळ संचलित गणेश विद्यामंदिर या शाळेत शिक्षणासह त्यांचे कला,गुण व खेळाला महत्त्व दिले जाते. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थी मोठी मजल मारतात अशा भावना यावेळी शाळेचे शिक्षक मिलिंद धंबा यांनी व्यक्त केल्या. सदर विद्यार्थ्यांना त्यांनी लंगडी खेळ तसेच स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले असून ते स्वतः लंगडीचे राज्य पंच आहेत.

शाळेच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान बोरसे, सेक्रेटरी दीपक पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्मिता मराठे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पांजली शेनवी यांच्यासह प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी महाराष्ट्र संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली लंगडी असोसिएशनचे सचिव प्रवीण खाडे, कार्याध्यक्ष अविनाश नलावडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेले गितेश काकडे, लवेश क्षेत्री, साईराज मळेकर व मार्गदर्शक शिक्षक मिलिंद धंबा यांचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Selection of students from Ganesh Vidya Mandir School in Maharashtra Langdi team

MSRTC Union : रापम ठाणे विभागात एकनाथ शिंदेंच्या कामगार संघटनेचा झंझावात

MSRTC Union : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील ठाणे १, ठाणे २, कल्याण, विठ्ठलवाडी व वाडा आगारानंतर मुरबाड व शहापूर आगारात एकनाथ शिंदेंच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेने जोरदार संघटना बांधणी केली आहे. किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळामध्ये सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये सभासद वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्यानेच मुरबाड शहापूर आगारातील ५० हून अधिक कामगारांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये प्रवेश केला आहे.

मुरबाड आगारात एकनाथ शांताराम मोरे, जितेंद्र भराडे, रामचंद्र खुडके, संतोष हेमाडे, जिवन कापडी, अमोल देशमुख व अशोक पालवे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय कर्मचारी सेनेत जाहीर प्रवेश केला. तर शहापूर आगारात रमेश कुडव, राजेंद्र विशे, रोहिदास भालके, राहुल पडवळ, रविंद्र जागले, शशिकांत धापटे, जब्बार पठाण, प्रविण पाटोळे, राजेश पाटील, ज्ञानेश्वर लोहकरे, विजय घुडे, बाबुराव मोजे, दिनेश भोजणे आदींनी प्रवेश केला.

संघटना प्रवेशदरम्यान पंकज वालावलकर, दत्ता अडागळे, स्वप्नील गुरव, योगेंद्र कदम, गणेश तावडे, नितीन खंडागळे, प्रभाकर कानगुले व बाळू शरणागत यांनी मुरबाड व शहापूर आगारात दौऱ्या दरम्यान भेट दिली. आगारातील कामगाराच्या समस्या, अडचणी ऐकून घेतल्या व त्याबाबत कामगारांना योग्य मार्गदर्शन करून त्याच्या शंका दूर करण्यात आल्या. त्याच बरोबर राष्ट्रीय कर्मचारी सेनेची ध्येय धोरणे सांगितली असल्याची माहिती यावेळी संघटनेचे पदाधिकारी योगेंद्र कदम यांनी एमएच मराठीशी बोलताना दिली.

Eknath Shinde’s workers’ Union clash in MSRTC Thane division

Thakurli bridge : ठाकुर्ली उड्डाणपूलाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा

Thakurli bridge : डोंबिवलीचे आमदार व भाजप प्रदेश कार्यध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महानगर पालिका प्रशासनास डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स.वा. जोशी शाळेसमोरील उड्डाणपुलाच्या म्हासोबा चौकापर्यंतच्या विस्ताराचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पुलामुळे बाधित ६० रहिवाशांना पर्यायी घरांची वाटप पत्रे (अलॉटमेंट लेटर) वितरित करण्याचा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाने आज दुपारी तीन वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे.

सदर पुलामुळे विस्थापीत होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सदर उड्डाणपुलाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता काम वेगाने पूढे जाईल असे चव्हाण म्हणाले.

Clear the way for remaining work of Thakurli bridge

उधारीच्या दुनियेतले साम्राज्य

उधार मागणे म्हणजे भीक मागणेच!

मिरची झोंबावी असं हे वाक्य आहे. होय पण हेच खरे आहे. उधार मागणे म्हणजे थोडक्यात तात्पुरत्या स्वरूपात मागितलेली भीकच. तात्पुरत्या का? तर आपण घेतलेले पैसे हे परत करणार असतो म्हणून. तात्पुरती पडलेली नड भागविण्यासाठी कुणाकडून तरी आपण कधी ना कधी पैसे घेत असतो. उधार घेणे हे काही गैर आहे हे असे अजिबात नाही. कारण प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा उधार घेण्याची गरज पडते. गडेगंज पैशावाल्या माणसालाही कोणत्यातरी गोष्टी साठी हात पसरावेच लागतात. पण जर काहींना ही उधारी मागण्याची सवय जडली असेल तर ती मात्र एक घाणेरडी सवय. आणि त्यात घेतलेले पैसे वेळेवर न देणे आणि समजा न देताच बुडवले तर? या सगळ्या उधारीच्या दुनियेची ही आज आपण गोष्ट करणार आहोत. अवश्य वाचा शेवट पर्यंत.

पूर्वीच्या काळी जगण्यासाठी माणूस स्वतः मेहनत करून स्वतःचे अन्न स्वतः मिळवत होता. मूलभूत गरजा भागविण्यासाठी पुढे प्रत्येकाने काम वाटून घेतले आणि एकमेकांना वस्तूंची आदान प्रदान केली. उदा.शेतकरी शेती करून पिकवलेले अन्नधान्य घेऊन शिंप्याकडे जाई आणि त्या बदल्यात कपडे घेई. शिंप्याला देखील कपड्याच्या बदल्यात अन्नधान्य मिळे. परंतु वस्तूंची किंमत कमी जास्त असल्याने पुढे चलन अस्तित्वात आले आणि इथूनच आले पैशाला महत्त्व.

पुढील अनेक वर्षे पैशाला फारसे मोल नव्हते. मात्र अलिकडल्या काळात पैशाला माणसापेक्षा जास्त किंमत आली आहे. श्रीमंत होण्यासाठी, सर्व सुविधांचा उपभोग घेण्यासाठी पैसा असणे महत्त्वाचे आहे हा समज आता रूढ झाला आहे. किंबहुना तो खराही आहे. ज्याच्याजवळ जितका पैसा तशी त्याची लाइफस्टाइल. यावरून श्रीमंत आणि गरीब असे दोन वर्ग तयार झाले. आज आपण स्वतःला ने मिडल क्लास म्हणवतो त्यातही दोन प्रकार मोडतात. एक म्हणजे पैसा बाळगून असलेला आणि दुसरा कर्जबाजारी झालेला. आता याच दोघांमधील जो दुवा आहे त्याबद्दल थोडं बारीक समजून घेऊयात.

ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात असे लोक कधीही उधारी मागत नाहीत. पण काहीवेळेस चुकून समजा सोबत पैसे घ्यायला विसरले किंवा आजच्या ऑनलाइन युगात कोड स्कॅन करण्यासाठी काही अडथळा येत असेल तर अशा लोकांना नाईलाजाने उधारी घ्यावी लागते. पण अशा लोकांना डोळे झाकून उधारी देतात कारण लागलीच परत मिळण्याची खात्री असते. पण त्याचं काय ज्यांच्याकडे पैसाच नाही? परिस्थितीने जर डोके वर काढू दिले नसेल तर अशा व्यक्तीला उधारी मागण्याचा नाईलाज असतो. अर्थात सुरुवातीलाच आपण म्हटलो आहे की उधारी मागणे गैर नाही. मग नेमकं चुकीचं काय आहे? तर जाणून बुजून परिस्थिती स्वतः आपणहून खराब करणे आणि उधारी मागण्याची सवय लावून घेणे. याच प्रकारातल्या लोकांबद्दल थोडं माहीत करून घेणार आहोत.

आजच्या पुरता विचार करून जगणारे उधारीच्या मार्गावरून अजिबात हटत नाहीत. त्यांना या गोष्टीची कसलीही शरम नसते. किंवा त्यांना या गोष्टीची सवय लागलेली असते. याच जगण्याला ते जीवन मानतात. ते एक ना अनेक उधाऱ्या करून ठेवतात. शिवाय केलेल्या काही उधाऱ्या बुडवूनही टाकतात. यात काही हितसंबंध खराब तर करून घेतातच शिवाय नावालाही बट्टा लावून घेत नशिबाला दोष देतात. आपण जे करतोय ते चुकीचं आहे असे त्यांना कधीच वाटत नाही. परिस्थिती भाग पाडते अशी मनाची समजूत काढून ते आला दिवस लोटून देतात.

घेतलेले पैसे फेडण्यास असमर्थ ठरलेले काही लोक तर पहिले कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज उचलतात. कर्ज कसे फेडू शकतो? याचे यांना काहीच माहीत नसते तात्पुरती नड भागावी हा एवढाच तात्पुरता विचार करून ते आणखीन एक डोंगर डोक्यावर चढवून ठेवतात. आणि मग होतं काय परिस्थिती आणखीन बिकट होत जाते. मग एक दिवस गोचिडाकडून गैरव्यवहारी कर्ज उचलावे लागते. गोचीड म्हणजे काय? तर अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे देणारे मंडळी. लाखभर रुपयांची उचल केल्यानंतर 5-10% प्रतिमाह व्याजदराने हे पैसे देतात. त्याकरिता समोरच्याची किंमती वस्तू ठेऊन घेतात. कर्ज घेणारा एक रक्कमी कर्ज फेडू शकत नाही. बऱ्याचदा तर व्याजाचे पैसे फेडणेही त्याला अशक्य होऊन बसते. पुढे जाऊन त्या व्यक्तीकडून चक्रवाढ व्याजाच्या नावाखाली प्रतिदिन व्याज लावले जाते. परतावा न केल्यास वस्तू ठेऊन घेणे, दमदाटी करणे, वेळ पडल्यास मारहाण करणे अशाही गोष्टी घडतात. बिचाऱ्याला पैसे फेडता न आल्याने त्याची वस्तूही हातातून निघून जाते. थोडक्यात पूर्वी जे जुलुमी सावकारी चालायची ती अजूनही काही ठिकाणी संपलेली नाही. नियमबाह्य पद्धतीने कसलेही गणिती ज्ञान नसलेले व्याजदर लावून फक्त लुटपाट केली जाते. म्हणून व्हायचं ते होऊद्यात पण अशा गोचिडाच्या तावडीत फसू नका. हळूहळू करून तुमचं रक्त पिणे हेच काम त्यांना ठाऊक असते.

अतिमहत्त्वाच्या विषयाकडे आपण आता आलेलो आहोत. आपल्याकडे कुटुंब पद्धत आहे. कुटुंब म्हणजे काय तर आई वडील भाऊ बहीण बायका मुलं. एका पूरुषाच्या खांद्यावर त्याचं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी असते. आजच्या युगात तर महिलाही ती जबाबदारी उचलतात. आता या कुटुंब पद्धतीने जगत असताना प्रत्येक जण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी झटत असतो. भवितव्यासाठी, मुला, मुलींचे शिक्षण लग्न, दवाखाना, हौसमौज यासाठी पैसे उभे करीत असतो. म्हणजे थोडक्यात काय तर तो कुटुंबाचे आर्थिक नियोजन करीत असतो. यात जर त्याच्याकडे एखाद्याने उधारी मागितली तर तो शक्य असेल तर देतोही. पण जर त्याला ती वेळेवर परत मिळाली नाही तर मात्र याचे नुकसान म्हणून त्याच्या कुटुंबाला ते सोसावे लागते. त्यामुळेच सर्वांचेच कुटुंब आहे. जो तो त्याचे नियोजन करीत असतो. तुमच्या उधारीमुळे नकळत तुम्ही दुसऱ्याच्या कुटुंबाचेही आर्थिक गणित बिघडवून टाकता.

याउलट काय करता येईल? तर सर्वप्रथम उधारी घेण्याची सवय सोडायला हवी. आधी घेतलेली उधारी परत करावी मग स्वतःची हौसमौज बघावी. कारण तुम्हाला पैसे देणारा लवकर परत मिळण्याची आस लावून असता. तुम्ही उधारी रखडवता म्हणजे उधार घेणाऱ्याला अंधारात ठेवता. तुम्हाला त्याने वेळेवर केलेल्या मदतीची जाण नसते. तुम्हाला तुमच्या निरर्थक गोष्टींवरचा खर्च बंद करावा लागेल. परिस्थिती बदले पर्यंत दिखाव्याच्या मागे न जाता अंथरून आहे तितकेच पाय पसरवावे. आणि दुसरीकडे चार पैसे कसे जास्त कमवता येतील यासाठी मेहनत करावी. इकडून तिकडून घेतलेले पैसे व्यवस्थित नियोजन करून परत करावे. ज्यादिवशी संपूर्ण देणी संपतील तेव्हा तुम्ही उधारी घेणारे नाही तर उधारी देणारे व्यक्ती बनला आहात याची तुम्हाला जाणीव होईल.

आता इथे कुणालाही उधार देण्याची चूक करू नका. माणुसकी म्हणून तुम्ही दुसऱ्याला उधार देता. पण तुमचेच पैसे तुम्हाला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. तुम्ही कुणाची उधारी लांबवली असेल तर तुम्हाला नक्कीच ते माहीत असेल. जो व्यक्ती खूप उधाऱ्या करतो, बुडवतो, रखडवतो. पैसे न कमवता कशावरही उडवतो अशा व्यक्तीला उधारी बिलकुल देऊ नका. परिस्थिती खूपच बेताची असेल, खूपच अडचण असेल, परत मिळण्याची खात्री असेल आणि तुमच्याकडेही अतिरिक्त असतील तर माणुसकी म्हणून द्यायला हरकत नाही. पण उधारीची सवय असलेल्या उधारखोराला पैसे देण्याची चूक अजिबात करू नका. तुम्ही कष्टाने कमवता, तुमचे कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी स्वतःला अडकवून घेऊ नका. हाताशी आलेला पैसा आजच्या पुरता विचार करून उडवू नका तो उद्यासाठी जपून ठेवा. कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही निदान इतके तरी पैसे जवळ ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहा.

रमेश आणि सुरेश दोन मित्रांपैकी एका मित्राला रमेशला ४० हजार पगार आहे. आणि दुसऱ्या मित्राला सुरेशला त्याच्या निम्माच. पण गंमत अशी आहे की ४० हजार पगार असूनही तो महिन्याच्या शेवटी हजार रुपयांची उधारी हमखास बनवतोच. का बरं असे? वीस हजार पगार असणारा हजार रुपये उधारी कसे देऊ शकतो?

ज्याच्याकडे वीस हजार पगार आहे त्या सुरेशला उधारी मागणे पटत नाही. कुणापुढे हात पसरावे लागतील अशी वेळ येऊ नये याची तजवीज त्याने केलेली असते. दरमहा घरखर्चाला घरी दहा हजार रुपये देऊन त्याच्याकडे दहा हजार उरलेले असत. त्यातलेही तो पाच हजार स्वतःसाठी वापरी. त्यात मग त्याचे काही मजाहजा, खरेदी सगळं आलंच. आणि उरलेले पाच हजार तो पद्धतशीरपणे सेविंगला सोडत. रमेशचं मात्र तसं नाही. रमेशला पगार चाळीस हजार असला तरी महिन्याला त्याच्या सुट्ट्या होत असत. त्यामुळे तिथेच पाच हजार त्याचे कापले जाई. ज्या दिवशी सुट्ट्या होई तेव्हा रमेश कुठेतरी मजाहजा करण्यासाठी गेलेला असे. त्यामुळे त्याचे तिथे चार पाच हजार आरामात खर्च होई. पुढे रमेशची महागडी बाईक जीचा वापर फारसा होत नाही. कारण रमेश तर रेल्वेने प्रवास करी. सुट्टीच्याच दिवशी काय वापर होईल तेवढाच. बाकी ती बाईक फक्त हप्ते भरण्यासाठीच त्याने विकत घेतली समजा. आणखीन एक ईएमआय म्हणजे रमेशच्या खिशातल्या टॉप मॉडेल आयफोनचा. थोडी श्रीमंती दिसावी म्हणून रमेशने तोही हप्ता बांधलाच होता. सुरेश प्रमाणे घरात खरखर्चाला तोही दहा हजार देतच होता. आता त्याचं गणित कसं बिघडले बघा. सुट्ट्यांमुळे त्याच्या हातात येई 35 हजार. त्यातले हप्त्यांना गेले 15 हजार, घरात दिले 10 हजार. उरलेले 10 हजार रमेश असेच मजेहजेसाठी खर्च करी. मग ते स्टारबक्समध्ये जाऊन कोफी पिऊ, की बर्गर किंग मध्ये जाऊन पिझा चावू. का विकेंडला मित्रांमध्ये दोन दोन बडवायजर ढकलो. सोबत चकण्याला कबाब, तंदुरी, लॉलीपॉप. मज्जोनी लाईफ. अशी लाइफस्टाइल रमेश जगत असेल तर शेवटच्या विकेंडनंतर रमेश मोकळा होऊन जात. मग त्याला गरज पडे सुरेशची. मित्र पैशावाला आहे, शिवाय पगार झाला की आपल्याला फिक्स रिटर्न करणार यामुळे उधारी द्यायला काही चिंता नव्हती.

चिंता करावी तर रमेशनेच करावी. श्रीमंत दिसण्यावर व लाइफस्टाइल जगण्यावर तो जो काही खर्च करतोय तो त्याचा बेजबाबदारपणा आहे. पुढे जाऊन रमेश आणि सुरेश दोघांचीही नोकरी जाते. 5-5 हजार बाजूला काढून सुरेशकडे लाखभर रुपये जमलेले असतात. श्रीमंत लाइफस्टाइल साठी घालवलेल्या पैशामुळे मात्र रमेशच्या खात्यात फक्त चाळीस हजारच असतात. ईएमआय भरून घेतलेला आयफोन आता जुना झालेला असतो. अर्धी किंमतही द्यायला कुणी तयार नसतो. घेतलेली स्पोर्ट्स बाईक एवढं पेट्रोल पिते की रमेशला पायी पायी जाणं योग्य वाटायला लागतं. नवी नोकरी मिळेपर्यंत चाळीस हजारात कसे गुजराण करावे या विचारात रमेशला वेड लागायची पाळी येते. याउलट सुरेशचा कसलाही मोठा खर्च नसतो. शिवाय लाखभर रुपयात तो वर्षही आरामात काढू शकतो.

सांगायचं तात्पर्य हेच की आजचा विचार न करता उद्यासाठीची तजवीज करून ठेवा. वेळ काळ सांगून येत नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. विचारांना मोठे करा. जीवनात चढ आणि उतार या दोन्ही गोष्टी असतातच. सर्व गोष्टींची तयारी ठेवा. परिस्थिती बदलत नाही म्हणून नशिबाला दोष देऊन रडत बसू नका. ती बदलण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करा. सौ बात की एक बात, तुमचे कर्म चांगले ठेवा. कारण तुम्ही आज जे काही करणार आहात त्याचेच परिणाम तुम्हाला उद्या दिसणार आहेत. धन्यवाद !!!

विचार पटले तर आचरणात आणून बदल बघा, नाहीतर आहे तसेच उधारी मागून रडत जगा.

टीप : या लेखातून आजच्या सत्य परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. सत्य हे कडवट असल्यामुळे अनेकांना ह्या लेखामुळे कारल्याची चव चाखायला मिळाली असेल. म्हणजेच बोचलं असेल. हा लेख परिस्थितीमुळे हतबल होऊन उधारी घेणाऱ्यांसाठी नसून उधाऱ्या घेऊन स्वतःहूनच आपली परिस्थिती हतबल बनवणाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी होता. बाकी तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा.

लग्न समारंभासाठी कल्याणहुन गावी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; पती पत्नीसह चिमुरडीचा अपघात

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील नांदीवली येथे वास्तव्यास असणाऱ्या घुघे परिवाराचा सोमवारी दि.२० जानेवारी रोजी दुर्दैवी अपघात झाला. अमोल घुघे (वय २५) हे आपली पत्नी प्रतीक्षा घुघे (वय २२) व आपली मुलगी स्वरा घुघे (वय ४) यांच्या समवेत कल्याणहून आपल्या गावी जायला निघाले होते. त्यांनी नुकतीच नवीन रिक्षा घेतली होती व त्याच रिक्षाने ते गावी निघाले होते. याचदरम्यान नाशिक जिल्ह्यातील घोटी सिन्नर महामार्गावर त्यांचा भीषण अपघात झाला.

नाशिक जिल्ह्यातील स्थानिक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार घुघे परिवार व त्यांच्या समवेत त्यांचे सासरे मार्तंड आव्हाड (वय ६०), सासू कलावती आव्हाड (वय ५८) रिक्षाने प्रवास करीत होते. याचदरम्यान ओव्हरटेक करताना रिक्षाचालक अमोल यांना समोरून येणारा कंटेनर न दिसल्याने हा अपघात घडला. या अपघातात अमोल घुघे यांच्या सह त्यांची मुलगी स्वरा व त्यांचे सासरे मार्तंड आव्हाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पत्नी प्रतीक्षा घुघे व सासू कलावती आव्हाड या मायलेकी गंभीर जखमी असून त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर कंटेनर चालक राहुल कुमार प्रजापती (वय २८, झारखंड) हा सध्या वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस या अपघाताचा सखोल तपास करीत आहेत. मात्र झालेल्या अपघातानंतर घुघे व आव्हाड या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अमोल हे एका नामांकित वित्तसंस्थेत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होते. कुटुंबाच्या भवितव्यासाठी त्यांनी नुकतीच १ जानेवारीला नवी रिक्षा खरेदी केली होती व याच रिक्षाने ते प्रवास करीत होते. दुर्दैवाने याच रिक्षाने त्यांच्या जीवन प्रवासाचाही शेवट ठरला. या दुर्घटनेमुळे नातेवाईक, शेजारीपाजारी व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

A family traveling from Kalyan to Nashik died in an accident on the highway