मोबाईल टॉवरसाठी लागणारे महागडे मशीन चोरणारी टोळी गजाआड; कल्याण क्राईम ब्रँचचा यशस्वी शोध

मोबाईल टॉवरच्या केबल कनेक्शनसाठी लागणाऱ्या महागड्या मशीनची ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत. कल्याण क्राईम ब्रांचने यशस्वीरित्या अशा चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून तिघा जणांना तुरुंगाची हवा दाखवली आहे.

गुन्हे शाखा घटक ३ कल्याणकडून करण्यात आलेल्या तपासात मोबाईल टॉवर संबंधित महागडं मशीन चोरणारी टोळी गजाआड झाली आहे. मशीन चोरीचे गुन्हे विविध पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले होते. या प्रकारच्या चोरीचे गुन्हे वाढत असल्याने क्राईम ब्रांचची डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हवालदार दत्ताराम भोसले यांनी गोपनीय महितगारामार्फत गुप्त माहिती काढली आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत सखोल तपास केला. या तपासा नंतर तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. कैलास सावंत, अकबर शेख आणि संजय सौदे अशी तिघांची नावं असून तिघेही उल्हासनगर येथील राहणारे आहेत.

अटक केलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी स्लायसिंग मशीन, ओटीडीआर मशीन, लेझर लाईट पॉवर मीटर अशा विविध प्रकारच्या महागड्या मशिन्स चोरी केल्याचे कबूल केले आहे. या नंतर कल्याण तालुका पोलीस ठाणे, हिललाईन पोलीस ठाणे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. याशिवाय आणखी गुन्ह्यांची देखील उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त जयजीत सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अप्पर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त एन टी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण एम दायमा, पोलीस उप निरीक्षक नितीन मगदूम, मोहन कळमकर, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिलारे, सचिन साळवी, मंगेश शिर्के, हरिश्चंद्र बांगरा, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, गुरुनाथ जरग या सर्वांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.

-संतोष दिवाडकर

क.डों.म.पा.च्या बारावे आणि उंबर्डे कचरा प्रकल्पात पाणीच पाणी

आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी केडीएमसीच्या वतीने विविध ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र आणि कचरा वर्गीकरण केंद्र उभारली असून रात्री झालेल्या पावसामुळे हे कचरा प्रकल्प पाण्यात गेले आहेत.  कल्याण मधील बारावे आणि उंबर्डे येथील या प्रकल्पांमध्ये पाणी साचल्याने हे प्रकल्प नियमांचे  उल्लंघन करून बांधले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

बारावे येथे उभारण्यात आलेला कचरा वर्गीकरण प्रकल्प कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एन.जी.टी कोर्टाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत हा प्रकल्प बारावे येथे चालू केला आहे. घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांनी नागरिकांना आश्वासन दिले होते की सर्व नियमांचे पालन करून हा प्रकल्प येथे चालवला जाईल परंतु या ठिकाणी कचराच कचरा अस्तव्यस्त पडलेला आहे यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही महापालिकेने लावलेल्या सर्व मशिन्स बंद आहेत.

केडीएमसी आयुक्तांनी आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करून एका ठिकाणी नागरिकांना दिलासा दिला तर दुसऱ्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून प्रकल्प चालु केला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या प्रकल्पाला विरोध नसून सर्व नियमांचे पालन करून तो झालाच पाहिजे मात्र हे प्रकल्प नागरिकांच्या जीवावर बेतता कामा नये अशी प्रतिक्रिया बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

मोहिली उदंचन केंद्रात पाणी शिरल्याने कल्याण डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम

मागील चार-पाच दिवसांपासून पडत असणारया मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी उल्हास नदीकिनारी असलेल्या केडीएमसीच्या मोहिली उदंचन आणि जलशुद्धीकरण केंद्रामध्ये गुरुवारी पहाटे रोजी उल्हास नदीचे पाणी शिरल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

ही केंद्र बंद असल्यामुळे संपूर्ण ‘अ’ प्रभाग, ब प्रभागातील बिर्ला कॉलेजच्या बाजूच्या परिसर आणि वालधुनी भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर मोहीली उदंचन केंद्रातील पाणीपुरवठा बंद केल्याने डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम भागांचा पाणीपुरवठा पहाटे तीन वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, क प्रभागक्षेत्र परिसरात  पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. मोहिली जलशुद्धीकरण केंद्र आणि  मोहिली उदंचन केंद्रामध्ये साचलेले पाणी ओसरल्यानंतर आवश्यक ती दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

आषाढी एकादशी निमित्त सिद्धार्थ विद्या मंदिर मध्ये रंगला पालखी सोहळा

कल्याण पूर्वेतील विद्यार्थी सहाय्यता प्रतिष्ठानचे सिद्धार्थ विद्या मंदिर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त शाळा स्तरावर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे. त्यानिमीत्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन, तुळशी पूजन करून सोहळयाची सुरवात करण्यात आले.

 शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना शेवाळे व ज्योत्स्ना चाळसे यांनी दीपप्रज्वलन केले. विठूरायाची आरती गायन सर्व शिक्षकांनी केले. यावेळी हनुमंता पावडे यांनी एकादशीची सुरवात केव्हा व कशी झाली आणि उपवास का केला जातो, याविषयी माहिती दिली. तर अशोक काठे यांनी आपल्या मधुर वाणीने अभंग व गवळणीची गायन केले. शेवटी प्रासादिक अभंगांचे  गायन करून प्रसाद वाटप करण्यात आले. त्यांना शर्मिला साळुंके आणि रामदास चौरे यांनी साथ दिली.

यावेळी विठूनामाच्या गजरात सर्व शिक्षकांनी फेरा धरला, फुगडी खेळली त्याचबरोबर पालखी नाचवली अशा पध्दतीने शाळेतच पंढरपूर अवतरल्याचा अनुभव सर्वांना घेतला. या पारंपरिक सोहळ्याचे सूत्रसंचालन शर्मिला साळुंके यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार चौधरी सर यांनी मानले.

-कुणाल म्हात्रे

“तर अधिकाऱ्यांच्या घरासमोर उपोषण करणार”- कल्याण पूर्व १०० फुटी रोडमुळे बेघर होणाऱ्या नागरिकांचा पालिका प्रशासनाला इशारा

येत्या आठ दिवसांत केडीएमसीकडून ठोस आश्वासन न मिळाल्यास अधिकाऱ्यांच्या घरासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोड मध्ये बाधित होणाऱ्या फ्रेंड्स कॉलोनीतील रहिवाशांनी दिला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सुमारे १०० कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर असून कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडचे चुकीचे अलाईन्मेंट बनविल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत येथील नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देत रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र वारंवार निवेदन देऊन सुद्धा पालिकेच्या वतीने या घरांवर कारवाई न होण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने यासाठी जवाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

डिसेंबर २०२० पासून मलंगगड रोड ते उल्हासनगरकडे जाणारा १०० फुट रोडचे चिंचपाडा हद्दीत रस्ता वनविण्यास सुरवात केली असून, हा रस्ता चुकीच्या रोड अलाईन्मेंट प्रमाणे बनविण्यास घेतल्याचे येथील नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याबाबत  पालिकेकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार केला. त्याचप्रमाणे दोन वेळा आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेवून या रस्त्याचे काम चुकीचे होत असल्याची माहिती त्यांना दिली.

 त्या अनुशंगाने आयुक्तांनी कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांना सुचना देवून प्रशांत भुजबळ यांना प्रत्यक्ष जागेवर जावून दोन्ही इमारती मधील मोकळया जागी असलेल्या २८ मीटर मध्ये पूर्णपणे रस्ता बनविण्याची सुचना केली. त्यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील हजर होते. मात्र आयुक्तांनी केलेल्या सूचनाचे पालन व अमनवजावणी न करता उलट मनमानी पद्धतीने चूकीचे काम करून १०० कुटूंबाना बेघर करण्याचा प्रयल होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणात आयुक्तांनी  लक्ष घालून करधारक नागरीकांना न्याय देण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली असून याबाबत फ्रेंड्स कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. मात्र वारंवार निवेदन देऊन देखील ठोस आश्वसन मिळत नसल्याने येत्या आठ दिवसांत येथील रस्त्याबाबत निणर्य न झाल्यास कार्यकारी अभियंता सुनिल जोशी आणि उप अभियंता प्रशांत भुजबळ यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.

दरम्यान याबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता, सबंधित अभियंत्यांना नागरिकांच्या मागणीची पडताळणी करण्यास सांगितले असून,  अलाईन्मेंट मध्ये काही बदल करून जर नागरिकांची घरे वाचवता येत असतील तर तसा आम्ही प्रयत्न करू त्याबद्दलच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना   केल्या असल्याची प्रतिक्रिया आयुक्तांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत दिवसभर पावसाचा हाहाकार; सखल भागात साठलं पाणी

सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाण्यासह कल्याण डोंबिवली शहरांना देखील झोडपून काढले आहे. जिल्हयासह संपूर्ण कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात पावसाने कहर केला आहे. यात अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पहायला मिळाले.

रविवार पासून मुंबई,ठाणे,रायगड या जिल्ह्यात पावसाचा नुसता धुमाकूळ सुरू आहे. सोमवारी सकाळी सुरू झालेल्या पावसाने कल्याण डोंबिवलीकरांची देखील भांबेरी उडवली आहे. कल्याण शीळफाटा मार्गावर पाणी साचल्याने नदी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात देखील प्रथमच पाणी शिरले होते. सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम आणि नालेसफाई पूर्णपणे न झाल्याने पावसाचे सर्व पाणी पोलीस ठाण्यात शिरले. साधारण एक फूट पाणी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन पर्यंत शिरले होते.

कल्याण पश्चिमेला देखील पावसाचा कहर पाहायला मिळाला. येथीलही सखल भागात पाण्याने कब्जा केला होता. विठ्ठलवाडी येथील नाला देखील संध्याकाळी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होता. यामुळे कल्याण – उल्हासनगर मार्गावरिल या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद केली गेली. शिवाय महानगरपालिका प्रशासनाचा फौजफाटा देखील त्या ठिकाणी तैनात केला गेला होता. पुलाच्या दोन्ही बाजूस पोलीस बंदोबस्त केला गेला होता. कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर साधारण एक फुटा पर्यंत पाणी साठले होते.

कल्याण तालुक्यातील खडवली नदी,उल्हास नदी,वालधुनी नदी आणि लहान सहान ओढे दुथडी भरून वाहत होते. तर बदलापुरच्या बारवी धरणात देखील पाणी साठा वाढला आहे. अंबरनाथ शहरात तसेच शिव मंदिर भागात पाणी साठले होते. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात देखील एका शेतकऱ्याच्या तीन म्हशी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-संतोष दिवाडकर

‘विठाई’ एसटी बसवरील विठ्ठलाच्या चित्राची होत असलेली विटंबना थांबवा; हिंदु जनजागृती समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात आरंभ करण्यात आलेली ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा’ची ‘विठाई’ बससेवा लोकप्रिय झाली आणि तिचा राज्यभरात विस्तार करण्यात आला. विठुमाऊलीच्या नावे आरंभ करण्यात आलेली ही बससेवा स्तुत्यच असून या माध्यमातून शासनाने वारकर्‍यांच्या श्रद्धांचा सन्मान केला आहे. मात्र काही दिवसांनी आम्हाला या बसच्या बाहेरील भागात असलेल्या विठ्ठलाच्या चित्रावरील धूळ, थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग दिसू लागले, ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे. असे हिंदू जनजागृती समितीने आता म्हटले आहे.

अनावधानाने का होईना, श्री विठ्ठलाची प्रतिमा मलिन होत आहे. हा श्री विठ्ठलाचा अनादर असून ही होत असलेली विटंबना रोखण्यासाठी ‘विठाई’ बसच्या बाहेर असलेले श्रीविठ्ठलाचे चित्र त्वरित काढावे, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. यावर उपाय म्हणून श्री विठ्ठलाचे चित्र प्रत्येक बसच्या आतील बाजूस लावून प्रतिदिन त्या चित्राचे पूजन करून त्याचे पावित्र्य राखावे, अशी विनंतीवजा सूचनाही समितीने केली आहे.

     या संदर्भातील निवेदन राज्याचे परिवहन मंत्री श्री. अनिल परब, परिवहन सचिव, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे, बसमधील प्रवासी हे मुद्दाम ही विटंबना करत नाहीत. अनावधानाने का होईना, खिडकीतून बाहेर थुंकणे, चूळ भरणे, तोंड धुणे, उलटी करणे आदी कृत्ये करतांना ती विठुरायाच्या चित्रावर त्याचे शिंतोडे उडतात. तसेच सध्या पावसाळा असल्याने अनेकदा रस्त्यावरील चिखल चित्रावर उडतो. प्रतिदिन ज्या विठ्ठलाला पुजतो, त्याच्या चित्राला घाणीने माखलेला पहाणे, हे अतिशय वेदनादायी आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची विटंबना तत्काळ थांबवायला हवी, असे विनंतीपूर्वक आवाहन समितीने केले आहे. यावर तुम्हाला काय वाटत ते आम्हाला खाली कमेंटमध्ये कळवा.

-कुणाल म्हात्रे

कल्याण शहरात पाईपलाईनद्वारे घरघुती गॅसचा पुरवठा करण्याची मागणी

कल्याण शहर हे गर्दिचे व धकाधकीचे शहर बनले असून शहर वासियांची गरज व मागणी लक्षात घेता गॅस सिलिंडर बंद करून पाईप द्वारे घरगुती गॅसचा पुरवठा करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

     बऱ्याचशा वस्त्या व मोठमोठय़ा बिल्डिंगमध्ये लोक दाटीवाटीने राहतात तसेच  सिलिंडर स्फोट होऊन पुन्हा लालबाग मधील साराभाई बिल्डिंग गॅस सिलेंडर स्फोटाची पुनरावृत्ती होऊन दुर्घटना घडू  नये, हा संभाव्य धोका लक्षात घेऊन, तसेच सिलेंडर पेक्षा गॅस पाईप स्वस्त सुद्धा आहे.

     तसेच हल्ली  दामपत्य नोकरी धंद्यानिमित्त घराबाहेर पडत असल्याने गॅस सिलिंडर डिलिव्हरी घेण्याचा सुध्दा मोठा प्रश्न उद्भवतो. लोकांच्या ह्या समस्या लक्षात घेता कल्याण पश्चिम भागात पाईपद्वारे घरापर्यंत गॅस पोहचवणे खुपच गरजेचे आहे. त्यामुळे या अतिआवश्यक  व लोकांच्या सुरक्षिततेचा जाणीवपूर्वक विचार करून निर्णय घेत कल्याण शहरात घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याची मागणी पुष्पा रत्नपारखी यांनी आयुक्तांकडे केली आहे.

-कुणाल म्हात्रे

व्हिडीओ : कल्याण रेल्वे स्थानकात इमर्जन्सी ब्रेकमुळे थोडक्यात बचावली वृद्ध व्यक्ती

कल्याण रेल्वे स्थानकात आज मोटरमनच्या सतर्कतेमुळे रेल्वे रूळ ओलांडणार्या एका वृद्ध इसमाला जीवनदान मिळाले आहे. एक वृद्ध व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडून पलीकडल्या बाजूस जाण्याचा प्रयत्न करीत होती. याच दरम्यान हा अपघात झाला. मात्र वृद्धाचा जीव थोडक्यात बचावला.

कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून मुंबई वाराणसी एक्सप्रेस निघाली होती. इंजिनमधून लोको पायलट एस के प्रधान आणि त्यांचा सोबत असलेले असिस्टंट रवी शंकर हे वेग वाढविण्याच्या तयारीतच होते. मात्र त्यांना समोर काहीतरी हरकत झाल्याची माहिती मिळाली. आणि त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता इमर्जन्सी ब्रेक सीसिस्टिमचा वापर केला. आणि काही सेकंदातच एक्स्प्रेस त्या वृद्ध व्यक्तीच्या जवळ जाऊन जागेवर उभी राहिली. मात्र ही वृद्ध व्यक्ती अगदी मधोमध असल्याने इंजिनच्या खाली सापडली. यानंतर मोटरमन आणि फलाटावरील काही लोक खाली उतरले आणि त्यांनी या वृध्द इसमाला सुखरूपपणे इंजिन खालून बाहेर काढले. आज दुपारी १ च्या दरम्यान ही घटना घडली.

प्लॅटफॉर्मवरून उतरून रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे हे नियमबाह्य आहे व त्याशिवाय जीवघेणे देखील आहे. अश्या पद्धतीने रूळ न ओलांडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा प्रवाशांना केले आहे. उपलब्ध असलेल्या ब्रिजचा वापर करा असे सांगण्यात येते. त्याचबरोबर थोडक्यात बचावलेल्या वृद्ध इसमाला देखील याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून समज देण्यात आला. नशीब बलवत्तर म्हणून लोको पायलट ने वेळेवर अर्जंट ब्रेक दाबल्याने पुढील अनर्थ टळला.

व्हडिओत पहा कसे बाहेर काढले आजोबांना:-

-संतोष दिवाडकर

कल्याण परिमंडळात वीजबील थकवलेल्या ‘इतक्या’ लोकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडीत

महावितरणच्या कल्याण परिमंडळात थकीत वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ७० हजार ६८६ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १०५ कोटी रुपये थकीत असून चालू वीजबिलासह थकबाकी व पुनर्रजोडणी शुल्क भरल्यानंतरच त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकेल. याव्यतिरिक्त परिमंडलातील ७ लाख ८३ हजार ग्राहकांकडे मार्च-२०२१ पर्यंतची ४०२ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. याशिवाय एप्रिल ते जून २०२१ या तीन महिन्यांची थकबाकी १४२ कोटींवर पोहचली आहे. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट असून वीज ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून अखंडित वीजसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

कल्याण, डोंबिवलीचा समावेश असणाऱ्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ८ हजार ७७१ ग्राहकांचा (७ कोटी ७ लाख थकीत), ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग व उल्हासनगरचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत १४ हजार ९२३ ग्राहकांचा (४९ कोटी थकीत), वसई व विरार समाविष्ट असणाऱ्या वसई मंडल कार्यालयांतर्गत सर्वाधिक २७ हजार ५२७ ग्राहकांचा (२८ कोटी ३३ लाख) आणि पालघर जिल्ह्याचा समावेश असलेल्या (वसई व विरार विभाग वगळून) पालघर मंडलात १९ हजार ४६५ ग्राहकांचा (२० कोटी ७४ लाख थकीत) वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक तसेच सार्वजनिक सेवेतील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन चालू व थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.

थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिल व पुनर्रजोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही. शेजाऱ्यांकडून अथवा चोरट्या मार्गाने वीजपुरवठा घेणे धोकादायक असून यात वीज देणाऱ्या व घेणाऱ्या दोघांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अधिकृतपणे वीज वापर करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी परिमंडलातील वीज ग्राहकांना केले आहे.

-कुणाल म्हात्रे