मलंगगड भागात नागासह ६ नवजात पिल्लांना सर्पमित्राने दिले जीवदान

कल्याण पुर्वेतील नेवाळी नाका मलंगरोड येथील मोहमद शाहजाद यांच्या कपाट दुरुस्तीच्या दुकानाबाहेर नाग जातीचा साप आढळून आल्याने सर्पमित्र दत्ता बोंबे,  तसेच त्या परिसरातील सर्पमित्र कुर्ला पोलिस ठाण्यात कर्तव्य करणारे,मुंबई हायकोर्ट येथे मानद पशु कल्याण अधिकारी म्हणून  नियुक्त असलेले पोलीस शिपाई मुरलीधर जाधव, स्थानिक सर्पमित्र कुलदीप चिखलकर यांना कळविले असता तातडीने घटनास्थळी सर्पमित्रांनी पोहचत  दुकानाच्या बाजुला आढोश्याला बसलेल्या नाग जातीचा पाच फुट लांबीचा विषारी सापास पकडले.

तिथे सर्पमित्रांनी अंड्यातून बाहेर पडणारी नवजात नागांची सहा पिल्ले देखील पकडुन नागासह पिल्लांना जीवनदान दिले. सर्पमित्रांनी विषारी पाच फुट नागासह नवजात नागांच्या पिल्लांना पकडल्याचे पाहून उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्रांनी ताब्यात घेतलेल्या नागासह पिल्लांना  वन विभागाला कळवून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

-कुणाल म्हात्रे

शिक्षकांना लोकल प्रवासास परवानगीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे लक्षवेधी आंदोलन

शिक्षकांना लोकल प्रवासा करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कल्याण रेल्वे स्थानकात लक्षवेधी आंदोलन केले.

१५ जून पासून राज्यातील शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबई उपनगरासह  ठाणे जिल्ह्यातील अनेक  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी रेल्वेने प्रवास करत असतात. परंतू कोव्हीड 19 मुळे रेल्वेने प्रवास करण्यास बंदी आहें. रेल्वे प्रवास करण्याची अनुमती द्यावी. या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. परंतू अनुमती  मिळालेली नाही.

इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता नववी व दहावीच्या अंतर्गत गुणांवर आधारित दहावीच्या निकालाची कामे शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविली आहेत. ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य असल्याने मुंबई  उपनगरातून अनेक शिक्षक शाळेत येण्यासाठी निघाले असता  त्यांना स्टेशन वरती तिकीटे नाकारलीत त्यामुळे शिक्षकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कल्याण रेल्वे स्टेशन येथे कोव्हीड नियमांचं पालन करून लक्षवेधी आंदोलन केले.

कल्याण रेल्वे स्थानक मूख्य व्यवस्थापक अनुप कुमार जैन यांना निवेदन देवून त्यांच्या मार्फत मध्य रेल्वे मुख्य व्यवस्थापक सीएसटी मुंबई यांच्याकडे तातडीने पत्रव्यवहार करून शिक्षकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शिक्षक परिषेदेने केली. लक्षवेधी आंदोलना प्रसंगी कल्याण डोंबिवली महानगराचे कार्यवाह गुलाबराव पाटील, ठाणे शहर अध्यक्षा हेमलता मुनोत इतर पदाधिकारी ए. व्ही. पाटील,  आप्पाराव कदम, संध्या वाबळे, सलीम सर, अमित मिश्रा व विनोद मिश्रा उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

नाल्याच्या त्रासामुळे भाजपा पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी नाल्यात बसून केले आंदोलन

कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले नगरमध्ये नाल्याचे काम होत नसल्याने भाजपा पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी नाल्यात उतरून आंदोलन केले.

 नाल्याचे काम न झाल्याने पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात जाते. याचा त्रास नागरिकांना होत आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती एकदम वाईट असते, वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप करत भाजपा पदाधिकारी सुशील पायल आणि स्थानिक काही नागरिक नाल्यात उतरले, नाल्यात बसून अनोखे आंदोलन करण्यात आले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अ प्रभाग हद्दीतील वार्ड क्र- १३  मोहने गावठाण  परिसरात  बहुचर्चित नाल्याचे रखडलेले काम  अनेक वर्षांपासून होत नसल्याने भाजपचे मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशिलकुमार पायाळ यांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा नाले गटाराचे काम मार्गी लागत नसल्याने २१ जून रोजी नाल्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  यांना पत्राव्दारे दिला होता. पालिकेला इशारा देऊन सुद्धा या नाल्याचे काम सुरु न झाल्याने अखेर आज सुशील पायल यांनी स्थानिकांसमवेत याठिकाणी नाल्यात बसून आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

दरम्यान त्या नाल्याचे काम सुरु झाले होते. मात्र त्याठिकाणी काही लोकांनी जागेसंदर्भात हरकती घेतल्या, सध्या प्रक्रिया सुरु असून जागेचा वाद मिटल्यानंतर नाल्याचे काम पूर्ण केले जाईल अशी प्रतिक्रिया  महापालिकेचे अ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवली एमआयडीसीमधील जुन्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी

डोंबिवली एमआयडीसी मधील जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलणे अतीआवश्यक असून त्या बदलण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी एमआयडीसी प्रशासनाकडे केली असून यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष देण्याचे आवश्यक असल्याचे मत राजू नलावडे यांनी व्यक्त केले आहे.

  डोंबिवली एमआयडीसीची स्थापना १९६४ साली झाल्यावर येथील उद्योगांसाठी रासायनिक व इतर सांडपाणी वाहून नेण्यासाठी सत्तरच्या दशकात जमिनीखालील सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली होती. निवासी भागातील सांडपाणी वाहिन्यांची कामे १९८५ नंतर सुरू करण्यात आली होती. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहिन्या या कंपन्यांचे सांडपाणी वाहून त्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत सीइटीपी त्यानंतर प्रक्रिया करून शुद्धीकरण केलेले हे सांडपाणी खाडीत सोडले जाते.

औद्योगिक क्षेत्रातील तयार होणारे कंपन्यांचे सांडपाणी मधील सिओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) याचे ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा त्यात वाढ झाल्यास व इतर रासायनिक घन कचरा आल्यास त्या जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्यांमधून वाहून जातांना वाहिन्यांवर दाब येऊन किंवा चोकअप होऊन त्या वाहिन्या नादुरुस्त होत आहेत. या नादुरुस्त वाहिन्यामधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाजूचा उघड्या नाल्यात किंवा रस्त्यावर वाहते. त्यावेळी त्याचे रासायनिक प्रदूषण होऊन त्याचा उग्र वास आजूबाजूचा परिसरात पसरला जातो. शिवाय ते प्रदूषित न प्रक्रिया केलेले सांडपाणी उघड्या नाल्याद्वारे खाडी, नदीत जाऊन त्यातील पाणी प्रदूषित होत असते.

       एमआयडीसी निवासी भागातील सांडपाणी वाहिन्यांची स्थिती पण अतिशय खराब झाली आहे. त्या जुन्या झालेल्या वाहिन्यांना रस्ते दुरुस्ती, महानगर गॅस, पाण्याच्या पाइपलाइन तसेच केबल टाकताना त्यांना धक्के बसून त्या नादुरुस्त झाल्या असाव्यात. शिवाय त्यात वृक्षांची खोलवर गेलेली खोड/मुळे वाहिन्यांत शिरून वाहिन्या खराब झाल्या आहेत. निवासी भागात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या आणि त्यांचे चेंबर फुटलेले आढळून येत असून त्यातून बाहेर पडणारे सांडपाण्यामुळे दुर्गंधी येत असते.

   नादुरुस्त, जीर्ण, जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्यांमुळे रासायनिक प्रदूषण, दुर्गंधी, आरोग्य, पर्यावरण इत्यादी यांचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. एमआयडीसी कडून जुन्या वाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकण्याचे प्राथमिक स्तरावर कागदावर नियोजन चालू आहे. याकामासाठी जरी काही दिवसांनी प्रस्ताव पाठविला तरी त्यानंतर मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळणे, टेंडर काढणे इत्यादी कामांसाठी काही महिने/वर्षे जातील त्यानंतर सदर हे मोठे काम पूर्णत्वास येण्यास अजून काही वर्ष जातील. त्यामुळे आरोग्य, प्रदूषण याविषयी असलेल्या या महत्त्वाचा प्रश्नात हे काम तातडीने लवकर कसे मार्गी लागेल यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी केली आहे.

-शरद शिंदे

‘निरोगी तन व शांत मन हीच खरी योगाची गुरुकिल्ली आहे’ – केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

“निरोगी तन व शांत मन” हीच खरी योगाची गुरुकिल्ली आहे असे उद्गार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून  डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर, सोशल डिस्टनसिंगच्या सर्व नियमांचे पालन करून संपन्न झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी हे उद्गार काढले.

सध्या रुग्ण संख्या कमी झाली असून मृत्यूचे प्रमाणही अत्यंत कमी झाले आहे. परंतु कोविडचे संकट टळले आहे असे समजून निर्धास्त राहू नका, मोठ्या प्रयत्नांनी  कोविडच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तरी  सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्कचा कटाक्षाने वापर करणे, हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे अवलंब करावा, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले. जरी लसीकरणाचे 2 डोस झाले असले तरीही ही बंधने पाळावीत असेही ते पुढे म्हणाले.

 कोविडच्या पहिल्या लाटेत टीव्हीवर सतत दिसत असलेल्या कोविड विषयक बातम्या आणि त्यामुळे त्याचा जनमानसावर येणारा ताण दूर व्हावा याकरिता  नागरिकांना विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून महापालिकेने गेल्या वर्षभरात जवळजवळ १५०० विविध मनोरंजनाचे कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांसाठी सादर केले. योगासनांचे कार्यक्रमही नागरिकांच्या माहितीसाठी सादर करण्यात आले आणि कोविड कालावधीत योगाचा फायदा झाल्याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियाही प्राप्त झाल्याची माहिती आयुक्तांनी या कार्यक्रमात दिली.

जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित नागरिकांसमोर कल्याण-डोंबिवलीतील प्रख्यात योग शिक्षक सचिन गोडांबे, श्रीकांत देव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनाचे प्रकार उपस्थित नागरिकांसमोर सादर केले. यासमयी कलर्स वाहिनीवर “सुर नवा, ध्यास नवा, आशा उदयाची “या संगीत पर्वात पारितोषिक मिळवून कल्याण डोंबिवली नगरीच्या बहुमान वाढविलेल्या प्रज्ञा साने या युवतीचा आयुक्तांच्या हस्ते सन्मानपत्र व फुलझाडाचे रोपटे देवून  सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमा समयी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, उप आयुक्त पल्लवी भागवत, उप आयुक्त विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन दत्तात्रय लदवा यांनी केले.

-संतोष दिवाडकर

नवी मुंबई विमानतळाला असेल शिवरायांचं नाव ; राज ठाकरेंनी मांडली भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अतिशय जबाबदारीने बोलणारे नेते म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. जितके आक्रमक आणि परखड ते आहेत तितकेच संयमी आणि अभ्यासु त्यांचे विचार आहेत असे मनसैनिक आवर्जून सांगत असतात. नवी मुंबई विमानतळाला नाव कुणाचे द्यायचे ? असा प्रश्न उभा असताना राज ठाकरेंनी मात्र तिसऱ्याच नावाचा गौप्यस्फोट केल्याने आता नामकरणाला नवीनच वळण प्राप्त झाले आहे.

नवी मुंबईला स्व.बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात येईल यावर शिवसेना पक्ष ठाम आहे. शिवसेना सत्तेत असल्याने राज्यसरकार देखील याच नावाचा विचार करतेय यात काही शंका नाही. याउलट भूमिपुत्रांनी देखील दि.बा.पाटील यांच्या नावासाठी मुंबई आणि उपनगरात आंदोलन सुरू केली आहेत. मनसेचे एकमेव आमदार हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. यातून मनसेचा पाठींबा असेल असे सर्वांना वाटले होते.

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी दि.बा.पाटील नामकरणाला पाठिंबा द्यावा याबाबत राज ठाकरेंशी चर्चा केली. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

“नवी मुंबई येथे होणारे विमानतळ हे सध्याच्या मुंबईतील विमानतळाचाच भाग आहे. फक्त हे विमानतळ उभं राहिल्या नंतर या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ केले जाईल आणि जुन्या विमानतळाला डॉमेस्टिक विमानतळ म्हणून ठेवले जाईल. त्यामुळे दोन्ही विमानतळ ही एकच असल्याने नाव देखील तेच राहील. बाळासाहेब किंवा पाटील अश्या कोणत्याही व्यक्तीमत्वाला विरोध नाही मात्र जे आहे तेच नाव केंद्राकडून ठेवले जाईल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. या महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही कुठूनही आल्यावर पाय ठेवता तेव्हा सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या भूमीत तुम्ही पाय ठेवता. त्यामुळे रस्त्यावरील संघर्ष नक्कीच थांबेल. आमदार राजू पाटील आणि प्रशांत ठाकूर यांना मी हा मुद्दा नीट समजावून सांगितला आहे. जर शिवरायांचं नाव विमानतळाला देत असतील तर मग हा विषय इथेच संपला असे ते यावर म्हणाले आहेत.”

– राज ठाकरे (मनसे अध्यक्ष)

वास्तवात विमानतळ बनण्यापूर्वीच त्या विमानतळाला काय नाव असेल यावरून जो संघर्ष सुरू झाला होता त्या संघर्षाला राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर वेगळंच वळण लाभलं आहे. शिवसेना विरुद्ध भूमिपुत्र दोन्ही वेगवेगळ्या नावासाठी आग्रही असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवरायांचे नाव सुचवले आहे.

राज ठाकरे हे एखादी भूमिका मांडत असताना वास्तविक भूमिका मांडतात. त्यांनी जर ठरवले असते तर ते दि.बा.पाटील यांच्या नावाला पाठिंबा देऊन आगरी कोळी समाजाला आपल्याकडे सहज खेचू शकले असते. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील जवळच आली आहे. पण राज ठाकरे मतांचे राजकारण कधीच करत नाही. असे काही मनसैनिक समाज माध्यमातून सांगत आहेत.

-संतोष दिवाडकर

आरएसपी युनिटच्या माध्यमातून योगसंध्या स्टुडिओ मार्फत योगाशिबिर संपन्न

जागतिक योग दिनानिमित्त कल्याण मधील स्वामी नारायण हॉल येथे आरएसपी अधिकारी युनिटचे कमांडर मणिलाल शिंपी यांच्या पुढाकाराने, स्वामीनारायण हॉलचे दिनेश ठक्कर यांच्या सहकार्याने, योगसंध्या वेलनेस स्टुडिओच्या संचालिका डॉ. संध्या रॉयकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. संध्या यांनी योगाविषयी प्रॅक्टिकल सह माहिती दिली, हे शिबिर ऑफलाईन व ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते. यामधे जवळपास ३०० लोकांनी योगासनांचा लाभ घेतला. योगविज्ञान संदर्भात माहिती देताना डॉ. संध्या यांनी सांगितले की,  योग म्हणजे जीवात्मा आणि विश्वात्मा यांच्यातील एकत्वाची आणि शरीरस्वास्थ्य सह आनंदी जीवन प्राप्त करण्याच्या उपयुक्त असा योग्य मार्ग आहे. योगाचे ज्ञानयोग भक्तियोग हटयोग कर्मयोग राजयोग मंत्रयोग नादयोग लययोग, इत्यादी प्रकार आहेत. त्यामध्ये यम,नियम, आसन प्राणायम, ध्यान, समाधी, धारणा असे अष्टांग योग सांगितले आहेत अशाप्रकारे महत्त्वपूर्ण माहिती दिली.

-कुणाल म्हात्रे

पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करत नवाब मलिक यांचा वाढदिवस राष्ट्रवादी कडून साजरा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ता आणि खासदार नवाब मलिक यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी पार्टीचे पनवेल जिल्हा उपाध्यक्ष आर. एन. यादव यांनी या उपक्रमाचे आयोजन खारघर येथील हिरानंदानी याठिकाणी केले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

      समाजसेवक तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आर. एन. यादव हे दरवर्षी राष्ट्रवादी प्रवक्ता नवाब मलिक यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत असतात. यावर्षी समाजात अत्यंत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकारांनी आपले काम चोखपणे बजावत नागरिकांना बातम्या पोहोचविल्या आहेत. अशा पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

      यावेळी ओम प्रकाश तिवारी, विक्रम गायकवाड, आदेश साळवी, फहीम अन्सारी, यशपाल शर्मा, संध्या श्रीवास्तव आदींसह इतर पत्रकार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या वतीने आर. एन. यादव यांनी पत्रकारांच्या कामाची दखल घेऊन सन्मान केल्या बद्दल पत्रकारांनी त्यांचे आभार मानले.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. क्षेत्र दुसऱ्या स्तरात ; सोमवारपासून नवे नियम

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा उच्छाद हा बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचे दिसत आहे. एकूण रुग्णसंख्या, मृतदर आणि हॉस्पिटलमधील उपलब्धते नुसार महापालिका क्षेत्र दुसऱ्या लेव्हल मध्ये आलेले आहे. यामुळे सोमवार पासून महापालिका क्षेत्रात नियम अटी सह नवे बदल करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध लादण्यात आले होते. यानंतर ह निर्बंध आणखीन कडक करण्यात आले. मात्र आता लाट ओसरल्यावर शिथिलता आणली जात आहे. त्यात कल्याण डोंबिवलीत सोमवार २१ जून पासून सर्व काही नियमित केले जाणार आहे. नियम व अटी मध्ये नमूद केल्या प्रमाणे आस्थापना सुरू ठेवण्यास महापालिकेने मुभा दिलेली आहे. संपूर्ण आठवडाभर हा बदल असणार आहे. २१ जून ते २७ जून पर्यंत नियमितपणे आस्थापना सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात २१ जून ते २७ जून पर्यंत अशा चालतील आस्थापना :-

kdmc

क.डों.म.पा. क्षेत्रात सध्या दिवसागणिक १०० च्या आत कोरोना रुग्ण सापडत आहेत. तर मृत्युदर देखील आटोक्यात आलेले आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात २० जूनच्या आकडेवारीनुसार एकूण १२३३ रुग्ण उपचार घेत आहेत.

-संतोष दिवाडकर

क.डों.म.पा.च्या हिंदी जाहिरातीला मराठी एकीकरण समितीने फासले काळे ; हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप

महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांवर हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप करत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या हिंदी जाहिरातीला मराठी एकीकरण समितीने काळे फासले आहे.

महाराष्ट्रात हिंदी भाषेचे आक्रमण हे जागोजागी पहायला मिळत आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा अफवेवर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्यातील मराठी नागरिक गपगुमान हिंदी भाषेचं आक्रमण सहन करतं आहे. कायद्यानुसार पाहिलं तर कलम ३४३ नुसार भारत देशाला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही त्याउलट मराठी राजभाषा अधिनियम २०१५(सुधारित)नुसार स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच महानगरपालिका ह्यांना १००% कारभार हा मराठी भाषेत करणे बंधन कारक आहे. केंद्राकडून येणारी कोणतीही जाहिरात ही महाराष्ट्र राज्यात मराठी भाषे मध्ये अनुवादित करणे बंधनकारक आहे.

असे असतांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका सर्रास पणे रस्त्यावर मराठी भाषेला गुळखोबरं देऊन कल्याण डोंबिवलीकरांवर हिंदी भाषा लादत आहेत. ह्याची वारंवार विनंती करून सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिका मराठी भाषेत जाहिरात करतं नाही म्हणून मराठी एकीकरण समितीच्या कल्याण डोंबिवलीच्या शिलेदारांनी महानगरपालिका ह्यांच्या वतीने जागोजागी केलेल्या हिंदी जाहिरातीला काळे फासून मराठी भाषेची मागणी केली. या आंदोलनात मराठी एकीकरण समितीचे संदीप पाटील, रुपेश भोईर, भावेश पाटील, संभाजी चव्हाण आणि मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समनव्यक भूषण पवार सहभागी झाले होते.

कायद्यानुसार मराठी भाषेत जाहिरात समजून घेण्याचा हा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका मराठी भाषेला दुय्यम स्थान देऊन मराठी भाषेचा अपमान करत आहे. महानगरपालिका ह्यांना केवळ मराठी भाषेत कारभार करणे बंधनकारक असतांना सुद्धा हिंदी भाषा लादली जाते ते कुठे तरी थांबले पाहिजे असे मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समनव्यक भूषण पवार यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे