रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कोव्हिड सेंटरमध्ये नगरसेवक संतोष भेगडे यांच्या पुढाकाराने एरोबिकचे आयोजन

मावळ तालुक्यातील कृषी पणन कोव्हीड सेंटर व तोलानी कोव्हीड सेंटर येथे रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच शारीरिक व्यायामासाठी एरोबिकचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या पुढाकाराने पार्थदादा पवार फाउंडेशनच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते.

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण देखील पुण्यातूनच समोर आला होता. आणि आता दुसऱ्या लाटेत देखील पुणे जिल्ह्याला ग्रामीण भागासह कोरोनाने विळखा घातला. पार्थदादा पवार फाउंडेशनच्या वतीने व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष भेगडे यांच्या प्रयत्नाने कोरोना रुग्णांसाठी एरोबिकचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजना नंतर सहभागी झालेल्या रुग्णांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचे डॉक्टरांनी आयोजकांना कळवले आहे.

मावळ तालुक्यातील पहिले नृत्य प्रशिक्षक म्हणून ओळखले जाणारे राहुल देठे यांनी ‘स्टेप हार्ड डान्स एकेडमी’ मार्फत पुढाकार घेतला होता. कोरोना सुरू झाल्या पासून डान्स एकेडमी पूर्वपदावर नसल्याने आर्थिक परिस्थितीचा सामना नृत्य प्रशिक्षक राहुल देठे यांना करावा लागतोय. मात्र अशाही परिस्थितीत स्वतः सकारात्मक राहून इतरांनाही ते मानसिक व शारीरिक सदृढ ठेवण्याचे समाजकार्य ते करीत आहेत. या एरोबिक मध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी त्यांनी विना मोबदला समाजकार्य करण्याचे काम सुरू ठेवले आहे. यामुळे त्यांचे कोरोना योद्धा म्हणून विशेष कौतुक होत आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष भेगडे हे देखील कोरोना सुरू झाल्यापासून सामाजिक क्षेत्रात अधिक मेहनत घेत आहेत. तळा गाळात उतरून त्यांनी मागील दोन वर्षांत अनेक गरजूंना मदत केली आहे. समाजकार्याचा वसा असाच पुढे सुरू ठेवणार असल्याचं नगरसेवक संतोष भेगडे यांनी सांगितले आहे.

-संतोष दिवाडकर

जैव विविधता उद्यानाच्या(Biodivercity Park) माध्यमातून नागरिकांना निसर्गाच्‍या जवळ जाण्याची संधी !

जैव विविधता उदयान (Biodivercity Park) च्या माध्यमातून नागरिकांना निसर्गाच्‍या जवळ जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज कल्याण मधील आंबिवली परिसरात वृक्षारोपण करते समयी काढले. आंबिवली टेकडीवर आय नेचर फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पुढील काळात निर्मिली जाणारी विविध उदयाने विदयार्थ्यांसाठी संशोधनास आणि विरंगुळयाचे केंद्र होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, प्रख्यात फुलपाखरु तज्ञ व आय नेचर फाऊंडेशचे संचालक आयझॅक किहिमकर, आय नेचर फाऊंडेशनच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी यांचे मार्फत करंजा, बहावा या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात होणाऱ्या रिंग रोड बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात महापालिकेने MMRDA व वनविभागाच्या सहकार्याने आंबिवली टेकडीवर यापूर्वीच 15 हजार झाडे लावली आहेत, यामुळे टेकडी संवर्धनासह रम्य नैसर्गिक वातावरणाचा आनंद नागरिकांना लुटता येणार आहे.सोलर सिस्टिम आणि ड्रीप इरिगेशन यामुळे 2 वर्षाची झालेली झाडे आता बहरली असून आंबिवली टेकडीवर या झाडांची अधिक गर्द वनराई होण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली शहर अभियंता सपना कोळी आणि मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी CSR फंडासाठी केलेल्या आवाहनाला आता प्रतिसाद मिळाला आहे.आय नेचर फाऊंडेशन यांनी 3 वर्षासाठी या परिसरात उद्याने विकसित करण्यासाठी महापालिकेबरोबर करार केला असून त्यासाठी DCB बँककडून सीएसआर फंडातून सुमारे 3.5 कोटींचे अर्थसहाय याकामी मिळणार आहे. 40 एकराच्या या जागेत बर्ड गार्डन, बॅट गार्डन, बटरफ्लाय गार्डन, बी गार्डन, मेडिसिन गार्डन, राशी वन व छोटा जलाशय अशा प्रकारची 7 उद्याने विकसित केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे 10 हजार वृक्षांची लागवडही केली जाणार आहे. आंबिवली टेकडीवर नेचर ट्रेलची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक लोकांना प्रशिक्षण दिले जाणार असून या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

कल्याणच्या आसपास अशाप्रकारे कुठलेही पार्क व वाईल्‍ड लाईफ सॅक्च्युरी नसल्यामुळे कल्याणमध्ये विकसित होत असलेल्या या Biodivercity Park ला विशेष महत्त्व आहे.

या समयी घकव्य विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, अ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व अनेक वृक्ष प्रेमी उपस्थित होते.

-संतोष दिवाडकर

चहा प्यायला गाडीतून उतरले आणि गाडीवर दरड कोसळली ; माळशेज घाटातील थक्क करणारी दुर्घटना

माळशेज घाट म्हणजे पर्यटकांना पावसाळ्यात पर्वणीच. मात्र निसर्ससौंदर्य असलेला हा घाट दरड कोसळण्याच्या घटनांसाठी जास्त ओळखला जातो. आज सायंकाळी चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका चार चाकी वाहनावर दरड कोसळली. सुदैवाने आत कुणी नसल्याने जीवितहानी टळली पण कारचे मात्र नुकसान झाले.

आज शुक्रवार दि.११ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास एक कार अहमदनगरहुन कल्याणच्या दिशेने जात होती. घाट क्षेत्रात देखील आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागात दाट धुके पसरले होते. बोगद्याच्या अलीकडे कारमधील प्रवासी मित्रांना चहा पिण्याची तलप आली आणि त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. दोघेही चहाच्या हॉटेलजवळ पोहोचताच त्यांच्या गाडीवर दरड कोसळली. काही सेकंद मागे पुढे झाले असते तर दोघांच्या जीवावर बेतले असते. आणि जर चहासाठी थांबले नसते तर कार देखील बचावली असती असे म्हणे वावगे ठरणार नाही. चहामुळे कार गेली असे म्हणण्यापेक्षा चहामुळे जीव बचावला असे म्हणून मनाचे समाधान मानावे लागेल. ‘मुरबाड लाईव्ह महाराष्ट्र न्यूज’ने दिलेल्या माहिती नुसार ही कार अहमदनगर येथील रत्नाकर माचवे यांच्या मालकीची होती. दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचून महामार्ग व टोकावडे पोलिसांनी मदतकार्य करीत रस्ता तत्काळ खुला केला.

माळशेज घाटात दरवर्षी पावसाळ्यात अश्या घटना होत असतात. धुक्यामुळे होणारे अपघात आणि दरडीच्या दुर्घटनेमुळे आतापर्यंत अनेक लोकांचा जीव गेला आहे. अनेक वर्षांपूर्वी लाल परी म्हणजेच एसटी देखील माळशेज घाटाच्या खोल दरीत सामावली होती. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची कहाणी येथील काही व्यावसायिक सांगतात. त्यामुळे अश्या ठिकाणी पर्यटन करावं पण जीव मुठीत धरून असं म्हणायला हरकत नाही.

-संतोष दिवाडकर

‘…तर केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरून ओबीसींचा निर्णय घ्यायला भाग पाडू ; कॉंग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचा ईशारा

ओबीसी आरक्षणाचा निर्णय पुन्हा न घेतल्यास केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्रातील ओबीसी समाज रस्त्यावर येऊन केंद्राला निर्णय घ्यायला भाग पाडू असा इशारा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.

      महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष भानुदास माळी यांचा संपूर्ण महाराष्ट्रात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण शहरातील ओबीसी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी व कल्याण शहर (जि.) प्रदेश स्तरावरील नवीन पदाधिकारी निवडी संदर्भात चर्चा करण्यासाठी भानुदास माळी गुरुवारी कल्याण मधील मुथा कॉलेज येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कल्याण शहर ओबीसी अध्यक्ष जयदीप सानप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सानप यांनी माळी यांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन स्वागत करत आपला कार्यअहवाल सादर केला.

यावेळी माळी यांनी बोलतांना सांगितले कि, ओबीसी समाज हा कॉंग्रेसमधून इतरत्र विखुरला आहे, मुस्लिमांची संख्या देखील देशात मोठी आहे. ते देखील विवीध राजकीय पक्षात दाखल झाल्याने कॉंग्रेच्या हक्काची मते बाजूला गेली आहेत. त्याचप्रमाणे दलित समाज देखील कॉंग्रेसपासून दूर गेला आहे. या सर्वाना पुन्हा पक्षात आणण्याचं काम प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी सोपवले असून या कामात यशस्वी होणार असून महाराष्ट्रात दलित, बीसी, ओबीसी, एससी, एनटी समजातील लोकांची आवक कॉंग्रेसमध्ये करण्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रबळ होईल.

    आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात नेहमीच गाजला आहे. नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे मुद्दे सर्व विकून टाकले आहेत. ज्या ज्या ठिकाणी आरक्षण होतं त्या त्या कंपन्या विकून खाजगीकरण केलं आहे. त्यामुळे आरक्षण पूर्णपणे संपत आलं आहे. जे काही थोडं आरक्षण आहे त्याच्यावर देखील घाला घालून या देशातील दलित, ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लीम यांना देशोधडीला लावायचा ऐतिहासिक कार्यक्रम बीजेपीने आरएसएसच्या माध्यमातून करायला सुरवात केली आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय पुन्हा न घेतल्यास केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्रातील ओबीसी समाज रस्त्यावर येऊन केंद्राला निर्णय घ्यायला भाग पाडू असा इशारा कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.

तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस कदाचित स्वंतत्रपणे लढून आपला प्रभावी पक्ष स्थान निर्माण करेल यासाठी तीन वर्षाचा कालवधी देखील आहे. कल्याण डोंबिवलीत देखील कार्यकर्त्याचं म्हणणे ऐकून नाना पटोलेयांच्यासोबत बैठक आयोजित करून पक्षाला उभारी द्यायचं काम केलं जाईल.   

काँग्रेस नेते प्रकाश मुथा, अलका आवळस्कर, माजी नगरसेवक इफ्तेकर खान यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी शिक्षण समिती सदस्य चंदर पांडे यांनी केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष धनराज राठोड, शेरेकर, दिनकर राऊत, राजा जाधव, शिबू शेख, उपअध्यक्ष सलीम शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष राजेश शर्मा, विनोद शिंपी, रियाज सय्यद, सुमित जाधव, रॉकी सिंह, संतोष नेटारे, अशपाक शेख आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

भर पावसातही NDRF पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी केली कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींची पाहणी

हवामान खात्याने येत्या ३ दिवसांसाठी दिलेल्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी, उपायुक्त पल्लवी भागवत यांनी कल्याण मध्ये दाखल झालेल्या NDRF च्या पथकाबरोबर कल्याण पश्चिम येथील जोशीबाग येथील दाटीवाटीच्या वस्तीतील अतिधोकादायक इमारतींची भर पावसात समक्ष पाहणी केली आणि तेथील रहिवाशांची विचारपूस करुन या ३ दिवसाच्या अतिवृष्टीच्या कालावधीसाठी त्यांना जवळच्या नातेवाईकांकडे किंवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरीत होणेबाबत सूचना दिल्या.

कल्याण मधील कचोरे टेकडीवरील दरडी अतिवृष्टी च्या काळात कोसळून दुर्घटना होण्याच्या संभव असतो. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी स्वत: टेकडीवर पाहणी करुन तेथील रहिवाशांना देखील सुरक्षित स्थळी किंवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरित होण्याबाबत सूचना दिल्या, त्यानंतर आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी डोंबिवली पूर्व येथील संत नामदेव पथ व दत्तनगर येथील धोकादायक इमारतीची देखील पाहणी केली.

११ ते १३ जुन या तीन दिवसासाठी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने धोकादायक इमारती मधील रहिवाशांना दुसरी कडे स्थलांतरीत करण्यासाठी आज NDRF च्या टिम बरोबर त्यांनी पाहणी केली. त्याच प्रमाणे कचोरे टेकडी वर लॅन्‍डस्लाईड सारखी दुर्घटना घडली तर रेस्क्यु करण्यासाठी काय करावं लागेल ? याची तयारी करण्यासाठी देखील कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये NDRF च्या टिम सोबत पाहणी केली असल्याची माहिती आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली.

-संतोष दिवाडकर

दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मानवी साखळीद्वारे कल्याणमध्ये मागणी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत कल्याणमध्ये ठिकठिकाणी मानवी साखळी करण्यात आली.

कल्याण पश्चिमेत सर्वपक्षीय नेते एकवटले

दि. बा. पाटील हे शेतकरी, वंचित, गोर गरीब, भूमिपुत्र, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढले. त्यासाठी आज पूर्ण बहुजन समाज रस्त्यावर उतरला आहे. आगरी कोळी समाजाची जी मागणी आहे त्या मागणीला बहुजन समाज आणि भटके विमुक्त समाजाने देखील पाठींबा दिला आहे. खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कोणतेही राजकारण व्हायला नको होते, कोणताही विरोध व्हायला नको होता. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार हे बिघाडीचे सरकार असून त्यांनी जाणीवपूर्वक यामध्ये राजकारण केले असून त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.

दरम्यान या आंदोलनात माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन भोईर, संजय कारभारी, रवी गायकर, अर्जुन म्हात्रे, उल्हास भोईर,  गणेश चौधरी, विनोद केणे, दिपक दोरलेकर, राहुल भोईर,  शुभा पाध्ये, रेखा तरे, प्रिया शर्मा आदी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांचा सहभाग

विमानतळाला नाव देण्याच्या मागणीसाठी कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड हे देखील पुढे सरसावले आहेत. त्यांनी देखील या मानवी साखळीत सहभाग घेतला होता. हातात पोस्टर घेऊन ते स्वतः मानवी साखळीत जोडले गेले होते. मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते.

मा.नगरसेवक कुणाल पाटील आंदोलनात सहभागी

कल्याण ग्रामीण भागात चक्की नाका ते नेवाळी नाका पर्यंत मानवी साखळी करण्यात आली. या आंदोलनाला मा. नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाठींबा देत चक्कीनाका ते नेवाळी नाका पर्यंतच्या मानवी साखळीत सहभागी होत नवि मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दयावे अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात तिसगाव, नांदिवली,द्वारली, भाल, वसार आदी गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कल्याण डोंबिवली भागात ८३.५ मीमी पावसाची नोंद ; पालिका आयुक्तांची दिवसभर कंट्रोल रूममध्ये निगराणी

परवा रात्रीपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. काल दुपारी १२ वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरात ८३.५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. कालपासून होणा-या अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी शिरुन पाणी साचल्याचे निदर्शनास आले होते.

महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सुनील पवार यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या सर्वच प्रभागक्षेत्र अधिका-यांनी सदर परिस्थितीवर लक्ष ठेवुन आपापल्या मनुष्य बळाच्या सहायाने साचलेल्या पाण्याचा निचरा केला. यामध्ये कल्याण (प) छ. शिवाजी महाराज चौक, कल्याण पूर्व मधील दामोदर नगर, डोंबिवली पूर्व स्थानक परिसर येथील सखल भागात साचलेले पाणी मनुष्यबळ लावून, मॅनहोल चेंबर साफ करून त्याचप्रमाणे जेसीबी चा वापर करुन पाण्याचा निचरा करण्यात आला. धोकादायक इमारती कोसळून दूर्घटना होवू नये म्हणून सदर इमारती रहिवास मुक्त करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने ‘ड’ प्रभागातील २ अतिधोकादायक इमारतीमधील २८ नागरिक स्थलांतरीत करण्यात आले. ‘ह’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतीपैंकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. त्यापैकी ५ इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु होते. ‘ग’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतीपैकी १२ इमारती रहिवासमुक्त केल्या व ८ इमारतीचे रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु होते. ‘अ’ प्रभागात १ अतिधोकादायक इमारत असून सदर इमारत रहिवास मुक्त करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी आणि शहर अभियंता सपना कोळी यांनी महापालिका मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रुममध्ये दिवसभर प्रत्यक्ष उपस्थित राहून एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका क्षेत्रातील २०१ प्रमुख ठिकाणी कार्यान्वित असलेल्या ५५१ सीसीटीव्‍ही कॅमे-याचा माध्यमातून पाणी साचण्याच्या जागा अवलोकून महापालिका आयुक्तांनी तेथील समस्यांचे निराकारण करणेबाबत संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या.

-संतोष दिवाडकर

एक लाख रुपयांसाठी सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण ; दोनच दिवसांत पाच जणांना ठोकल्या बेड्या

एक लाख रुपयांसाठी ६ महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेल्या ५ आरोपींना शिताफीने अटक करुन अपहरण केलेले बाळ ४८ तासांच्या आत परत मिळविण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले असल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.  

कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पो.स्टे. हद्दीत फिर्यादी सुनिता राजकुमार नाथ वय ३० वर्षे राहणार कल्याण मुळ रा. हाजीपुर, पटना, बिहार राज्य ह्या ५ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास महंमद अली चौक, शिवमंदिराच्या बाजुस एका दुकानाच्या बाहेर त्याच्या ६ महिन्यांच्या मुलांसह झोपल्या असतांना रात्री १० ते १ च्या दरम्यान अज्ञात आरोपींनी सुनिता यांच्याजवळ झोपलेले त्यांचे ६ महिन्यांचे लहान बाळ जिवा याचे अपहरण केले होते. याबाबत ६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे सपोनि सरोदे, सपोनि पाटील व स्टाफ यांनी घटनास्थळ परीसरातील सी.सी.टि.व्ही फुटेजच्या मदतीने तांत्रीक तपास करुन या गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. त्याप्रमाणे आरोपींचा कसोशिने व चिकाटीने शोध घेवुन आरोपी विशाल चंद्रकांत त्र्यंबके वय २० वर्षे आटाळी आंबिवली,  कुणाल विष्णु कोट वय २३ वर्षे रा.साई राणा चाळ,दिवा पुर्व, आरती कुणाल कोट वय २२ वर्षे,  हिना फरहान माजीद वय २६ वर्षे रा. कोटर मशिद जवळ, भिवंडी,  फरहान अब्दुल रझाक माजीद वय ३८ वर्षे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन अपहरण केलेले ६ महिन्याचे बाळ ४८ तासाच्या  आत सुखरुपपणे परत मिळविले आहे.

आरोपी विशाल त्र्यंबके व कुणाल कोट हे काही कामधंदा करीत नाहीत. आरोपींनी आपसात संगनमत करुन आरोपी  हिना माजीद आणि फरहान माजीद यांना लहान बाळ  एक लाख रुपयांना विकण्यासाठी आरोपी विशाल त्र्यंबके व कुणाल कोट यांनी फिर्यादी जवळ झोपलेले लहान बाळ अलगद उचलुन त्याचे अपहरण करुन ते आरोपी आरती कोट हिच्या ताब्यात दिले. आरतीने हे बाळ आरोपी हिना माजीद व फरहान माजीद यांच्या ताब्यात देवुन ते तिघेही रिक्षातुन बाळाला घेवुन जात असतांना त्यांना शिताफीने अटक करुन त्यांच्या ताब्यातुन बाळ सुखरुपपणे परत मिळविले आहे.

आरोपी हिना व फरहान माजीद हे गुन्हयात निष्पन्न झालेल्या पाहीजे असलेल्या आरोपी महीलेला हे बाळ विक्री करणार असल्याचे निष्पन्न झाले असून या पाहीजे असलेल्या महिलेचा शोध सुरु आहे. तर या पाचही आरोपींना अटक केली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १४ जून पर्यंत पोलीस कोठडीमध्य रवानगी केली आहे.

सदरची कारवाई महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सपोनि दिपक सरोदे, प्रकाश पाटील, पोउनि संजय जगताप, सपोउनि जे.के.शिंदे, पोहवा निकाळे, भालेराव,पोना ठिकेकर, भालेराव,  भोईर, हासे, मधाळे, पोशि जाधव, निसार पिंजारी यांनी केली असून या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि ढोले हे करीत आहेत.

-कुणाल म्हात्रे

लसीकरणासाठी ग्रामीण भागातील जनतेला आणखी दिलासा ; मा.नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

कल्याण पूर्वेतील आडीवली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरु झाले असून स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हे लसीकरण केंद्र सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आणखी दिलासा मिळणार आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणारी समस्या लक्षात घेऊन आडीवली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी शासनाकडे पाठवपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून याठिकाणी नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन नगरसेवक कुणाल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील जनतेला लसीकरणासाठी लांब जावे लागणार नाही. तसेच नागरिकांचा वेळ आणि त्रास देखील वाचणार आहे.  

नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले असून आडीवली गावात लसीकरण केंद्र सुरू केल्या बद्दल नागरिकांनी नगरसेवक कुणाल पाटील यांचे आभार मानले आहेत. यावेळी उद्योगपती विजय भाने, माजी नगरसेवक गणेश भाने, माजी सरपंच बळीराम भाने, समाजसेवक अनिल पाटील,   माजी उपसरपंच वासुदेव गायकर, केशव भाने, पंढरीनाथ पाटील आदि मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

नागरिकांच्या लसीकरणासाठी मेहनत घेण्याऱ्या सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाटील यांनी आभार मानले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी याच भागातील द्वारली आरोग्य उपकेंद्र याठिकाणी देखील लसीकरण केंद्र सुरु झाले असून आता आडीवली येथे देखील लसीकरण सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणात ६ सापांना सर्पमित्रांनी दिले जीवदान

रविवारी कल्याण मध्ये सर्पमित्रांनी ६ सापांना जीवनदान दिले आहे. यामध्ये डुरक्या घोणस, २ धामण, धूळ नागीण आणि दिवड  या सापांचा समावेश आहे. सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश करंजावकर या दोघांनी हि कामगिरी केली आहे.

 कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील बितुल सोसयटी परिसरात भक्ष्य गिळंकुत करण्याच्या तयारीत असलेल्या साडेचार फुटी लांब सापाला पाहुन पाहणाऱ्याची भांबेरी उडली. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास डुरक्या साप आपले भक्ष्य उंदीर गिळंकृत करण्याच्या स्थितीत आढळल्याने बाघ्याची भितीने धादंल उडली स्थानिक रहिवाशी वाजपेयी यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँल केला. घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पोहचत डुरक्या या साडे चार फुटी घोणस सापास पकडले.

  डुरक्या सापाचे वैशिष्ट्य असे की  उंदीर, घुशी, सरडे यांना पकडल्या नंतर आवळुन त्यांचा श्वास बंद झाल्यानंतर भक्ष्य गिळंकृत करतो हा घोणस प्रकारात मोडत असून बिनविषारी साप आहे. या  डुरक्या सापाबाबत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी उपस्थितीता मध्ये जन जागृती करीत जीवनदान दिलेल्या डुरक्या सापास वनपाल एम्. डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडले.

       तर खडकपाडा प्रफुल सोसायटीमध्ये दिवड साप, उंबर्डे गावांमध्ये आठ-नऊ फुटाची धामण तर सापर्डे गावामध्ये धूळ नागीन मिळाली असल्याची माहिती सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे