पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची आरपीआयची मागणी

पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची मागणी आरपीआयने केली असून याबाबत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या शिष्टमंडळाने कल्याणच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

      पदोन्नतीमध्ये आरक्षण मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची मागणीसाठी आरपीआयच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेत हि मागणी राज्यसरकारकडे पाठविण्याची विनंती केली.

-कुणाल म्हात्रे

क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे – सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज

“क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करावे” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रविवार, ३० मे, २०२१ रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित निरंकारी संत समागमामध्ये जगभरातील लाखोंच्या संख्येने जुडलेल्या निरंकारी भक्तगणांना व प्रभु-प्रेमी सज्जनांना संबोधित करताना व्यक्त केले. संत निरंकारी मिशनच्या वेबसाईट द्वारे या समागमाचे थेट प्रसारण करण्यात आले.

      उल्लेखनीय आहे, की मागील २३ मे पासून सद्गुरु माता सुदीक्षाजी आठवड्यातून तीन वेळा आपले पावन दर्शन व आशीर्वाद व्हर्च्युअल संत समागमांच्या माध्यमातून प्रदान करत आहेत.

      सद्गुरु माताजी यांनी एका उदाहरणाद्वारे समजावले, की जर आपल्या पापणीचा केस डोळ्यात गेला तर डोळ्याला खूप त्रास होतो. प्रयत्न करुन तो केस काढला तरी काही काळ डोळ्याची चुरचूर चालूच राहते. अशाच प्रकारे जेव्हा आपण एखाद्याला कठोर वचन बोलतो आणि नंतर जरी त्याची माफी मागीतली तरी त्या व्यक्तीच्या मनाला झालेली वेदना दूर होत नाही. म्हणून आपण गोड आणि प्रिय वाणीने प्रत्येकाच्या हृदयामध्ये सकारात्मक जागा तयार करायची आहे.

            विविध देशांतील वक्त्यांबरोबरच मुंबईतील काही वक्त्यांनाही या समागमामध्ये आपले भाव व्यक्त करण्याची संधी मिळाली.

-कुणाल म्हात्रे

वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता शासनाने बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे उभारण्याची मागणी

वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता शासनाने बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे उभारण्याची मागणी सुराज्य अभियान केली मागणीहिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या माध्यमांतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सदर विषय संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी निर्देशित केला आहे.

महाराष्ट्र शासनाने वारंवार निर्माण होणारा चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन त्यापासून नागरिकांचे रक्षण होण्यासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांतील एकूण ११  ठिकाणी वर्ष 2019-20 मध्ये ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 42 कोटी 39 लाख रुपयांची तरतूदही केली होती; मात्र ठरलेल्या 18 महिन्यांच्या मुदतीत ही निवारा केंद्र उभारली गेली नाहीत. परिणामी नुकत्याच आलेल्या ‘तौक्ते’ या भयंकर चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीची प्रचंड हानी झाली आहे.    घरे, फळबागा, शेती यांची अतोनात हानी झाली. ठरलेल्या मुदतीत ही बांधकामे झाली असती ‘फना’, ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ अशा एका पाठोपाठ येणार्‍या चक्रीवादळांच्या काळात या निवारा केंद्रांचा मोठा आधार कोकणवासियांना झाला असता. तरी शासनाने वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.राज्याच्या महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव, तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांचे पालकमंत्री अनुक्रमे अदिती तटकरे, अनिल परब, डॉ. उदय सामंत आणि दादा भुसे यांनाही या विषयीचे निवेदन देण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण मधील कला शिक्षकाने अवघ्या दिड तासात रेखाटले शिवचरित्र

छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिनानिमित्त कल्याण येथील कला शिक्षक सुधाकर भामरे यांनी अवघ्या दीड तासात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यपर्यंतच्या प्रसंगांची ३२  रेखाटनांआधारे शिवचरित्र रेखाटण्याचा विक्रम केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून शिवाजी महाराजांचे चित्र देखील रेखाटले आहे. या सर्वांची नोंद नॅशनल ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

भामरे यांना ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डचे पदाधिकारी यांच्या कडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. भामरे यांचे रेखाटन सुरू असतांना त्यांचे चित्रकार मित्र आनंद मेहेर यांनी शिवचरित्र या विषयावर व्याख्यान दिले. विविध कलागुण असलेले सुधाकर भामरे हे २१ वर्षांपासून एल. के. हायस्कुल, चुनाभट्टी या शाळेत कलाशिक्षक म्हणून आपली सेवा बजावत आहेत. कलेवर नित्तान्त श्रद्धा असेल भामरे हे सुरवातीला थर्मोकोल पासून मूर्ती बनविण्याचे काम करत होते. त्यातही त्यांनी उंच उंच अशा साई बाबा, स्वामी विवेकानंद, गणपती बाप्पाची विविध रूपे अशा अनेक मूर्ती त्यांनी साकारल्या आहेत. विविध गणपती सजावटी ही त्यांनी केलेल्या आहेत.

 व्यक्तिचित्रण (पोट्रेट) मध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यांनी आता पर्यंत अनेक महत्वाच्या व्यक्तींचे पोट्रेट बनवलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जागतिक कीर्तीचे वकील उज्ज्वल निकम, कल्याणचे नगरसेवक रवी पाटील, समाजसेवक विकास पाटील आशा अनेक व्यक्तींचे पोट्रेट त्यांनी बनून त्यांना प्रत्यक्ष भेट म्हणून ही दिली आहेत.

सर्वसाधारण कुटुंबातून आपल्या अंगभूत कलागुणांच्या ताकदीने ते इथपर्यंत पोहचू शकले आहेत. कलेची कास असलेला हाडाचा, सहृदयी कलाशिक्षक त्यांच्यात पाहावयास मिळतो. त्याचे उदाहरण म्हणजे शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत कलेचे शिक्षण दिले आहे.  त्या सर्व विद्यार्थांनी उत्तम कामगिरी करत कला विषयांच्या विविध परीक्षांमध्ये घवघवीत यश ही संपादन केले आहे. त्यांची ही उत्तम कलोपासना पाहून तत्कालीन मुखमंत्री विलासराव देशमुख, तत्कालीन शालेय शिक्षण व युवक कल्याण मंत्री वसंत पुरके यांनी अभिनदांचे पत्र देऊन त्यांच्या कलासेवेचे कौतुक करत इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी कार्य असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रकल्पामध्ये मित्र आनंद मेहेर यांनी मोलाची साथ दिली.

-कुणाल म्हात्रे

वाढत्या महागाई संदर्भात मोदी सरकार विरोधात कल्याणमध्ये काँग्रेसचे आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने आज कल्याणमध्ये पेट्रोल आणि डिझेल च्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. आज आपल्या देशावर कोरोना महामारीचे मोठे संकट असूनही केंद्र सरकार दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कल्याण शहर काँग्रेस तर्फे आज पेट्रोल डिझेल वाढीबद्दल केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री मोदी यांचा निषेध करण्यात आला.

केंद्रामध्ये भाजपा सत्ता येण्यासाठी नागरिकांना अनेक वेळा डिझेल आणि पेट्रोल भावाबद्दल मोदींकडून मोठमोठे वायदे केले जात होते. २०१४ साली भाजपा सत्तेत येण्यापूर्वी ६० रुपये असणाऱ्या पेट्रोलने आज शंभरी पार केली आहे. ‘महंगाई बड रही है ।पेट्रोल सस्ता हुआ क्या?’ असे भारतातील जनतेला सांगणाऱ्या मोदी सरकारने आज पेट्रोलची शंभरी पार केली आहे. अनेक विरोधी पक्षाने केंद्र सरकारला “जुमला” सरकार असे नामकरण केले आहे. निवडणुकीच्या काळात नागरिकांची दिशाभूल करून, सत्तेवर आलेले भाजपाचे केंद्र सरकारने आज पेट्रोल आणि डिझेल ,गॅस वाढ करून गोरगरीब नागरिकांना महागाईच्या खाईत नेऊन सोडले आहे असे राज्यभरात चाललेल्या काँग्रेस आंदोलनातून निषेध व्यक्त करत बोलण्यात आले.

“वाह रे मोदी तेरा खेल…सोने के दाम से मिलेगा तेल”! , असे स्लोगन देऊन कल्याण शहर काँग्रेस तर्फे आज निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन कल्याण शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. ह्या वेळी प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी,महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, युवक अध्यक्ष मनीष देसले,सेवादल अध्यक्ष लालचंद तिवारी,अल्पसंख्यांक अध्यक्ष सलीम शेख,ब्लॉक अध्यक्ष शकील खान,भुपेश सिंग,विमल ठक्कर,नावेंदू पठारे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

-शरद शिंदे

कल्याणमध्ये सुरु झाली आठवणींचे झाड मोहीम

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याणमध्ये आठवणींचे झाड या मोहीमेची सुरुवात कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडीवरील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गुहेच्या परिसरात पिंपळ व कडूलिंबाच्या रोपणाने करण्यात आली.

कोरोना काळात आपल्या जवळच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना ऑक्सीजन अभावी व कोरोनामुळे आपल्याला गमवावे लागले. आपल्या आप्तस्वकीयांची आठवण म्हणून,  किमान १ झाड लावण्याचे आवाहन जेष्ठ शिक्षक अंकुर आहेर आणि इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. रेल चाईल्ड संस्था संचालित महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवली (प.) तसेच इतिहास संकलन समिती, डोंबिवली व इकोड्राईव्ह यंगस्टर्स, कल्याण यांनी एकत्र येऊन, ‘आठवणींची झाडे’ लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे.

आठवणींचे झाड या अभियानात सहभागी होत वृक्षारोपण करून 9773430684 या क्रमांकावर फोटो पाठविण्याचे आवाहन इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाउंडेशन तर्फे महेश बनकर यांनी केले आहे.

कुणाल म्हात्रे

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वृक्षारोपण आवाहनाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निसर्गाच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहचल्या असून अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन कायम राहण्यासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या वृक्षरोपण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शाळेच्या एक विद्यार्थी एक झाड उपक्रमाचा शुभारंभही नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. नूतन विद्यालयाच्या मैदानात ५ वर्षांपूर्वी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी लावलेल्या झाडाचा ५ वा वाढदिवस पवार यांच्याच हस्ते करण्यात आला. यावेळी अशोक, पाम, चिंच, कडू लिंब यासह अनेक औषधी वनस्पती असलेल्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणवासीयांना जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रभागात, सोसायटी व चाळ परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला कल्याणकरांनी मोठा प्रतिसाद देत अनेक प्रभागात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते यासर्व ठिकाणी नरेंद्र पवारांनी हजेरी लावून वृक्षारोपण केले.

प्रभाग क्र.३२ सिध्देश्वरआळी येथे  नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. फडके मैदान परिसरात भाजपाच्या प्रिया शर्मा यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नरेंद्र पवारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भावना मनराजा, नम्रता चव्हाण, ज्योतिताई भोईर आदी उपस्थित होते. प्रभाग २ कोलीवळी येथील वृंदावन सोसायटी परिसरात नरेंद्र पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संजय कारभारी, मिलिंद सिंग, मेघनाथ भंडारी, भाऊराव तायडे, नम्रता चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रभाग ४ मध्ये गौरीपाडा येथे भाजपा कल्याण जिल्ह्याचे सरचिटणीस अर्जुन म्हात्रे यांच्या माध्यमातून झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला मा आमदार नरेंद्र पवार,महिला अध्यक्षा मीरा खरे, वॉर्ड अध्यक्ष महेश केणे, जेष्ठ कार्यकर्ते श्याम केणे आदी उपस्थित होते. प्रभाग ३७ मध्ये माजी नगरसेवक सचिन खेमा यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नरेंद्र पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण आयोजित केले.

-कुणाल म्हात्रे

उरवडे औद्योगिक वसाहतीत रासायनिक कंपनीला आग ; आगीत १७ जणांच्या मृत्यूची माहिती

पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही घटना घडली. या दुर्घटनेत १५ महिला व दोन पुरुष कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. संबंधित कंपनीचं नाव ‘एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजिस’ असं आहे. मृतांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

मुळशी मधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारी दोनच्या दरम्यान आग लागली. या ठिकाणी पंधरा ते वीस कामगार अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती होती.

या केमिकल कंपनीत सकाळी ४१ कर्मचारी कामासाठी आले होते. या ४१ पैकी १७ लोकं मिसिंग आहेत. त्यापैकी १५ महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाले, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. आग लागलेली कंपनी आहे त्या कंपनीत सॅनिटायजर तयार केले जाते. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.

कंपनीला लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. केमिकल कंपनीत सॅनिटायझर निर्मिती होत असल्यानं आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याची शक्यता आहे. आग लागलेलं ठिकाण शहरी भागापासून लांब असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहनं पोहोचण्यास उशीर लागत होता.मात्र सध्या आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरू असल्याची माहिती आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरएसपी अधिकारी युनिट तर्फे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने कल्याण येथे आरएसपी अधिकारी युनिट कमांडर मणिलाल शिंपी यांच्या उपस्थितीत स्वामी नारायण हॉल ट्रस्टचे दिनेश ठक्कर, रुपेश भोईर यांच्या हस्ते रहेजा कॉम्प्लेक्स, लोक उद्यान, गुरुद्वारा कंपाऊंड या ठिकाणी लिंब, चिंच,पिंपळ, वड या वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने नैसर्गिक ऑक्सिजनची कमी भासत आहे. कोरोनाच्या महामारीत ऑक्सीजन लेवल कमी झाल्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला म्हणून एक मूल एक झाड ही संकल्पना घेऊन प्रत्येकाने आपल्या परिसरातील मैदानात सोसायटीच्या आवारात रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीने वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संकल्प करावा व येणाऱ्या काळात ऑक्सिजन अभावी दुर्घटना होऊ नयेत यासाठी या उपक्रमात सर्व बंधू-भगिनी सहभाग घ्यावा असे आवाहन आरएसपी कमांडर मणिलाल शिंपी यांनी केले. स्वामीनारायण ट्रस्टचे दिनेश थक्कर यांनी पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी १०० झाडांच्या रोपांची व्यवस्था केली.

-कुणाल म्हात्रे

एक विद्यार्थी एक रोप नूतन विद्यालयाचा उपक्रम

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण येथे पर्यावरण दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. एक विद्यार्थी एक रोप या उपक्रमाअंतर्गत अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमा प्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार, संस्था पदाधिकारी धनंजय पाठक आणि भारती वेदपाठक त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, सांस्कृतिक प्रमुख भोसले मॅडम आणि पवळे सर त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष म्हणजे खिळेमुक्त झाड अभियानाअंतर्गत काम करणारे शाळेचे माजी विद्यार्थी अविनाश पाटील, स्वप्नील शिरसाठ आणि भूषण राजेशिर्के यावेळी उपस्थित होते. अंघोळीची गोळी संस्थेच्या खिळेमुक्त झाड अभियानाची माहिती यावेळी त्यांनी उपस्थितांना दिली. भारत विकास परिषदेतर्फे आयोजित स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातुन सहावा क्रमांक प्राप्त शाळेचा आजी विद्यार्थी कुमार यश यादव देखील कार्यक्रमात उपस्थित होता. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

त्याचप्रमाणे २०१६ साली शाळेत वृक्षारोपण केले गेले होते त्या वृक्षांना पाच वर्ष पूर्ण झाली त्यांचा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आला. सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण केले गेले मान्यवरांचा तुळस रोप देऊन सत्कार करण्यात आला. केवळ वृक्षलागवड नाही तर वृक्षसंवर्धन, वृक्ष संरक्षण करण्याचा सर्वांनी निर्धार करावा असे मुख्याध्यापिका सय्यद यांनी यावेळी आवाहन केले.

-कुणाल म्हात्रे