MSRTC : रक्षाबंधन निमित्त प्रवासी बंधूंकडून एसटीला अब्जो ओवाळणी

MSRTC :- यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे १७ ते २० ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटीमधून महामंडळाला १२१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे २० ऑगस्टला एकाच दिवशी तब्बल ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे.

दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसातं विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण, या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनच्या दिवशी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधन दिवशी म्हणजे सोमवारी ३० कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तब्बल ३५ कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाले. या दोन दिवसात १ कोटी ६ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ५० लाख आहे.

रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाने प्रवाशांचे आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करुन विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे देखील हार्दिक अभिनंदन केले आहे.

MSRTC : Ovalani to ST from commuter brothers on the occasion of Rakshabandhan

Vitthalwadi ST Depot : प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष बॅज देऊन स्वातंत्र्य दिन साजरा

Vitthalwadi ST Depot : महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या विठ्ठलवाडी एसटी आगारात भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आगारात नव्याने नियुक्त झालेल्या आगार व्यवस्थापक गीता कोंडार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आगारातील पाच वर्षे सुरक्षित सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मान बॅज देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कल्याण रेल्वे स्थानकात स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू असल्याने कल्याणचा एसटी डेपो तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी एसटी आगारात हलविण्यात आला आहे. त्यामुळे सकाळपासूनच विठ्ठलवाडी एसटी आगारातून असंख्य वाहने ये जा करतात तसेच प्रवासी संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे विठ्ठलवाडी एसटी आगाराचे देखील व्यवस्थापन वाढले असून आता व्यवस्थापक पदी गीता कोंडार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याच हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्या समवेत सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक महेश भोये, वाहतूक निरीक्षक राजाराम जाधव व असंख्य एसटी कर्मचारी उपस्थित होते.

एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे म्हटले जाते. मात्र हाच प्रवास सुखाचा करण्यासाठी चालक व वाचकांचे सर्वात मोठे योगदान असते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विठ्ठलवाडी एसटी आगारातील पंकज भावसार व चालक नितीन चौधरी यांनी एसटी महामंडळात पाच वर्षे सुरक्षित सेवा दिल्याबद्दल त्यांचा विशेष बॅज देऊन सन्मान करण्यात आला. एसटी महामंडळात नोकरीला लागल्या पासून आम्ही आमची नोकरी इमानी इतभरे करीत आलो आहोत. एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी आहे याची पूर्ण जाण असल्याने आम्ही सर्व कर्मचारी प्राण ओतून काम करीत असतो अशा भावना यावेळी विठ्ठलवाडी एसटी आगाराचे कर्मचारी योगेंद्र कदम यांनी व्यक्त केल्या.

Vitthalwadi ST Depot : Celebrating Independence Day by awarding special badges to employees who provide safe services to passengers

Kalyan Student Suicide : पात्रता नसलेले शिक्षक असलेल्या खाजगी शाळा संस्थांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

Kalyan East : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात एका शाळकरी विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या नावे सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. ही बाब लक्षात घेता माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्राथमिक प्रशिक्षित मान्यता प्राप्त पात्रता नसलेले शिक्षक घेऊन खाजगी शाळेच्या माध्यमातून भरमसाठ फी घेऊन व्यापार करणाऱ्या संस्थामुळे विद्यार्थी व पालकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा संस्थांवर कारवाई करावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रशिक्षित पात्रता म्हणजे डी.एड, बी.एड पदवीधारक. या व्यतिरिक्त इतर कुणालाही विद्यार्थ्यांना शिकवण्याची पात्रता नसते. या प्रशिक्षणात बाल मानसशास्त्र हा महत्त्वाचा विषय असतो. परंतु खाजगी शाळांमध्ये अधिक नफा मिळवण्यासाठी भरमसाठ फी घेऊन पात्रता नसलेले शिक्षक म्हणून कमी पगारावर रुजू केले जातात. अशा शिक्षकांना बाल मानसशास्त्र माहीत नसल्याने विद्यार्थ्यांशी कसे वागावे हे या शिक्षकांना ठाऊक नसते. त्यामुळे समाजात अघटित प्रकार समोर येतात असे उदय रसाळ यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.

कल्याण डोंबिवलीत अशा अनेक शाळा आहेत ज्यात अशाच प्रकारची शिक्षक भरती आहे. एखादा विद्यार्थी शिक्षकांच्या भीतीने किंवा शिक्षकाच्या कार्य पद्धतीने सरळ आत्महत्या करतो हे प्रचंड भयानक आहे. जे मुलं आत्महत्या करत नाहीत त्या मुलांचा बौद्धिक विकास अशा शिक्षकांमुळे खुंटतो किंवा मुलं पुढील शिक्षणात मागे पडतात. काल दि १२ ऑगस्ट २४ रोजी, कल्याण पूर्व येथील एका शाळेतील बारा वर्षाच्या मुलाने असेच शिक्षकांच्या त्रासामुळे जीव दिला. असे अप्रशिक्षित शिक्षक ज्या ज्या शाळेमध्ये भरणा केले आहेत अशा संस्थांची त्वरित चौकशी करून कारवाई करावी. आणि अशा संस्था तसेच शाळांबाबत प्रशिक्षित शिक्षक भरती बाबत कठोर नियमावली करण्यात यावी. जी सर्व प्रकारच्या शाळांना लागू व्हावी अशी मागणी मा. मुख्य मंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे.

– उदय रसाळ (माजी नगरसेवक)

Kalyan Student Suicide : Letter to Chief Minister to take action against private school institutions with unqualified teachers

शिंदेशाही वर पुन्हा काळ चक्र; Dinkar Shinde यांचं निधन

Dinkar Shinde : महाराष्ट्राचे प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांचे तृतीय पुत्र गायक दिनकर शिंदे यांचे आज रात्री २ च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानकपणे जाण्याने शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कल्याण पूर्वेतील आनंदवाडी येथील राहत्या घरापासून त्यांची अंतिम यात्रा निघणार असून शहरासह राज्यभरातील त्यांच्या चाहत्या वर्गात शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्राचे लोकसंगीतकार गायक प्रल्हाद शिंदे यांची गाणी आजही अजरामर आहेत. त्यांच्या आवाजातील जादू ही केवळ त्यांच्या पुरतेच मर्यादित न राहता त्यांच्या आवाजाचा वारसा त्यांनी आपल्या आपत्यांनाही दिला. त्यातीलच एक अपत्य म्हणजे दिनकर प्रल्हाद शिंदे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या जे जे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांची अनेक गीते, भक्तिगीते, भीमगिते, कव्वाली लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. महाराष्ट्र भरात त्यांनी आपले संगीताचे कार्यक्रम सादर केले असून अजूनही ते संगीतमय प्रवासात जगत होते. मात्र आज १३ ऑगस्ट रोजी त्यांचा संगीतमय आयुष्याचा प्रवास इथेच थांबला आहे.

अवघ्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या आवाजाने वेड लावले त्या संगीतकार प्रल्हाद शिंदे यांचे २००४ साली निधन झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांना आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, दिनकर शिंदे, चंद्रकात शिंदे, सूर्यकांत शिंदे, सूरज शिंदे, किरण शिंदे अशी अपत्ये आहेत. मागील वर्षीच दिनकर शिंदे यांचे पुत्र सार्थक शिंदे यांचे निधन झाले होते. त्यांच्या अकाली मृत्यूने दिनकर शिंदे खचून गेले होते. मात्र एकामागोमाग एका वर्षी पिता पुत्राच्या निधनाने शिंदेशाही घरण्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Dinkar Shinde passed away

Nandivali – Chakkinaka मार्ग बनला खाजगी पार्किंग झोन? अर्धा रस्ता अडवून वाहने उभी

Chakkinaka : कल्याण पूर्वेतील श्री मलंगगड रोड सध्या वाहतुकीसाठी डोके दुखी बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबरोबरच रस्त्यालगत होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे जवळपास अर्धा रस्ता व्यापला जात आहे. यासंदर्भात कल्याण पूर्व वाहतूक उपविभाग शाखेकडेही तक्रारी प्राप्त होत असून यावर कायमचा अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

नेवाळी नाक्याहून चक्कीनाक्याकडे दिवसभरात हजारो वाहनांची रेलचेल असते. यात परिवहन बसेस सह, अवजड वाहने, रिक्षा तसेच असंख्य खाजगी वाहनांतून हजारो प्रवासी ये जा करीत असतात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. नांदिवली ते चक्कीनाका पर्यंतचा परिसर हा विशेष वर्दळ असणारा परिसर आहे. मात्र याच रस्त्यालगत अनेकदा डबल ट्रिपल लेन मध्ये चारचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे जवळपास निम्मा रस्ता अडवून निम्माच रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक राहतो. यावर वाहतूक विभागाने बेकायदा रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर अनेकदा दंड ठोठावला आहे.

केवळ हाच मार्ग नव्हे तर शहरात अनेक ठिकाणी रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. प्रशासनाने बऱ्याच मार्गावर नो पार्किंगचे बोर्ड लावले असून काही ठिकाणी P1, P2 अशी संकल्पना राबवली आहे. आता हाच नियम श्री मलंगगड मार्गावर देखील लागू करावा अशी मागणी वाहतूक विभागाकडे होऊ लागली आहे. त्यामुळे आता वाहतूक विभाग यावर काय कार्यवाही करतेय ते आता पहावे लागणार आहे.

Nandivali – Chakkinaka road to become a private parking zone?

Kalyan East : शिक्षिकेसह विद्यार्थ्याचे नाव लिहून शाळकरी विद्यार्थ्याने घेतला गळफास

Kalyan East : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात राहणाऱ्या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून त्यांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोट मध्ये त्याने एका शिक्षिकेसह विद्यार्थ्याचे नाव लिहून ठेवले होते.

विघ्नेश प्रमोदकुमार पात्रा असे या मुलाचे नाव असून तो आपल्या आई वडीलांसह राहत होता. तसेच त्याला एक बहीण देखील आहे. रविवारी सायंकाळी घरी कोणी नसताना त्याने एक सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. एका शिक्षिकीने व विद्यार्थ्याने मला चिडवल्याने आत्महत्या करीत असल्याचे या नोट मध्ये लिहण्यात आले आहे. मात्र त्याच्या या कृत्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

अलिकडल्या काळात आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी मानसिक तणावातून आत्महत्या केली जाते हे प्रमुख कारण मानले जाते. यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील तितकाच समावेश होतो. यामध्ये आत्महत्या करण्यामागे काही गंभीर कारणे असतात तर काही प्रकरणात शुल्लक कारणाने आपले जीवन संपवल्याचे देखील समोर येते. त्यामुळे अशा विषयांवर शाळा कॉलेजात विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे बनले आहे असे दिसते. त्याचबरोबर पालकांनी देखील मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्यांच्या मनातील भावना जाणून घ्यायला हव्यात ही काळाची गरज बनू लागली आहे.

Kalyan East : A school student hanged himself after writing the name of the student along with the teacher

डोंबिवली गणेश मंदिर जीर्णोद्धारासाठी युवा उद्योजकाने दिली ३० किलो चांदीची वीट

डोंबिवली : शहराचे आराध्य दैवत मानले जाणाऱ्या गणेश मंदिराची स्थापना होऊन १०० वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता या डोंबिवली गणेश मंदिर संस्थानचा जीर्णोद्धार केला जाणार असून मोठ्या प्रमाणात चांदी लागणार आहे. याकरिता अनेक दानशूरांना आवाहन केले जात आहे. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिल्यानंतर नांदेड मधील एका युवा उद्योजकाने आज बाप्पा चरणी ३० किलो ९०० ग्रॅम वजनी चांदीची वीट अर्पण केली आहे.

डोंबिवलीच्या गणेश मंदिराच्या विश्वस्तांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना मोठ्या प्रमाणावर चांदी लागेल अशी माहिती दिली होती. त्यानंतर चव्हाण यांनी नांदेडचे युवा उद्योजक सुमित मोगरे यांच्याशी संपर्क केला होता. यानंतर चव्हाण यांच्या शब्दाला मान देत सुमित यांनी तात्काळ चांदी दान देण्याचे ठरविले. आज सकाळच्या दरम्यान मंदिरात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी चांदीची वीट गणरायाच्या चरणी अर्पण केली. या विटेची किंमत साधारणपणे २७ लाख २७ हजार रुपयांच्या घरात आहे.

युवा उद्योजक सुमित मोगरे यांचे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहे. त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासाठी २ कोटी ४० लाख रुपयांची चांदी अर्पण केली होती. त्यापाठोपाठ त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता डोंबिवलीच्या गणेश मंदिरासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर चांदी दान केली आहे. असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोगरे यांचे आभार व्यक्त केले.

A young entrepreneur donated 30 kg of silver brick for the renovation of Dombivli Ganesh Temple

Kalyan East भागात हायटेक सेमी इंग्लिश स्कुल उभारण्याची मागणी

Kalyan East : दिवसेंदिवस मराठी शाळेतील मुलांची घटती पटसंख्या, शाळेसाठी असलेल्या राखीव भूखंडावर झालेली अतिक्रमणे, शाळांची झालेली दुरावस्था तसेच कल्याण डोंबिवली शहरातील सर्व महापालिकेच्या शाळा या सेमिइंग्लिश करणे बाबत माजी नगरसेवक नितीन निकम यांनी नुकतीच कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांची भेट घेतली.

Kalyan East भागात मोठ्या प्रमाणावर गरीब व मध्यमवर्गीय नागरिक राहत असून इंग्रजी शाळेत आकारण्यात येणारी भरमसाठ फी व डोनेशन आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना परवडणारे नाही. कल्याण पूर्वेत नेतीवली येथे महापालिकेच्या मालकीची केवळ एकमेव सेमीइंग्लिश शाळा आहे. मात्र ती शहराच्या एका वेगळ्या टोकाला असल्याने कल्याण पूर्वेच्या मध्यभागी असलेल्या काटेमानिवली शाळा व जाईबाई शाळा येथे तातडीने सेमीइंग्लिश स्कुल सुरू करावे अशी मागणी निकम यांनी केली आहे.

अलीकडल्या काळात काटेमानिवली येथील शाळेची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. शाळेसाठी असलेल्या राखीव भूखंडावर झालेली अतिक्रमणे हटवून तेथे नव्याने सुसज्ज ईमारत बांधून कल्याण पूर्वेतील मुलांसाठी सर्व सोयीसुविधा असलेली हायटेक सेमी इंग्लिश स्कुल सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील नितीन निकम यांनी आयुक्तांना केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक कैलास शिंदे देखील उपस्थित होते.

Demand for establishment of Hi-Tech Semi English School in Kalyan East area

Kokan ST Ganeshotsav : गणेशोत्सवाला कोकणात यंदाच्या वर्षी धावणार ४३०० एसटी बसेस

Kokan ST Ganeshotsav : ७ सप्टेंबर रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ३५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये ८०० बसेसची वाढ करण्यात आली आहे.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे ४३०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation अॅपव्दारे, उपलब्ध होणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे.

Kokan ST Ganeshotsav : 4300 ST buses will run in Konkan this year for Ganeshotsav

Kalyan East : कल्याण पूर्व विधानसभेसाठी प्रथम दावा भाजपचाच असेल – मंत्री रवींद्र चव्हाण

Kalyan East : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी आघाडीवर जाणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र असे असले तरी सध्या युती आघाड्यांमध्ये आपसातच रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभेला चर्चेत असलेली कल्याणची जागा आता विधानसभेला देखील चर्चेचा विषय बनली आहे. येथील आमदार कोण असेल? त्यापूर्वी ही जागा नेमकं लढणार कोण? हा पेच आता वाढू लागला आहे. मात्र कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्वेची जागा ही भाजपच लढवेल असे आता म्हटले आहे.

अंबरनाथ गोळीबार प्रकरणानंतर तुरुंगात असलेले गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेचे स्थानिक आमदार असून मागील १५ वर्षे ३ टर्म त्यांनी या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले आहे. गोळीबार प्रकरणा नंतर ते तुरुंगात असल्यानंतर आता कल्याण पूर्वेत सत्तापालट होणार का? अशा चर्चा सुरू होत अनेकांची नावे पुढे येऊ लागली. त्यानंतर हा विधानसभा क्षेत्र शिवसेनेला देऊन कल्याण पश्चिमचा भाजपला दिला जाईल असेही बोलले जात होते. मात्र मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही जागा भाजपचे लढवेल असे सांगितल्यानंतर आता कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गणपत गायकवाड हे वर्षानुवर्षे या भागाचे नेतृत्व करीत आलेले आहेत. ते सातत्याने निवडूनही येतात. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी मतदान केले आहे. ते येथील विद्यमान आमदार असल्याने महायुतीत या ठिकाणी प्रथम दावा हा भाजपचाच असेल. निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणे हे गैर नाही त्याचप्रमाणे दावे करणे देखील बरोबरच आहे असे यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले. कल्याण पूर्वेत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

Kalyan East : BJP’s first claim for Kalyan East Assembly will be – Minister Ravindra Chavan