डिसेंबर महिना सुरू होता. मुंबई शहरातील वातावरणात काहीसा थंडावा सुरू झाला होता. याच दिवसांत फिटनेस साठी जीम करणाऱ्यांची संख्या अचानकपणे वाढीस लागते. त्याचबरोबर आणखी अनेक गोष्टी होतात ज्या थंडीच्या दिवसांतच पाहायला मिळतात.मी आणि संदेश दोघेही एकाच जीम मध्ये होतो. दोघेही मुळात पत्रकार असल्याने वेळात वेळ काढून संध्याकाळी जीम करत होतो. आमची मैत्रीण करिश्मा हिने आम्हाला फिटनेस वेट गेन साठी प्रोटीनचा एक डब्बा दिला होता. मिल्क शेक बनवून काही दिवस प्यायचे आणि व्यायाम करायचा. बरेच दिवस हेच सुरू होते.
एकेदिवशी संध्याकाळी जिम मधून मी आणि संदेश बाहेर आलो.“करिश्मा ने कसलं डबड दिलय काय माहीत. वजन वाढलं तर ठीक नायतर चाळीतली पोरं म्हणतील माझा डब्बा चोरला परत कुणीतरी” मी संदेशला म्हणालो.“होईल रे भावा… तुला ना जरा पेशन्स नाहीत. आता कुठे आठवडा झालाय. त्या समीर दादाची बघ कशी एका महिन्यात पर्सनालिटी बनली” रुमाल बेग मध्ये टाकत संदेश बोलत होता.“संदेश ऐक ना… मी काय म्हणतो. असं पण इलेक्शनला थोडा वेळ आहे. नंतर वेळ मिळेल नाही मिळेल. मस्त पैकी कुठे तरी फिरायला जायचं का ?” बाईक जवळ येऊन मी त्याला प्रश्न केला.“भावा तुझ्या मनात तेच माझ्या मनात. लाव बर विशालला फोन लगीच” संदेश म्हणाला.“नाय नको… आपण उद्या ऑफिसमध्ये ठरवूयात. उगाच आता फोन लावला ना भावा अर्धा तास रस्त्यात जाईन बोलत बसलो तर. त्यापेक्षा आता घरी जाऊ. जेवण करू आणि झोपताना व्हॉट्स अप वर बोलू” मी बाईक ला चावी लावली आणि घरी जायला निघालो.“व्हॉट्सअपला तू बोल विशालशी. मी आज ऑनलाइन नाही येणार. आज शेतावर जायचाय पोर पोपटी करणारेत” संदेश देखील त्याच्या बाईकवर बसला. आणि काही वेळात आम्ही दोघेही तेथून निघून आपापल्या घरी आलो. घरी आल्यानंतर झोपण्यापूर्वी विशालला फिरायला जाण्यासाठीची कल्पना देऊन ठेवली. आता बाकीचं बोलणं ऑफिसमध्ये.
दुसऱ्यादिवशी सकाळी दहा वाजताच मी ऑफिसमध्ये गेलो.
“अरे वा दिवाडकर साहेब आज चक्क एक तास लवकर” संदीप सरांनी आश्चर्य व्यक्त केले.
माझ्या पाठोपाठच संदेश आणि विशालही ऑफिसमध्ये आले.
“कमाल आहे… आज काय ठरवलं काय तुम्ही. तुम्ही जर असेच लवकर आलात तर आपला चॅनल लवकरच पुढे जाईल. क्या बात हे?” संदीप सर पुन्हा आश्चर्य व्यक्त करत बोलू लागले.
“सर ही बातमी घ्यायची का ?” श्वेताने सरांना मागून आवाज दिला.
“अरे मला काय विचारते संपादकांना फोन लाव. विचार घ्यायची का नाय” संदीप सर एक फाईल उचलून बाहेर गेले.
“ए सेंडी चल रे व्हीओ घे हा आज लवकर आला आहेस तर” श्वेताने माझ्या हातात स्क्रिप्ट टेकवली.
“ए काय राव तू. याच्या साठी आलो का ?” मी कॉलर माईक घेऊन रेकॉर्डिंगला बसलो.
“रॉल….” म्हणत गौरवने रेकॉर्डिंग स्टार्ट केलं. आणि पटकन मी बातमी वाचून संपवली. आणि पटकन माईक बंद करून उठून बाहेरच्या खोलीत आलो.
“संदेश… करिश्मा आली का ? संदीप सर काय बोलले आणि?” मी सोफ्यावर बसलो.
“ही बघ आली. 100 वर्षे आयुष्य आहे तुला” संदेशने दारात पाहत संगीतले.
करिश्मा दार उघडून आत येत “ओहो… आज सगळे माझ्या आधी ? काय विशेष ?” करिश्मा रेकॉर्डिंग रूम मध्ये बेग ठेवायला निघाली.
“करिश्मा सर्वांना आवाज दे आणि तू पण ये” विशालने तिला सांगितले.
“का ??? काही मिटिंग आहे का ?” करिश्मा आत जाता जाता बोलली.
“तू ये तर पहिले सर्वांना बोलव” विशाल बोलला.
एक एक करत सगळे बाहेरच्या रूम मध्ये आले.
“साहेब तुम्ही बोलता का मी बोलू?” विशालने मला विचारले.
“बोला की आता तुम्हीच त्यात काय?” मी म्हणालो.
“आपल्याला पिकनिकला जायचं आहे येत्या शुक्रवारी. तेव्हा सगळ्यांना तयार राहायचय” विशाल म्हणाला.
“ओह वाव” करिष्मा म्हणाली.
“अरे पण न्यूजच कस काय ? संदीप सर आणि शिंदे सर ?” श्वेताने आडवा प्रश्न केला.
“ते सोड तुला काय करायचंय?” विशाल म्हणाला.
“अरे शिंदे सरांशी बोलणं झालंय सकाळी. ते ओके बोलले.” मी सांगितले.
“आणि संदीप सर?” श्वेताने विचारले.
“संदीप सर ना. हे बघ आले” संदेश म्हणाला.
संदीप सर दरवाजा खोलून आत आले. आणि आत जमलेली मिटिंग पाहून बोलले.
“हे काय ? कसली मिटिंग ? आता निघाले का काय पिकनिकला ?” संदीप सरांनी प्रश्न केला.
“नाय ओ भाऊ जरा सांगतोय सर्वांना एकदा. म्हणजे तोपर्यंत तयारी करायला.” विशाल म्हणाला.
“अच्छा ओके. बरं ऐका आता सगळ्यांनी. बरेच दिवस..महिने… महिने काय 2 वर्षे आपण कुठे पिकनिकला गेलो नाही. माझ्याही मनात होतंच जायचं. तर तुमच्या सर्वांच्या मनात आलंच आहे तर आपण येत्या शुक्रवारी सर्वे मस्तपैकी फिरायला जातोय.” असे म्हणत संदीप सरांनी शर्ट फोल्ड केले.
“येस……” करिश्मा खुष झाली.
“ओ सर बसा ना इथं. ऋषी चेअर आन ना एक आतून” संदेशने सांगितले.
“ए नको राहू दे..” संदीप सर उभे राहून पुढे बोलू लागले.
“बरं ऐका… विशाल आणि संदेश मला सांगत होते मघाशी. मी पण वैतागलोय खूप. म्हटलं आता फ्रेश व्हावं मस्तपैकी. शिवाय दादा स्वतः परवा म्हटले की टीमला घेऊन जा बाहेर कुठंतरी दोन दिवस. तर शिंदेना मी बोललो याबद्दल तर ते म्हटले शुक्रवार शनिवार जाऊयात. म्हणून या शुक्रवारी आपण निघतोय.” संदीप सर सांगत होते.
“कुठे सर ?” श्वेताने प्रश्न केला.
संदीप सर हसूनच “अरे हो हो… मी बोलतोय ना… लगेच काय घाई…. हा तर… आपण पिकनिक साठी यावेळी कुठलंही रिसॉर्ट किंवा फार्म हाऊसला नाही जाते. यावेळी आपण संतोष साहेबांच्या गावी जातोय. लोणावळा.” संदीप सर म्हणाले.
“ओहो….चलो फिर” करिश्मा माझ्या कडे पाहत म्हणाली.
“साहेब बघ कसे खुश झाले लगेच” विशाल माझ्याकडे बघून म्हणाला.
“लोणावळाला कुठे जातोय आणि काय काय प्लॅन आहे ते सांग संतोष तू आता सर्वांना” संदीप सरांनी मला पुढील सूचना द्यायला सांगितले.
“आपण जी पिकनीक फिक्स केली आहे. त्यानुसार आपण लोणावळा जवळील. म्हणजेच मावळ तालुक्यातील पवना लेकला जात आहोत. आणि तिथे माझ्या एका मित्राचं केम्पिंग आहे. आपण तिथे खास करून केम्पिंगची मजा घ्यायला जातोय. आणि खरंच खूप मजा येईल” मी सांगितले.
“ओह क्या बात हे ? फिर तो और मजा आयेगा” ऋषी बोलला.
“बरं ऐका आता… मला दादांशी बोलावं लागेल. कारण पुढची एरेंजमेंट करायला लागेल. संतोष तुझ्या त्या मित्राला एडव्हान्स किती पे करायचे हे एकदा बोलून घे. आणि तिकडे काही कमी पडायला नको. सर्व मेनेज करून ठेव. उद्या पर्यंत मी तुला केश ट्रान्सफर करतो.” असे म्हणत संदीप सर खुर्चीवर बसले.
“श्वेता ही लिस्ट वाच यात कुणाची नावे राहिली का चेक कर” संदेश तिच्या हातात कागद देतो.
“संदीप सर, शिंदे सर, विशाल, संतोष, संदेश, अंकुश, अशोक, गौरव, ऋषी, करिश्मा, श्वेता… बस अजून कोण ?” श्वेताने लिस्ट वाचली.
“जीवनजिचं नाव टाक त्यात… आणि मोरे मेम ला पण विचार” संदीप सर पाणी पिता पिता म्हणाले.
बराचवेळ चाललेल्या मिटिंग नंतर
“चला… सगळे कामाला लागा. अजून चार दिवस आहेत. फॉलोअप मध्ये रहा. चला संतोष, संदेश, विशाल तुमच्याकडे काय न्यूज आज ?” संदीप सरांनी विचारले.
“सर आमच्या एरियात काल रेप झालता.. बघतो काय मिळतंय का बाईट वगैरे” विशाल म्हणाला.
“रेप ना ? झाला रोज होतो… मला माहितीये तुम्ही काय फेकता ते.. आता एक काम करा. विशाल तू आणि संदेश दोघेही पोलीस स्टेशनला जायचं. तिथून काल कोळसेवाडी मध्ये जो मॅटर झाला ना त्याची अपडेट घ्यायची. आरोपीला पकडले आहे वाटत. शिंदे सरांना कॉल करा आणि पोहोचा. संतोष तू… तुझं जॅकेट कुठंय?” मला सरांनी विचारले.
“आहे ना सर बेगेत.” मी म्हणालो.
“हे दोघे तिथून बाईट आणतील. आत मध्ये शिंदेंच्या पेडला एफआयआर ची कॉपी आहे. ती घे आणि स्क्रिप्ट बनव. पटकन अँकर घे तो गुन्हा आणि मोकळा हो. बनकर आला की पटकन एडिट करून अंकुश लगेच ऑन एअर करेल. जास्त खेळत नाय बसायचं. पटकन एकदम” संदीप सर म्हणाले.
क्रमशः