Power Cut Kalyan : पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून सर्व वीज यंत्रणांची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. याचकरिता उद्या दि.१६ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असणार असल्याचा एक मॅसेज समाज माध्यमांवर फिरत आहे. दोन तीन नव्हे तर तब्बल सात तास कल्याण पूर्वेतील काही भागाचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याने नागरिकांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे. ऐन उकाड्यात इतके तास रहायचे कसे? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.
समाज माध्यमांवर फिरत असलेल्या मेसेजनुसार या सात तासांत छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी, विजयनगर, आमराई, गवळी नगर, तिसगाव नाका, आदर्श नगर, संतोष नगर, चक्की नाका परिसराचा वीजपुरवठा बंद असणार आहे. देखभाल दुरुस्तीकरिता पॉवर कट घेण्यात येत असल्याने नागरिकांनी महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे या मॅसेजमध्ये म्हटले आहे. अलिकडल्या काळात तापमानाचा पारा हा ४०℃ ला खेटला असून विजसेवा खंडित झाल्यावर रहायचे कसे असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.
कल्याण पूर्वेतील परिसर हा चाळ परिसर असल्याने पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दुपारच्या तापमानात इतक्या तासांचा पॉवर कट सोसवणे जिकरीचे आहे. तर अनेक घरांत लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक तर आजारी रुग्ण देखील आहेत. शिवाय व्यापारी वर्ग, डेअरी चालक देखील या निर्णयाविरोधात आहेत. त्यामुळे हा पॉवर कट सलग सात तासांचा न घेता तो दोन अथवा तीन टप्प्यात घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. इतक्या तासांच्या पॉवर कट विरोधात लोकप्रतिनिधी अथवा राजकीय नेते आवाज का उठवीत नाहीत? त्यांच्या घरात इन्व्हर्टर व गाडीत एसी असतो म्हणून त्यांना सामान्य नागरिकांना बसणारी झळ समजणार नाही असाही रोष कल्याण पूर्वतील नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे महावितरणला आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करावा लागण्याची शक्यता आहे.
Power Cut Kalyan: Power cut for seven hours tomorrow in Kalyan East