Raj Thackeray in Kalyan : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अलीकडेच कोकण दौऱ्यावर असल्याचे पहायला मिळाले होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता १२ तारखे पासून ते ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. याच जिल्ह्यात सर्वाधिक बळ असलेल्या कल्याण डोंबिवलीचा दौरा ते १४ आणि १५ तारखेला करणार आहेत. अशी माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बदलापूर येथे झालेल्या आढावा बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांना दिली.
जवळपास अडीच वर्षे प्रलंबित असलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक यावर्षी होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मनसे आता या शहरात सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी बदलापूर येथे मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी राज ठाकरेंच्या दौर्याविषयी माहिती दिली. रविवार दि.१४ मे रोजी ते कल्याण मधील पदाधिकार्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तर सोमवारी १५ मे रोजी डोंबिवलीतील मनसे पदाधिकार्यांची ते भेट घेऊन चर्चा करणार आहेत. पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी हा दौरा असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली प्रमाणेच राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे पार पडण्याची शक्यता आहे. मात्र मागील महापालिका पंचवार्षिक निवडणूकित मनसेची सर्वाधिक ताकद ही याच महानगरपालिकेमध्ये आहे. मनसेचे या महानगरपालिकेत १० नगरसेवक तसेच विरोधी पक्ष नेतेपद होते. शिवाय याच मनपा क्षेत्रात मनसेचे आमदार देखील आहेत. मनसेला याच मनपा क्षेत्रात दोन वेळा आमदारपद मिळाल्याने कल्याण डोंबिवलीत असलेली मनसेची ताकद आणखीन वाढविण्यासाठी मनसे आता काय प्रयत्न करणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
–संतोष दिवाडकर
Raj Thackeray in Kalyan: MNS President Raj Thackeray’s Kalyan Dombivali Tour
राज ठाकरे यांच्या दौ-यांनी काय साधणार केडीएमसी मध्ये चांगल्याप्रकारे नगरसेवक निवडून आले होते पण नंतरच्या काळात काय झाले