राजू पाटील : मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानुसार कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा जोरदार प्रचार केला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत त्याच राजू पाटलांविरोधात शिवसेनेने अमित ठाकरेंपाठोपाठ आता राजू पाटील यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून लोकसभेत डॉ.श्रीकांत शिंदे यांना राजू पाटलांच्या मदतीने भरघोस मतदान झाले होते. मात्र आता मनसे युतीचा भाग नसल्याने शिवसेनेने त्यांच्या उमेदवारा विरोधात उमेदवार उभे केले आहेत. मसनेचे आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीण विधानसभेतून दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या समोर महाविकास आघाडी कडून शिवसेना उबाठा पक्षाचे सुभाष भोईर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र आता त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे यांना देखील उमेदवारी दिली आहे.
कल्याण ग्रामीणचे शिवसेना उबाठाचे उमेदवार सुभाष भोईर हे २०१४-२०१९ या काळात याच मतदारसंघात आमदार होते. मात्र २०१९ साली त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर भोईर यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे यांनी देखील महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. शिवसेनेने उमेदवार दिल्यामुळे मनसेत मात्र काहीसा संताप व्यक्त केला जात आहे.
Raju Patil campaigned strongly for Shiv Sena in the Lok Sabha