Titwala : शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने राबवलेल्या आरटीई शिक्षण योजने अंतर्गत मुलांना शिक्षण आणि शैक्षणिक साहित्य शाळेने देणे बंधनकारक असतांना टिटवाळ्यातील रवींद्र विद्यालयाने मात्र आरटीई विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यास नकार दिला असून शाळेकडून पालकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे बुधवार पर्यंत शाळेने मुलांना शालेय साहित्य न दिल्यास शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आता पालकांनी दिला आहे.
सरकारने राबवलेल्या आरटीई शिक्षण योजने अंतर्गत टिटवाळा येथील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी रवींद्र विद्यालय या शाळेत प्रवेश मिळवला आहे. तेव्हा पासून शाळेने कधीही शैक्षणिक साहित्य वाटप केलेले नाही. मात्र हया वर्षी सर्व पालक शाळेच्या मुख्याध्यापकांना शैक्षणिक साहित्य वाटप कधी करणार हे विचारायला २८ एप्रिल रोजी गेले असता मुख्याध्यापकांनी असभ्यतेची भाषा वापरून पालकांवर दबाव टाकला. तसेच तुमची ऐपत नव्हती आपल्या मुलांना शिकवण्याची तर या शाळेत मुलांना का टाकले? तसेच तुमच्या मुलांना शिकवायचे आहे की नाही हे आमच्या हातात आहे. म्हणून यापुढे तुम्ही पालकांनी एकत्र एऊन अशी तक्रार करायची नाही. तुम्हाला शैक्षणिक साहित्य शाळेतूनच विकत घ्यावे लागेल. असे म्हणून आम्हाला शाळे बाहेर काढून दिले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
याबाबत सर्व पालकांनी टिटवाळा पोलिस स्टेशन येथे शाळेविरोधात तक्रार केली. त्या नंतर २ मे रोजी सर्व पालकांनी केडीएमसीच्या शिक्षण विभाग कार्यालयात शाळेची लेखी तक्रार केली. यानंतर शाळेला १४ मे रोजी आरटीईचे एक लेखी पत्रक दिले गेले. आरटीईच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य व गणवेश ४८ तासांच्या आत मोफत पुरविण्यात यावे असा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. परंतु शाळेने शिक्षण विभागाचा आदेश न मानता शाळा आपल्या मनमर्जि प्रमाणे वागत असल्याचा आविर्भाव पालक व्यक्त करीत आहेत.
त्यामुळे बुधवारपर्यंत आरटीई अंतर्गत पालकांना पाल्यासाठीचे मूलभूत अधिकार अंतर्गत येणारे शैक्षणिक साहित्य मिळाले नाही तर गुरुवारी शिक्षण विभाग कार्यालयात सर्व पालकांसोबत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या पालकांनी दिला आहे.
-कुणाल म्हात्रे
RTE of Titwala school refuses to provide educational materials to students? A warning of sit-in agitation at the parents’ education board office