School Election : विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच नागरिक शास्त्राचे प्रत्यक्ष धडे मिळाले पाहिजेत, लोकशाहीचं प्रत्यक्ष ज्ञान मिळाले पाहिजे या उद्देशाने ही घेतलेली निवडणूक निश्चितच उत्साह वाढवणारी, प्रेरणा देणारी, तसेच शालेय विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारे आहे. सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी शालेय निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत सरपंच राजेंद्र मढवी यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक पार पडली. त्यावेळी तयार झालेल्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा देताना राजेंद्र मढवी बोलत होते.
आपल्या गावाचा कारभार ते देशाचा कारभार लोकच चालवत असतात. तसेच आपल्या शाळेचा आपणच कारभार चालवायला पाहिजे, यासाठीच ही शालेय निवडणूक घेतली असे उपक्रमाचे संकल्पना असलेले राहनाळ शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे नुकतीच शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी वोटिंग मशीन या अँड्रॉइडचा वापर करून त्याच्या साह्याने मतदान घेतले. राहनाळ शाळेत एकूण सात पदांसाठी हे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी अनघा दळवी यांनी मोबाईल ॲपमध्ये नामनिर्देशित उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले.
या निवडणूक प्रक्रियेत एकूण सात जागांसाठी २२ विद्यार्थी उमेदवार रिंगणात उतरले होते. फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी दहा मुलांनी माघार घेतली. व बारा उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुलांनी प्रचार केला. निवडणूक कर्मचारी एक, दोन, तीन, केंद्राध्यक्ष ही कामे विद्यार्थ्यांनीच केली. त्यासाठी चित्रा पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कोणीही बोगस मतदान किंवा नोटाचा वापर केला नाही हे विशेष असे रसिका पाटील यांनी सांगितले. इयत्ता तिसरी ते सातवीच्या शंभर मुलांनी यावेळी मतदान केले. मतदानाची वेळ संपल्यावर बटन बंद करून मतदान प्रक्रिया संपल्याचे मतदान अधिकारी तेजस बोटके यांनी निकालासाठी रिझल्ट बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल सर्वांच्या उपस्थितीत जाहीर केला.
निवडणूकीत जिंकलेल्या विद्यार्थांनी निकाल लागताच एकच जल्लोष केला. निवडून आलेल्या विद्यार्थ्यांमधूनच मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री राकेश चौहान, उपमुख्यमंत्री सुमंत सिंग, शिक्षण मंत्री तन्वी निस्कुळ, सांस्कृतिक मंत्री मीत कडू, आरोग्यमंत्री संस्कृती शिगवण, पर्यावरण मंत्री नेहा झिंझुरडे, क्रीडामंत्री श्रेयस कुंभार यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाचे राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांनी शाळ व श्रीफळ देऊन सत्कार करत या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राहनाळ गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
–कुणाल म्हात्रे
School Election: Election was held in Zilla Parishad school; Chief Minister elected among students