Ganesh Vidya Mandir : शिर्डी व कोपरगाव येथे नुकत्याच राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा पार पडल्या. शिर्डी येथे १८ वर्षे वयोगटा खालील तर कोपरगाव येथे १४ वर्षाखालील मुलांची स्पर्धा पार पडली. या स्पर्धांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत १४ वर्षाखालील मुलांचा संघ उपविजेता ठरला. यानंतर आता १८ वर्षाखालील मुलांची राष्ट्रीय लंगडी स्पर्धा आंध्र प्रदेश येथे व १४ वर्षाखालील मुलांची राष्ट्रीय लंगडी स्पर्धा तामिळनाडू येथे होणार आहे. या दोन्ही वयोगटात होणाऱ्या स्पर्धेत कल्याणच्या गणेश विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले असून ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे.
महाराष्ट्राच्या १८ वयोगटा खालील संघात गितेश काकडे व लवेश क्षेत्री तर १४ वर्षाखालील संघात साईराज मळेकर यांची निवड करण्यात आली आहे. नागरीक सेवा मंडळ संचलित गणेश विद्यामंदिर या शाळेत शिक्षणासह त्यांचे कला,गुण व खेळाला महत्त्व दिले जाते. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थी मोठी मजल मारतात अशा भावना यावेळी शाळेचे शिक्षक मिलिंद धंबा यांनी व्यक्त केल्या. सदर विद्यार्थ्यांना त्यांनी लंगडी खेळ तसेच स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले असून ते स्वतः लंगडीचे राज्य पंच आहेत.
शाळेच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान बोरसे, सेक्रेटरी दीपक पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्मिता मराठे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पांजली शेनवी यांच्यासह प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी महाराष्ट्र संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली लंगडी असोसिएशनचे सचिव प्रवीण खाडे, कार्याध्यक्ष अविनाश नलावडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेले गितेश काकडे, लवेश क्षेत्री, साईराज मळेकर व मार्गदर्शक शिक्षक मिलिंद धंबा यांचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
Selection of students from Ganesh Vidya Mandir School in Maharashtra Langdi team