डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण, डोंबिवली विभागातील खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रत्येक लाभार्थी घटकाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना माजी मंत्री तसेच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुंंबईतील अधिकाऱ्यांना दिले.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात किती अंमलबजावणी झाली? आणि करायची असेल तर ती कशा पध्दतीने करता येईल? लाभार्थींना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल? तसेच कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, या दृष्टीने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी अश्विनी जोशी, तहसीलदार विजय वाकोडे, साहाय्यक अधिकारी हर्षद घोटेकर उपस्थित होते.
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात कल्याण डोंबिवली पालिकेसह, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था भागात ही योजना तातडीने राबविण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तेथे या योजनेचा विनाविलंब शुभारंभ करावा. या योजनेतून खरा लाभार्थी अजिबात वंचित राहता कामा नये. प्राधिकरणाच्या अन्य क्षेत्रातही खासगी, शासकीय जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे, गतिमानतेने राबविता येईल यासाठी प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरू कराव्यात. या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे येत असतील तर त्याचे शासन पातळीवर निराकरण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आमदार रवींद्र चव्हाण यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही ही योजना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले.
Slum rehabilitation scheme in Kalyan Dombivali; Ravindra Chavan discusses with authority officials