कल्याण : शहराच्या पूर्व भागातील पूना लिंक रोडवर असलेल्या पदपथावर एका बांधकाम विकासकाने आपले काही सामान मांडून ठेवले होते. याबाबत पत्रकार आनंद गायकवाड यांनी वृत्त प्रकाशित केले होते. यामुळे सदर विकासकांनी त्यांना धमकी दिली असल्याची तक्रार आनंद गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ अंतर्गत कोळसेवाडी पोलिसांनी संबंधित विकासकांवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास थेट सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे हे स्वतः करीत आहेत.
विकासकाने फुटपाथवर बांधकामाचे सामान ठेवल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर महानगरपालिकेने विकासकाला दंड ठोठावला होता. मात्र दंडात्मक कारवाई नंतरही पदपथ मोकळा न झाल्याने पत्रकार आनंद गायकवाड यांनी पुन्हा चित्रीकरण केले. याचदरम्यान विकासकांकडून धमकी दिली गेली असल्याचे आनंद गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिल्या नंतर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
देशभरात पत्रकारांवर होणारे हल्ले पाहता या घटनांना आळा घालण्यासाठी पत्रकार संघटना पुढे येत असतात. आता या प्रकरणी देखील पत्रकार संघटनेने कल्याण तहसीलदार यांच्या मार्फत थेट राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन दिले आहे. महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष दिले असते तर हा गुन्हा दाखल झाला नसता अशा भावना पत्रकार आनंद गायकवाड यांनी व्यक्त केल्या.
शहरातील पदपथांवर व्यापाऱ्यांचा ताबा?
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेले पदपथ हे जवळपास गायब झाले असल्याचे चित्र आहे. पूना लिंक रोड सारख्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर असलेल्या पदपथावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र संपूर्ण शहरभरात दिसत आहे. मग हे पदपथ नक्की नागरिकांना चालण्यासाठी आहेत? दिखाव्यासाठी आहेत? की व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी दिलेत? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
पदपथावर अतिक्रमण केल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावर उतरून चालावे लागते. यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या अगोदर असे अपघात झालेही आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन पदपथावर होणारी अतिक्रमणे रोखणार का? की फक्त दंडात्मक कारवाई करून पुढे परिस्थिती जैसे थे असणार? असा केविलवाणा सवाल आता स्मार्ट सिटीतील नागरिकांना पडला आहे.
–संतोष दिवाडकर
Statement to Kalyan Tehsildar of Journalist Association