कल्याणमध्ये आंदोलनातून मनसेने दाखवली ताकद

क.डों.म.पा.ची निवडणूक महिन्याभरावर आलेली असताना शहरात राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. राजकीय पक्ष आपआपला जोर दाखवू लागले आहेत. मनसेने देखील डोंबिवलीत दोन झटके झेलल्यानंतर कल्याणमध्ये आंदोलनाच्या मार्फत शक्तीप्रदर्शन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण-डोंबिवली शहराच्या वतीने आज पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आणि वाढीव वीजबिल विरोधात महामोर्चा आयोजित केला होता. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यलयाला भेट दिली. डोंबिवली शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज घरत तसेच कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, मनसेचे काही नगरसेवक, माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात एकवटले होते.

शहरात होणार्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्ष तयार असल्याचा इशारा मनसेने विरोधकांना दिलाय का ? असाही सवाल या आंदोलनातील शक्तीप्रदर्शनातून व्यक्त केला जातोय.

राज ठाकरेंमुळे महापालिकेत कॅबिन मिळाली आणि आता पक्ष सोडला. – नव्या शहराध्यक्षाची घणाघाती टीका.

डोंबिवलीत मनसेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना मनसेच्या नव्या डोंबिवली शहराध्यक्षांनी मनसे सोडलेल्यां वर घणाघाती टीका केली.

मागील आठवड्यात डोंबिवली मध्ये मनसेला दोन मोठे धक्के बसल्याचे पहायला मिळाले. एक म्हणजे शहराध्यक्ष पद सोडून राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर मनसेचे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली.

डोंबिवलीत पार पडलेल्या महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात बोलताना मनोज घरत यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर नाव न घेता सडकून टिका केली. जे गेले त्यांनी स्वतःचा इमान विकला आहे. त्यांनी स्वतःला विकलंय असे त्यांनी आरोप केले. तर राज साहेबांमुळे ज्यांना इतके वर्ष महापालिकेत केबिन मिळाली ते देखील स्वार्थीपणे सोडून गेलेत. आपण इमान विकायचा नाही असा घणाघाती आरोप त्यांनी मनसे सोडून गेलेल्यांवर केला आहे. डोंबिवलीत आयोजित पक्षाच्या मेळाव्यातून ते बोलत होते. मनोज घरत यांची नियुक्ती झाल्या नंतर मनसेने कल्याण डोंबिवलीत पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते.

सत्ताधाऱ्यांना आंदोलन करायची गरज काय ? – मनसे नेत्या शालिनी ठाकरे

डोंबिवली ग्रामीण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच समारंभाला मनसे नेत्या तसेच सरचिटणीस शालिनी ठाकरे उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारला जाब विचारला.

महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शालिनी ठाकरे आल्या होत्या. मात्र पत्रकारांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या आंदोलना बाबत विचारले असता शालिनी ठाकरे यांनी दोन्ही पक्षाना सवाल केले आहेत.

शुक्रवारी भाजपाने वाढीव वीजबिल कमी करण्यासाठीच्या मुद्द्यावर राज्यातील सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले. तर शिवसेनेने देखील वाढीव इंधनदर आणि गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकार विरोधात आंदोलन केले. हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. तरीही आंदोलन करीत आहेत. यांना आंदोलन करायची काय आवश्यकता आहे ? हे प्रश्न सोडवायचे सोडून एकमेकांवर लादत आहेत. असा आरोप व सवाल मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केल्या. डोंबिवलीतील आयोजित मनसेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.