KDMC Election : स्वबळावर लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मानस; – जगन्नाथ शिंदे

कल्याण :- राष्ट्रवादी कॉंगेसच्या वर्धापन दिनानिमित्त ८ ते १६ जून दरम्यान वर्धापन दिन सप्ताह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जात असून या दरम्यान विरोधी पक्षाकडून ओबीसी आरक्षणाबाबत पसरवल्या जाणार्या चुकीच्या माहितीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत बोलताना आप्पा शिंदे यांनी अप्रत्यक्ष स्वबळाचा नारा दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्राचे ओबीसी आरक्षण नाकारले गेले असून मध्यप्रदेशला मात्र ओबीसी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्रला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. पुढे याबाबत बोलताना शिंदे यांनी पक्षपातळीवर महाविकास आघाडी होईल असे संकेत आहेत. मात्र स्थानिक  महानगर पातळीवर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इच्छुक असतात अशावेळी आघाडी झाल्यास कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता असल्यानेच पालिका निवडणुका KDMC Election स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात आली आहे. निवडणुका जवळ आल्यानंतरच आघाडीबाबत योग्य तो  निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नसताना महापालिका निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षण वगळून होत असल्या तरी येत्या केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकीट वाटप २७ टक्के ओबीसी आरक्षण गृहीत धरूनच केले जाणार असल्याचे माजी आमदार व कल्याण डोंबवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.

-रोशन उबाळे

“… तर मग कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार” – जगन्नाथ शिंदे

उल्हासनदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ‘मी कल्याणकर’ ही सामाजिक संस्था गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यासाठी नदीपात्रात बसलेली आहे. क.डों.म.पा.चे माजी नगरसेवक नितीन निकम आणि त्यांच्या समवेत काही समाजसेवक देखील या आंदोलनासाठी बसलेले आहेत.

नितीन निकम हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने उल्हासनदी प्रश्नावर आंदोलने करीत आहेत. उल्हासनदी पत्रातील परिस्थिती पुन्हा एकदा दयनीय झाली आहे. नागरिकांच्या हिताचा प्रश्न असल्याने त्यांना राजकीय पक्ष व संघटनांचा पाठिंबा दरवेळेस मिळतो. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः निकम यांच्या आंदोलनाला मागील वेळेस भेट दिली होती.

उल्हास नदी प्रश्नावर सुरू असलेल्या धरणे आंदोलना संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली आणि समस्या जाणून घेतली. आंदोलनाचा गंभीर विषय अद्यापही प्रशासन मनावर घेत नसल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते सबंधित यंत्रणांच्या भेटीगाठी घेणार आहेत. जर प्रशासनाने हा तिढा सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात निवडणूक जवळ आलेली असताना शिवसेना,भाजपा,मनसे आदी पक्षांनी याच महिन्यात विविध विषयावर आंदोलने पुकारली होती. आणि याच आंदोलनातुन राजकीय पक्षांनी आपले शक्तिप्रदर्शन केले. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील उल्हास नदी प्रश्नावर आंदोलन करण्याचा तयारीत आहे. त्यामुळे उल्हास नदी प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही दिवसांत रस्त्यावर उतरताना दिसू शकेल. आणि असा इशाराही जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आता दिला आहे.