Dombivali Ro Ro Boat ने होणार मुंबईचा प्रवास सोपा

Dombivali Ro Ro Boat : रेल्वेची जीवघेणी गर्दी आणि रस्त्यावरील वेळघेणी वाहतूक कोंडी यामुळं डोंबिवलीकर त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता लवकरच डोंबिवलीकरांना मुंबईचा प्रवास जलमार्गाने करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. डोंबिवली मोठागाव जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात झाली असून रो-रो बोटसाठी जेट्टीच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून सुमारे १००० कोटी रुपयांचा डी.पी.आर. तयार करण्यात आला असून प्राथमिक स्वरूपात ८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील डोंबिवली मोठागाव जेट्टीसाठी २२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर डोंबिवलीहून मुंबई, नवी मुंबई, वसई आणि विरार या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या वाहनांसह जलमार्गाने रो-रो बोटीने प्रवास करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन खर्च वाचणार आहे. शिवाय वाहनांमुळे होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होईल. वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणारा असून सागरी परिवहन क्षेत्रालाही मोठी चालना मिळू शकते.

डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, वसई आणि विरार यांना जलमार्गाने जोडणारा हा ऐतिहासिक प्रकल्प नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला सुलभ, वेगवान आणि पर्यावरणस्नेही सिद्ध करू शकतो. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास ही मार्गिका कल्याण शहराला देखील जोडली जाऊ शकते. एका रो रो बोटमध्ये शेकडो प्रवासी आपल्या वाहनांसह प्रवास करू शकतात. सध्या ही सेवा मुंबई ते भाईंदर येथे सुरू असून चारचाकी वाहन धारकांना २४० रुपये तर दुचाकी धारकांना ६० रुपये तिकीट आकारले जात आहे. या प्रवासातून पैसे, वेळ, इंधनाची बचत होत असून वाहतूक कोंडी व प्रदूषणमुक्त प्रवास डोंबिवलीकरांना करता येणार आहे. सागरी मार्गाने सुरू होणारी ही परिवहन सेवा येत्या काळात क्रांती घडवून आणू शकते.

Travel to Mumbai will be easier with Dombivali Ro Ro Boat

कल्याण डोंबिवलीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना; रवींद्र चव्हाण यांची प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा

डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण, डोंबिवली विभागातील खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रत्येक लाभार्थी घटकाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना माजी मंत्री तसेच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुंंबईतील अधिकाऱ्यांना दिले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात किती अंमलबजावणी झाली? आणि करायची असेल तर ती कशा पध्दतीने करता येईल? लाभार्थींना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल? तसेच कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, या दृष्टीने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी अश्विनी जोशी, तहसीलदार विजय वाकोडे, साहाय्यक अधिकारी हर्षद घोटेकर उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात कल्याण डोंबिवली पालिकेसह, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था भागात ही योजना तातडीने राबविण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तेथे या योजनेचा विनाविलंब शुभारंभ करावा. या योजनेतून खरा लाभार्थी अजिबात वंचित राहता कामा नये. प्राधिकरणाच्या अन्य क्षेत्रातही खासगी, शासकीय जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे, गतिमानतेने राबविता येईल यासाठी प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरू कराव्यात. या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे येत असतील तर त्याचे शासन पातळीवर निराकरण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आमदार रवींद्र चव्हाण यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही ही योजना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले.

Slum rehabilitation scheme in Kalyan Dombivali; Ravindra Chavan discusses with authority officials

MSRTC Union : रापम ठाणे विभागात एकनाथ शिंदेंच्या कामगार संघटनेचा झंझावात

MSRTC Union : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील ठाणे १, ठाणे २, कल्याण, विठ्ठलवाडी व वाडा आगारानंतर मुरबाड व शहापूर आगारात एकनाथ शिंदेंच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेने जोरदार संघटना बांधणी केली आहे. किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळामध्ये सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये सभासद वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्यानेच मुरबाड शहापूर आगारातील ५० हून अधिक कामगारांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये प्रवेश केला आहे.

मुरबाड आगारात एकनाथ शांताराम मोरे, जितेंद्र भराडे, रामचंद्र खुडके, संतोष हेमाडे, जिवन कापडी, अमोल देशमुख व अशोक पालवे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय कर्मचारी सेनेत जाहीर प्रवेश केला. तर शहापूर आगारात रमेश कुडव, राजेंद्र विशे, रोहिदास भालके, राहुल पडवळ, रविंद्र जागले, शशिकांत धापटे, जब्बार पठाण, प्रविण पाटोळे, राजेश पाटील, ज्ञानेश्वर लोहकरे, विजय घुडे, बाबुराव मोजे, दिनेश भोजणे आदींनी प्रवेश केला.

संघटना प्रवेशदरम्यान पंकज वालावलकर, दत्ता अडागळे, स्वप्नील गुरव, योगेंद्र कदम, गणेश तावडे, नितीन खंडागळे, प्रभाकर कानगुले व बाळू शरणागत यांनी मुरबाड व शहापूर आगारात दौऱ्या दरम्यान भेट दिली. आगारातील कामगाराच्या समस्या, अडचणी ऐकून घेतल्या व त्याबाबत कामगारांना योग्य मार्गदर्शन करून त्याच्या शंका दूर करण्यात आल्या. त्याच बरोबर राष्ट्रीय कर्मचारी सेनेची ध्येय धोरणे सांगितली असल्याची माहिती यावेळी संघटनेचे पदाधिकारी योगेंद्र कदम यांनी एमएच मराठीशी बोलताना दिली.

Eknath Shinde’s workers’ Union clash in MSRTC Thane division

Thakurli bridge : ठाकुर्ली उड्डाणपूलाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा

Thakurli bridge : डोंबिवलीचे आमदार व भाजप प्रदेश कार्यध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महानगर पालिका प्रशासनास डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स.वा. जोशी शाळेसमोरील उड्डाणपुलाच्या म्हासोबा चौकापर्यंतच्या विस्ताराचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पुलामुळे बाधित ६० रहिवाशांना पर्यायी घरांची वाटप पत्रे (अलॉटमेंट लेटर) वितरित करण्याचा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाने आज दुपारी तीन वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे.

सदर पुलामुळे विस्थापीत होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सदर उड्डाणपुलाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता काम वेगाने पूढे जाईल असे चव्हाण म्हणाले.

Clear the way for remaining work of Thakurli bridge

KDMC News : मनसे शाखेसमोरील शेडवर कारवाई करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांची बदली

KDMC News : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील मनसे शाखेबाहेर असलेल्या पत्र्यांच्या शेडवर काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने तोडक कारवाई केली होती. 4 जे प्रभागाच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई केली होती. त्यांच्या या कारवाई नंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावून तक्रारदारांचा निषेध व्यक्त केला होता. मात्र कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता काही दिवसांपूर्वी बदली झाल्याचे समोर आले आहे. परंतु ही बदली कारवाईमुळे झाली नसून महापालिकेच्या कार्यप्रणालीनुसार करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानंतरही अनेक ठिकाणी असंख्य अनधिकृत ढाबे राजरोसपणे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता मनसे शाखेसमोरील पत्र्याचे शेड तोडणे महापालिकेला जास्त महत्त्वाचे वाटते का? असा सवाल मनसे पदाधिकार्यांनी उपस्थित केला होता. तसेच सत्ताधारी पक्षातील काही राजकीय मंडळींनी आकसापोटी महापालिकेकडे तक्रार केली असल्याचे सांगत मनसेने शाखेसमोरील रस्त्यालगत एक भलेमोठे होर्डिंग्ज लावले होते. ज्यात ‘कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही’ असा राज ठाकरेंच्या विधानाचा मजकूर लिहलेला होता. तक्रादारांच्या डोळ्यावरची सत्तेची झापड उतरविण्यासाठी आम्ही बॅनर लावला असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांनी 4 जे प्रभाग क्षेत्राच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त सविता हिले यांची 5 ड प्रभाग क्षेत्रात बदली केली आहे. तर 4 जे प्रभाग क्षेत्राच्या सहाय्यक आयुक्त पदी सचिन तामखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत 5 ड प्रभाग क्षेत्राचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्यावर सामान्य प्रशासन सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मनसे शेडबाहेरील पत्र्यांच्या शेडवर केलेली कारवाई ही प्राप्त तक्रारीनुसार करण्यात आली होती. झालेल्या बदल्या या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी करण्यात आल्या असल्याचे बदली आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

KDMC News : Transfer of Assistant Commissioner who took action on shed in front of MNS branch

Dombivli Dahihandi : यंदा दीपेश म्हात्रे रिक्षाचालकांना देणार दहीहंडी फोडण्याचा मान

Dombivli Dahihandi : दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने ‘स्वराज्य दहीकाला उत्सव’ या वर्षी तिसऱ्यांदा सम्राट चौक, डोंबिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे. डोंबिवली शहरातील नागरिकांची सेवा, कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य तसेच अनेकदा अॅम्बुलन्स पोहोचण्यापूर्वीच नागरिकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे काम रिक्षा चालक करतात. या अद्वितीय कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्यांना या वर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात येत असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दहीहंडी महोत्सवाच्या संध्याकाळी ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोड यांचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे. तसेच प्रसिद्ध युट्युबर विनायक माळी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या वर्षीच्या दहीहंडी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये असून ते सर्वांसाठी खुले असणार आहे. द्वितीय पारितोषिक देखील एक लाख रुपये असून ते मात्र डोंबिवलीतील मंडळांसाठीच आरक्षित असेल. 26 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता कृष्ण जन्मोत्सव पारंपरिक भजनांच्या माध्यमातून आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तरी, या उत्सवात सहभागी होऊन दहीहंडीचा आनंद सर्व नागरिकांनी घ्यावा, असे दीपेश म्हात्रे फाउंडेशनकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

सण उत्सवात विविध पक्ष रस्त्यावर कमानी उभ्या करतात, मोठमोठे होर्डिंग्ज आणि बॅनर लावतात. सध्या रस्त्यांची सर्वत्र दुरावस्था झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कमानी उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका असा संदेश दीपेश म्हात्रे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.

Dombivli Dahihandi : This year Dipesh Mhatre will give the honor of breaking Dahihandi to the rickshaw drivers

Kalyan East : शिक्षिकेसह विद्यार्थ्याचे नाव लिहून शाळकरी विद्यार्थ्याने घेतला गळफास

Kalyan East : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात राहणाऱ्या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून त्यांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोट मध्ये त्याने एका शिक्षिकेसह विद्यार्थ्याचे नाव लिहून ठेवले होते.

विघ्नेश प्रमोदकुमार पात्रा असे या मुलाचे नाव असून तो आपल्या आई वडीलांसह राहत होता. तसेच त्याला एक बहीण देखील आहे. रविवारी सायंकाळी घरी कोणी नसताना त्याने एक सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. एका शिक्षिकीने व विद्यार्थ्याने मला चिडवल्याने आत्महत्या करीत असल्याचे या नोट मध्ये लिहण्यात आले आहे. मात्र त्याच्या या कृत्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

अलिकडल्या काळात आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी मानसिक तणावातून आत्महत्या केली जाते हे प्रमुख कारण मानले जाते. यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील तितकाच समावेश होतो. यामध्ये आत्महत्या करण्यामागे काही गंभीर कारणे असतात तर काही प्रकरणात शुल्लक कारणाने आपले जीवन संपवल्याचे देखील समोर येते. त्यामुळे अशा विषयांवर शाळा कॉलेजात विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे बनले आहे असे दिसते. त्याचबरोबर पालकांनी देखील मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्यांच्या मनातील भावना जाणून घ्यायला हव्यात ही काळाची गरज बनू लागली आहे.

Kalyan East : A school student hanged himself after writing the name of the student along with the teacher

डोंबिवली गणेश मंदिर जीर्णोद्धारासाठी युवा उद्योजकाने दिली ३० किलो चांदीची वीट

डोंबिवली : शहराचे आराध्य दैवत मानले जाणाऱ्या गणेश मंदिराची स्थापना होऊन १०० वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता या डोंबिवली गणेश मंदिर संस्थानचा जीर्णोद्धार केला जाणार असून मोठ्या प्रमाणात चांदी लागणार आहे. याकरिता अनेक दानशूरांना आवाहन केले जात आहे. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिल्यानंतर नांदेड मधील एका युवा उद्योजकाने आज बाप्पा चरणी ३० किलो ९०० ग्रॅम वजनी चांदीची वीट अर्पण केली आहे.

डोंबिवलीच्या गणेश मंदिराच्या विश्वस्तांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना मोठ्या प्रमाणावर चांदी लागेल अशी माहिती दिली होती. त्यानंतर चव्हाण यांनी नांदेडचे युवा उद्योजक सुमित मोगरे यांच्याशी संपर्क केला होता. यानंतर चव्हाण यांच्या शब्दाला मान देत सुमित यांनी तात्काळ चांदी दान देण्याचे ठरविले. आज सकाळच्या दरम्यान मंदिरात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी चांदीची वीट गणरायाच्या चरणी अर्पण केली. या विटेची किंमत साधारणपणे २७ लाख २७ हजार रुपयांच्या घरात आहे.

युवा उद्योजक सुमित मोगरे यांचे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहे. त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासाठी २ कोटी ४० लाख रुपयांची चांदी अर्पण केली होती. त्यापाठोपाठ त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता डोंबिवलीच्या गणेश मंदिरासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर चांदी दान केली आहे. असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोगरे यांचे आभार व्यक्त केले.

A young entrepreneur donated 30 kg of silver brick for the renovation of Dombivli Ganesh Temple

Kalyan East भागात हायटेक सेमी इंग्लिश स्कुल उभारण्याची मागणी

Kalyan East : दिवसेंदिवस मराठी शाळेतील मुलांची घटती पटसंख्या, शाळेसाठी असलेल्या राखीव भूखंडावर झालेली अतिक्रमणे, शाळांची झालेली दुरावस्था तसेच कल्याण डोंबिवली शहरातील सर्व महापालिकेच्या शाळा या सेमिइंग्लिश करणे बाबत माजी नगरसेवक नितीन निकम यांनी नुकतीच कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांची भेट घेतली.

Kalyan East भागात मोठ्या प्रमाणावर गरीब व मध्यमवर्गीय नागरिक राहत असून इंग्रजी शाळेत आकारण्यात येणारी भरमसाठ फी व डोनेशन आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना परवडणारे नाही. कल्याण पूर्वेत नेतीवली येथे महापालिकेच्या मालकीची केवळ एकमेव सेमीइंग्लिश शाळा आहे. मात्र ती शहराच्या एका वेगळ्या टोकाला असल्याने कल्याण पूर्वेच्या मध्यभागी असलेल्या काटेमानिवली शाळा व जाईबाई शाळा येथे तातडीने सेमीइंग्लिश स्कुल सुरू करावे अशी मागणी निकम यांनी केली आहे.

अलीकडल्या काळात काटेमानिवली येथील शाळेची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. शाळेसाठी असलेल्या राखीव भूखंडावर झालेली अतिक्रमणे हटवून तेथे नव्याने सुसज्ज ईमारत बांधून कल्याण पूर्वेतील मुलांसाठी सर्व सोयीसुविधा असलेली हायटेक सेमी इंग्लिश स्कुल सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील नितीन निकम यांनी आयुक्तांना केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक कैलास शिंदे देखील उपस्थित होते.

Demand for establishment of Hi-Tech Semi English School in Kalyan East area

Kalyan East : कल्याण पूर्व विधानसभेसाठी प्रथम दावा भाजपचाच असेल – मंत्री रवींद्र चव्हाण

Kalyan East : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी आघाडीवर जाणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र असे असले तरी सध्या युती आघाड्यांमध्ये आपसातच रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभेला चर्चेत असलेली कल्याणची जागा आता विधानसभेला देखील चर्चेचा विषय बनली आहे. येथील आमदार कोण असेल? त्यापूर्वी ही जागा नेमकं लढणार कोण? हा पेच आता वाढू लागला आहे. मात्र कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्वेची जागा ही भाजपच लढवेल असे आता म्हटले आहे.

अंबरनाथ गोळीबार प्रकरणानंतर तुरुंगात असलेले गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेचे स्थानिक आमदार असून मागील १५ वर्षे ३ टर्म त्यांनी या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले आहे. गोळीबार प्रकरणा नंतर ते तुरुंगात असल्यानंतर आता कल्याण पूर्वेत सत्तापालट होणार का? अशा चर्चा सुरू होत अनेकांची नावे पुढे येऊ लागली. त्यानंतर हा विधानसभा क्षेत्र शिवसेनेला देऊन कल्याण पश्चिमचा भाजपला दिला जाईल असेही बोलले जात होते. मात्र मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही जागा भाजपचे लढवेल असे सांगितल्यानंतर आता कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गणपत गायकवाड हे वर्षानुवर्षे या भागाचे नेतृत्व करीत आलेले आहेत. ते सातत्याने निवडूनही येतात. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी मतदान केले आहे. ते येथील विद्यमान आमदार असल्याने महायुतीत या ठिकाणी प्रथम दावा हा भाजपचाच असेल. निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणे हे गैर नाही त्याचप्रमाणे दावे करणे देखील बरोबरच आहे असे यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले. कल्याण पूर्वेत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

Kalyan East : BJP’s first claim for Kalyan East Assembly will be – Minister Ravindra Chavan