Kalyan Shiv Jayanti : कल्याण पूर्वेतील गेल्या ३६ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मंडळ कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने १९ फेब्रुवारी या शिवजयंती दिनी वृक्ष रोपांच्या माध्यमातून भव्य अशी शिवप्रतीमा निर्माण करण्यात येणार असून शिव जयंती नंतर हीच वृक्षांची रोपे विविध संस्था संघटनांना वृक्षारोपणासाठी देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली.
गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षीही भव्य स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंध कायम असल्याने कोरोना संदर्भातील सर्व अटी शर्तींना अधिन राहून १९ फेब्रुवारी रोजी शिव जयंती उत्सव तिसगांवातील तिसाई मंदीराच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या उत्सवा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहर्याची विविध प्रकारच्या सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून प्रतीकृती निर्माण करण्यात येणार असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष रुपेश गायकवाड, सचिव राजु अंकूश तसेच विश्वस्त नरेंद्र सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुमारे पंधराशे चौरस फुटामध्ये साकारण्यात येणाऱ्या शिवप्रतीमेत वापरली जाणारी वृक्षांची रोपे सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था संघटनांना देण्यात येणार असुन ज्या संस्था संघटना या रोपांचे पुढच्या वर्षा अखेर चांगल्या प्रकारे जतन आणि संवर्धन करतील अशा संस्था संघटनांचा पुढील वर्षीच्या जयंती उत्सवात विशेष असा सन्मान करण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले असून मंडळाच्या या उपक्रमातील साकारण्यात येणाऱ्या शिव प्रतीमेचे दर्शन घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.
-कुणाल म्हात्रे
Web Title : The image of Shivaji maharaj will be created through 6,000 saplings in Kalyan East