Vitthalwadi Police : उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात १५ फेब्रुवारी रोजी एका बांगलादेशी इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. जोहरुल शेख (वय ३३ वर्षे) हा इसम बांगलादेशहुन घुसखोरी करून भारतात शिरला होता. पासपोर्ट पडताळणी करिता बनावट कागदपत्रांसह सदर इसम पोलीस स्थानकातील गोपनीय कक्षात आला असता त्याच्याजवळ असलेल्या बनावट कागदपत्रांमुळे तो पकडला गेला. यानंतर तो भारतीय नसून बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले.
विठ्ठलवाडी पोलीस स्थानकातील गोपनीय कक्षात नियमितपणे काम करणाऱ्या महेंद्र भोई, दिनेश शिर्के, चेतन खांबेकर, संतोष कुडले या पोलीस कर्मचाऱ्यांसमोर शनिवारी एक इसम कागदपत्रे घेऊन पासपोर्ट पडताळणी करिता आला होता. सदर इसमाला हिंदी भाषा येत नसल्याने तो बंगालीतच बोलत होता. त्याने दिलेल्या कागदपत्रांमध्ये पोलिसांना त्याने दिलेला जन्म दाखला संशयास्पद आढळून आला. सातवी शिकलेल्या जोहरुलने स्वतःच्या हाताने तो बनवला असावा असा संशय पोलिसांना आला. शिवाय जन्म दाखल्याचा कागद हा त्याच्या जन्माच्या वेळीचाही वाटत नव्हता. हाच नवा कोरा बनावट जन्मदाखला पोलीसांच्या नजरेत आला आणि पोलिसांनी जोहरुलची झाडाझडती सुरू केली.
जोहरुल बंगालीत बोलत असल्याने पोलिसांनी तात्काळ बंगाली भाषिकाला बोलावून घेतले. जोहरूलचा मोबाईल फोन तपासला असता त्यात बांगलादेशी नंबर आढळून आले. व्हॉट्सअप वरूनच अगोदर डाईल केलेल्या नंबरवर पुन्हा कॉल केले असता समोरून सदर इसम बांगलादेशी असल्याचे सांगत त्याचा पत्ताही पोलिसांना दिला. यानंतर पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेत त्याचा पुढील तपास सुरू केला आहे.
अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोरी वाढली असून कोलकत्तासह मुंबई व उपनगरात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने हे आश्रय घेत आहेत. आशेळे, माणेरे तसेच कल्याण शहराबाहेर असलेल्या ग्रामीण पट्ट्यात नव्याने उभ्या राहणाऱ्या चाळींमध्ये हे बांगलादेशी आश्रय घेत असल्याच्या जोरदर चर्चा आहेत. असे असल्यास अनेकांनी बनावट कागदपत्रे बनवली असण्याची शक्यताही आहे. असाच एक इसम पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. असे अजून किती बांगलादेशी शहरात लपले आहेत याची विशेष शोधमोहीम तसेच जनजागृती करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.
Vitthalwadi Police : Bangladeshi intruder arrested during passport verification