Vitthalwadi ST Depot : महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या विठ्ठलवाडी एसटी आगारात भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आगारात नव्याने नियुक्त झालेल्या आगार व्यवस्थापक गीता कोंडार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आगारातील पाच वर्षे सुरक्षित सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मान बॅज देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कल्याण रेल्वे स्थानकात स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू असल्याने कल्याणचा एसटी डेपो तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी एसटी आगारात हलविण्यात आला आहे. त्यामुळे सकाळपासूनच विठ्ठलवाडी एसटी आगारातून असंख्य वाहने ये जा करतात तसेच प्रवासी संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे विठ्ठलवाडी एसटी आगाराचे देखील व्यवस्थापन वाढले असून आता व्यवस्थापक पदी गीता कोंडार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याच हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्या समवेत सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक महेश भोये, वाहतूक निरीक्षक राजाराम जाधव व असंख्य एसटी कर्मचारी उपस्थित होते.
एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे म्हटले जाते. मात्र हाच प्रवास सुखाचा करण्यासाठी चालक व वाचकांचे सर्वात मोठे योगदान असते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विठ्ठलवाडी एसटी आगारातील पंकज भावसार व चालक नितीन चौधरी यांनी एसटी महामंडळात पाच वर्षे सुरक्षित सेवा दिल्याबद्दल त्यांचा विशेष बॅज देऊन सन्मान करण्यात आला. एसटी महामंडळात नोकरीला लागल्या पासून आम्ही आमची नोकरी इमानी इतभरे करीत आलो आहोत. एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी आहे याची पूर्ण जाण असल्याने आम्ही सर्व कर्मचारी प्राण ओतून काम करीत असतो अशा भावना यावेळी विठ्ठलवाडी एसटी आगाराचे कर्मचारी योगेंद्र कदम यांनी व्यक्त केल्या.
Vitthalwadi ST Depot : Celebrating Independence Day by awarding special badges to employees who provide safe services to passengers
