कल्याण-डोंबिवली घडामोडी

आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर पुन्हा कचरा टाकायला सुरुवात

गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद केले. मात्र दोन दिवस झालेल्या पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे  कल्याण मधील उंबर्डे आणि बारावे येथील कचरा प्रक्रिया केंद्र पाण्यात बुडाल्याने शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग लागले होते. अखेर आज आधारवाडी डम्पिंग ग्राउंड पुन्हा सुरु करण्याची नामुष्की केडीएमसी प्रशासनावर ओढवली आहे.

      आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी केडीएमसीच्या वतीने विविध ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र आणि कचरा वर्गीकरण केंद्र उभारली असून काल आलेल्या पुरामुळे हे कचरा प्रकल्प पाण्यात गेले आहेत.  बारावे आणि उंबर्डे येथील या प्रकल्पांमध्ये पाणी साचल्याने हे प्रकल्प नियमांचे उल्लंघन करून बांधले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

      बारावे व उंबर्डे या दोन डम्पिंग ग्राउंडवर प्रशासनाने कोणत्याही प्रक्रियेविना कचरा टाकायला सुरुवात केली ही बाबच बेकायदेशीर आहे. स्थानिक नागरिकांनी या गोष्टीस आक्षेप घेतला होता. कोणतेही डम्पिंग ग्राउंड नवीन सुरू करताना त्या साइटवर गेल्या शंभर वर्षात पुराचे पाणी आलेले नाही अशी साइटच फक्त बायोगॅस प्लांट किंवा डम्पिंग साठी घेता येते. उंबर्डे व बारावे या डम्पिंग वर पुराचे पाणी भरल्याने सद्यस्थितीत कचरा टाकता येत नाही. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे ही बाब बेकायदेशीर असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केला आहे.

 आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या वेळेस घाणेकर यांनी प्रशासनाला सविस्तर पत्र दिले होते. त्या पत्रामध्ये समग्र आकडेवारी सकट सर्व परिस्थिती प्रशासनाला विदीत केलेली होती. पुराचे पाणी या दोन्हीही डम्पिंग वर भरलेले असल्याने या ठिकाणी केलेले कचऱ्याचे संकलन हे पूर्णपणे बेकायदेशीर असून दीड महिना उलटून सुद्धा दिलेल्या पत्रावर प्रशासनाने काहीही कारवाई केलेली दिसत नसून प्रशासन फक्त नागरिकांची दिशाभूल करत असल्याची टीका माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे. दरम्यान उंबर्डे आणि बारावे या कचरा प्रकल्पांवरील पुराचे पाणी ओसरेपर्यंत आणि पुन्हा हे प्रकल्प कार्यन्वित होईपर्यंत आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यात येणार आहे. तर कचरा प्रकल्प बंद असल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून आले.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *