कल्याण पूर्वेतील विद्यार्थी सहाय्यता प्रतिष्ठानचे सिद्धार्थ विद्या मंदिर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त शाळा स्तरावर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे. त्यानिमीत्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन, तुळशी पूजन करून सोहळयाची सुरवात करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना शेवाळे व ज्योत्स्ना चाळसे यांनी दीपप्रज्वलन केले. विठूरायाची आरती गायन सर्व शिक्षकांनी केले. यावेळी हनुमंता पावडे यांनी एकादशीची सुरवात केव्हा व कशी झाली आणि उपवास का केला जातो, याविषयी माहिती दिली. तर अशोक काठे यांनी आपल्या मधुर वाणीने अभंग व गवळणीची गायन केले. शेवटी प्रासादिक अभंगांचे गायन करून प्रसाद वाटप करण्यात आले. त्यांना शर्मिला साळुंके आणि रामदास चौरे यांनी साथ दिली.
यावेळी विठूनामाच्या गजरात सर्व शिक्षकांनी फेरा धरला, फुगडी खेळली त्याचबरोबर पालखी नाचवली अशा पध्दतीने शाळेतच पंढरपूर अवतरल्याचा अनुभव सर्वांना घेतला. या पारंपरिक सोहळ्याचे सूत्रसंचालन शर्मिला साळुंके यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार चौधरी सर यांनी मानले.
-कुणाल म्हात्रे