कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी जास्त होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही कोरोनाने ग्रासले असल्याचे समोर आले आहे.
वर्षभरापासून कोरोनाने जगभरात थैमान घातलेला आहे. क.डों.म.पा. क्षेत्र देखील या आजाराने फोफावले होते. दररोजचा आकडा हा ५०० पर्यंत देखील गेला होता. मात्र हा आकडा जानेवारी पर्यंत निवळत येत दोन अंकी झाला होता. तर एकूण कोरोना रुग्ण हे तीन अंकी म्हणजे १००० च्या आत आले होते. मात्र आता या महापालिका क्षेत्रात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत २०० चा आकडा देखील पार झाला होता. २८ फेब्रुवारी रोजी १७८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर महापालिका क्षेत्रात आता सध्याच्या घडीला म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत १६४६ एक्टिव्ह कोरोनारूग्ण आहेत. हा चार अंकी आकडा पुन्हा तीन अंकी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणं जास्त गरजेचं असणार आहे.
कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना देखील मागील दोन-तीन दिवस त्रास जाणवत होता. यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. १ मार्च रोजी त्यांचा रिपोर्ट पोजिटिव्ह आला असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. याबाबत त्यांनी अधिक माहिती आपल्या फेसबुकद्वारे दिली आहे. माझी प्रकृती ठीक असून जे माझ्या संपर्कात आले त्यांनी विशेष काळजी घ्यावी तसेच लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करावी असे आवाहन त्यांनी आता केलं आहे.
