कल्याण :- डोंबिवली पूर्वेतील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील तीन ते चार माजी नगरसेवक हे शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचा दावा शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला आहे. हे नगरसेवक कोण आहेत ? व कोणत्या पक्षातील आहेत ? अशा चर्चा कल्याण पूर्वेतील राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
महेश पाटील, सुनीता पाटील आणि सायली विचारे या भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. तर कल्याण पूर्वेत देखील असे पक्षप्रवेश होउ शकतो असा दावा शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड हे करीत आहेत. याबाबत महेश गायकवाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच श्रीकांत शिंदे यांच्याशी देखील याबाबत चर्चा केली असल्याचे सांगितले गेले. मात्र त्या माजी नगरसेवकाचे सामाजिक,राजकीय कार्य आणि निवडून येण्याचं गणित समजल्या नंतरच त्यांना शिवसेनेत प्रवेश देणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितले.
क.डों.म.पा. मध्ये २०१५ च्या निवडणुकी नुसार कल्याण पुर्व भागात २५ प्रभाग होते. यातील १५ ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. तर ९ ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. तर १ जागा काँग्रेसने जिंकली होती. त्यामुळे या आकडेवारी नुसार महेश गायकवाड यांनी दावा केलेले संभावित नगरसेवक हे कोणत्या पक्षाचे असू शकतात याबाबत फारसा विचार करावा लागू शकत नाही.
कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक (२०१५-२०२०) :-
शिवसेना (१५)
१. मल्लेश शेट्टी (४२-लोकग्राम)
२. नवीन गवळी (४३-गावदेवी,नेतीवली,मेट्रो मॉल)
३. राजवंती मढवी (८७-शास्त्रीनगर तिसगांव)
४. महेश गायकवाड (८८-संतोष नगर)
५. सुशीला माळी (८९-मंगल राघो नगर)
६. संगीता गायकवाड (९०-चिकणीपाडा)
७. निलेश शिंदे (९१-जरीमरी नगर)
८. स्नेहल पिंगळे (९४-आनंदवाडी)
९. रमेश जाधव (९६-जाईबाई विद्या मंदिर/साई नगर)
१०. राजाराम पावशे (९७-शनी नगर)
११. शीतल मंढारी (९८-विजय नगर)
१२. माधुरी काळे (९९-आमराई)
१३. देवानंद गायकवाड (१००-तिसगाव गावठाण)
१४. सारिका जाधव (१०२-भगवान नगर)
१५. उर्मिला गोसावी (१०६-चिंचपाडा,नांदिवली तर्फ अंबरनाथ)
भारतीय जनता पार्टी (९)
१. रेखा चौधरी (४५-कचोरे)
२. सुनीता खंडागळे (८६-गोळीवली पिसवली)
३. सुमन निकम (९२-गणेशवाडी)
४. विशाल पावशे (९३-लक्ष्मीबाग)
५. विक्रम तरे (९५-नेहरू नगर)
६. हेमलता पावशे (१०१-हनुमान नगर)
७. मनोज राय (१०३-कैलास नगर)
८. मोनाली तरे (१०४-खडेगोळवली)
९. मोरेश्वर भोईर (१०७-पिसवली)
काँग्रेस (१)
१. जान्हवी पोटे (४१-कोळशेवाडी)
-संतोष दिवाडकर