कल्याण : जंगल शेती भागातून भक्ष्याच्या शोधात भलामोठा अजगर घरात घुसल्याची घटना समोर आली आहे. अजगर घरात घुसल्याचे पाहून त्या कुटूंबाची एकच पळापळ झाली होती. मात्र, सर्पमित्राच्या मदतीने त्या भल्यामोठ्या अजगराला शिताफीने पकडले. ही घटना कल्याण – मलंगगड रोडवरील द्वारली पाडा परिसरात असलेल्या एका घरात घडली आहे.
बाबासाहेब गोरे यांची कल्याण – मलंग रोडवरील द्वारली पाडा या ठिकाणी वीटभट्टी आहे. त्या लगतच त्यांचे घर आहे. त्यातच दुपारच्या सुमारास या घरामध्ये मोठा अजगर घुसल्याचे त्यांनी पहिले. त्यामुळे त्यांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोबे यांना अजगरविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी कल्याण पूर्वेत राहणारे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, सर्पमित्र मुरलीधर जाधव यांच्यासह मुंबई हायकोर्टमधील कुलदीप चिकनकर मानद पशु कल्याण अधिकारी, यांना माहिती दिली. माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गोरे यांच्या घरामध्ये आठ फूट लांबीचा अजगर घराच्या एका कोपऱयात आडोशाला दडून बसल्याचे त्यांना दिसला होता.
विशेष म्हणजे, हा भलामोठा अजगर भक्ष्य शोधण्यासाठी गेल्या पाच-सहा दिवसांपासून गोरे यांच्या घराच्या आसपास त्यांना दिसत होता. मात्र, घराच्या बाजूलाच असलेल्या वनसदृश क्षेत्रांमध्ये निघून जात होता. पोलीस कर्मचारी, सर्पमित्र जाधव व चिकनकर यांनी त्या अजगराला सुरक्षित पकडून पुढील कार्यवाहीसाठी कल्याण वन विभाग यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले असून, या भल्यामोठ्या अजगराला वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थित निर्सगाच्या सानिध्यात सोडून देत जीवदान दिले.
-कुणाल म्हात्रे