एकीकडे ठाण्याला फेरीवाल्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतांनाच कल्याण मध्ये महापालिकेच्या कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाने एका जेष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि जखमी झालेल्या नागरिकांनी केला आहे.
कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील बाबाजी चाळ ही धोकादायक झाल्याने ती तोडण्याची कारवाई गुरुवारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारवाई पथकाने सुरु केली. यावेळी कारवाईस विरोध केल्या प्रकरणी पथकाने एका ७३ वर्षीय राणा देवराज प्रजापती या चाळकर्याचे डोके फोडून त्याला रक्तबंबाळ केले असून केडीएमसी प्रशासन बिल्डरच्या दावणीला बांधल्याचा आरोप जखमी झालेल्या नागरीकाने केला आहे. संतप्त झालेल्या चाळकार्यांनी कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. प्रवेशद्वाराजवळ आयुक्तांच्या भेटीची मागणी करीत बराच वेळ गोंधळ घातला. दरम्यान कारवाई पथकाने संबंधित नागरीकाला जखमी केले नसून त्याने स्वत: डोके फोडून घेतल्याचा खुलासा प्रभाग अधिका:याने केला आहे.

काळा तलाव परिसरात असलेल्या बाबाजी चाळ याठिकाणी पागडी पद्धतीने अनेक नागरिक रहात आहेत. या जागेच्या मूळ मालकाने हि जागा विकासकाला विकसित करण्यासाठी दिली आहे. विकासकाने याठिकाणी हि जागा विकसित करण्याच्या दृष्टीने पाउले उचलली असून जागेभवती पत्र्यांचे कुंपण करण्यास सुरवात केली आहे. बहुतांश जागा विकासकाने रिकामी केली असून येथील बाबाजी चाळीतील नागरिकांनी अद्यापही आपली घरे रिकामी केलेली नाहीत. आपल्या घरांच्या जागेपेक्षा कमी जागा विकासक देत असल्याचा आरोप करत हे नागरिक हि जागा सोडण्यास तयार नाहीत. यामुळे जागा मालक आणि विकासकाने पालिका प्रशासनाला हाताशी घेऊन हि चाळ धोकादायक घोषित करून चाळीवर कारवाई सुरु केल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. धोकादायक चाळ असल्याची नोटीस देखील मिळाली नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, प्रजापती यांचा आरोप चुकीचा आहे. त्यांना कारवाई पथकाने मारहाण केली नसून त्यांनी स्वत: स्वत:ला जखमी करुन घेतले आहे. त्याचा व्हीडीओ आमच्याकडे आहे. ही चाळ धोकादायक झाली आहे. या चाळीचे स्ट्रक्चरल ऑडीट व्हीजेटीआयकडून करुन घेतल्यानंतर नोटिसा देऊन कारवाई केली जात आहे. ठाणे शहरात फेरीवाला पथकाच्या अधिकार्यावर कारवाई दरम्यान हल्ला केल्याची घटना ताजी असताना आत्ता कारवाई दरम्यान नागरीकांकडून पथकाने हल्ला केल्याचा खोटा आरोप केला जात आहे. यावरुन अधिकार्याचे मनोबल खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न होत आहे.
-कुणाल म्हात्रे
