कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सिटी पार्कमध्ये १४०० झाडांच्या लागवडीला सुरवात करण्यात आली असून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांनी किमान एका वृक्षाची लागवड करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. आजच्या जागतिक पर्यावरण दिनी, सिटी पार्क परिसरात स्व:हस्ते वृक्षारोपण करतांना त्यांनी हे आवाहन केले.
महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी तसेच नागरिकांनी आजच्या दिवशी शक्य असेल तिथे किमान एका वृक्षाची लागवड करावी, महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आजपासून स्वत:पासूनच घरातला ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सुरुवात करावी, जेणेकरून हा चांगला संदेश महापालिकेच्यावतीने सर्व नागरिकांना जाईल, असेही ते पुढे म्हणाले. नागरिकांनीदेखील आपला ओला व सुका कचरा वेगळा करावा म्हणजेच पर्यावरण दिनाचे सार्थक होईल, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले.
सिटी पार्क परिसरात विविध प्रकारची सुमारे १४०० झाडे लावली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बारावे येथील एकात्मिक घनकचरा प्रकल्प येथेही वृक्षारोपण केले आणि सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरणही केले. वाडेघर येथील एस.टी.पी. प्लॅन्ट येथेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी घकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, उपअभियंता भालचंद्र नेमाडे, प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, सुधिर मोकल, राजेश सावंत, दिपक शिंदे व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
-कुणाल म्हात्रे