घडामोडी

चहा प्यायला गाडीतून उतरले आणि गाडीवर दरड कोसळली ; माळशेज घाटातील थक्क करणारी दुर्घटना

माळशेज घाट म्हणजे पर्यटकांना पावसाळ्यात पर्वणीच. मात्र निसर्ससौंदर्य असलेला हा घाट दरड कोसळण्याच्या घटनांसाठी जास्त ओळखला जातो. आज सायंकाळी चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका चार चाकी वाहनावर दरड कोसळली. सुदैवाने आत कुणी नसल्याने जीवितहानी टळली पण कारचे मात्र नुकसान झाले.

आज शुक्रवार दि.११ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास एक कार अहमदनगरहुन कल्याणच्या दिशेने जात होती. घाट क्षेत्रात देखील आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागात दाट धुके पसरले होते. बोगद्याच्या अलीकडे कारमधील प्रवासी मित्रांना चहा पिण्याची तलप आली आणि त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. दोघेही चहाच्या हॉटेलजवळ पोहोचताच त्यांच्या गाडीवर दरड कोसळली. काही सेकंद मागे पुढे झाले असते तर दोघांच्या जीवावर बेतले असते. आणि जर चहासाठी थांबले नसते तर कार देखील बचावली असती असे म्हणे वावगे ठरणार नाही. चहामुळे कार गेली असे म्हणण्यापेक्षा चहामुळे जीव बचावला असे म्हणून मनाचे समाधान मानावे लागेल. ‘मुरबाड लाईव्ह महाराष्ट्र न्यूज’ने दिलेल्या माहिती नुसार ही कार अहमदनगर येथील रत्नाकर माचवे यांच्या मालकीची होती. दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचून महामार्ग व टोकावडे पोलिसांनी मदतकार्य करीत रस्ता तत्काळ खुला केला.

माळशेज घाटात दरवर्षी पावसाळ्यात अश्या घटना होत असतात. धुक्यामुळे होणारे अपघात आणि दरडीच्या दुर्घटनेमुळे आतापर्यंत अनेक लोकांचा जीव गेला आहे. अनेक वर्षांपूर्वी लाल परी म्हणजेच एसटी देखील माळशेज घाटाच्या खोल दरीत सामावली होती. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची कहाणी येथील काही व्यावसायिक सांगतात. त्यामुळे अश्या ठिकाणी पर्यटन करावं पण जीव मुठीत धरून असं म्हणायला हरकत नाही.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *