नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी सिडको येथे आज भूमिपुत्रांकडून आंदोलन केले गेले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते एकवटले होते. यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले.
बहुजनांचे नेते म्हणून दि.बा.पाटील यांनी लढा दिला होता. भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी ते झटले होते. त्यामुळे त्यांचेच नाव विमानतळाला देण्यात यावे याकरिता भूमिपुत्रांनी एल्गार पुकारला आहे. या मोर्चात सर्वपक्षीय आमदार उपस्थित राहिले होते. कल्याण पुर्वेचे गणपत गायकवाड हे देखील आपल्या समाजासाठी पुढे आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
नवी मुंबईच्या विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव असेल. उद्धव साहेबांनी त्याच्या आड येऊ नये. स्थानिक भूमिपुत्रांमध्ये आगरी,कोळी,कुणबी आणि आणखी काही समाज तसेच धर्मातील लोकही समाविष्ट आहेत. त्यामुळे ही सर्वांची एकजुटीने केलेली मागणी आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्रच आहेत. जर हे सर्व भूमिपुत्र तुमच्या विरोधात गेले तर ठाणे आणि रायगडमध्ये शिवसेनेचं नाव देखील राहणार नाही. अशी घणाघाती टीका आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी केली. दि.बा.पाटील यांच्या नावासाठी कल्याण पूर्वचे आमदार आधीपासूनच आग्रही असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याबाबत विनंती देखील केली आहे.
-संतोष दिवाडकर