रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुन्हा एकदा उजेडात आली आहे. शिरूर तालुक्यातील एका विकृत मुलान आपल्या जन्मदात्या वयोवृध्द आई वडिलांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत उपचारादरम्यान त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर जखमी वडिलांवर उपचार सुरू आहेत.
एकीकडे संपूर्ण जग फादर डे साजरा करीत होत तर शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे मात्र एक विकृत आपल्या जन्मदात्या आई बापावर काठीने हल्ला करीत होता. बाबासाहेब खेडकर असं या विकृत मुलाचं नाव आहे. ज्या आई बापाने या बाबसाहेबाला वाढवलं, मोठं केलं त्याच आई बापांना हा मुलगा इतक्या क्रूरतेने मारताना या व्हडीओ मध्ये दिसतोय.
७० वर्षीय शहाबाई खेडकर आणि ७५ वर्षीय त्रिंबक खेडकर जिवाच्या आकांताने घाव सोसत विव्हळत होते. “धावा धावा पांडुरंगा” अशी आर्त साद त्याचे वडील घालत होते. मदतीसाठी ते दुरून पाहणाऱ्या जमावाला हाक मारत होते. जवळपास गावकरी शेजारीपाजारी जमले होते. मात्र कोणीही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हता. त्यातीलच एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये हे दृश्य कैद केले. जर कुणी पुढे गेला असता आणि सैतानी वृत्तीच्या त्या निर्दयी मुलाला थांबवलं असत तर त्याला जन्म देणाऱ्या माऊलीचा जीव नक्कीच वाचला असता. मात्र जो पर्यंत गावकऱ्यांनी मध्यस्थी केली तोपर्यंत उशीर झाला होता. मारहाण झालेल्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान दुर्दैवाने त्या माउलीला मृत घोषित करण्यात आले. तर पित्यावर अद्याप उपचार सूरु आहेत.
बीड रिपोर्टर डॉट कॉम ने दिलेल्या माहितीनुसार या घटने विरोधात पोलीस ठाण्यात भा द वि कलम 302 307 आणि 323 अनव्ये गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. शिवाय आरोपीला देखील जेरबंद करन्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणारा मुलगा हा मानसिक रुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या जाचाला कंटाळून पत्नी देखील माहेरी निघून गेली असल्याची माहिती मिळाली आहे. या विकृतीचे आई वडील देखील आपल्या लेकीकडे राहतात. मात्र आपल्या लेकाला कोरोना झाल्याचे समजल्याने जीवाची पर्वा न करता दोघेही आपल्या मुलाला भेटायला घरी परतले होते. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या गुम्ह्णाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरोक्षक रामचंद्र पवार हे करीत आहेत
आई वडील जन्म देतात, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांना वाढवतात आणि काही विकृत मुलं त्याचे असे पांग फेडताना दिसतात. जन्मदात्या माता पित्यांना मारहाण करण्यासाठी यांचे मन आणि हात कसे धजावतात हे समजायला कठीणच. पण गुन्हा घडला आहे आणि आता अशा विकृतांना धडा शिकवला जाणं ही काळाची गरज बनू लागली आहे.
-संतोष दिवाडकर