कल्याण-डोंबिवली घडामोडी

स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचा भडका; डोंबिवलीत एक कामगार होरपळला

डोंबिवली :- शहराच्या पूर्व भागात असणाऱ्या पाथर्ली स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचा अचानक भडका होऊन त्यामध्ये एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. गोपाळ अडसुळ वय ५१ वर्षे असे यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अत्याधुनिक पणे शव जाळणे ही आता जिकरीचे बनले आहे असे या घटने वरून वाटू लागले आहे.

शनिवारी २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास डोंबिवलीच्या पाथर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शव (मृतदेह) आणण्यात आले होते. त्याच्यावर गॅस शवदाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जाणार होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या गॅसशवदहिनीचे बटन आणि लायटर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने तेथील कर्मचारी कापडाचा पेटता बोळा आतमध्ये टाकून शवदाहीनी चालू करत होते. जे की केवळ त्यांच्याच नव्हे तर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या व्यक्तींसाठीही अत्यंत धोकादायक बाब होती. मात्र हा धोका पत्करून गोपाळ अडसूळ यांनी स्मशानभूमीत दाखल शवावर अंत्यसंस्कारासाठी कापडाचा पेटता बोळा आत टाकला आणि त्याक्षणी गॅसचा मोठा भडका उडून त्यामध्ये अडसूळ गंभीररित्या भाजले.


दरम्यान या धक्कादायक प्रकारानंतर स्मशानभूमीतील इतर कर्मचारी आणि काही नागरिकांनी अडसूळ यांना केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण तिथल्या उपस्थित स्टाफकडून देण्यात आल्याने त्यांना कळवा रुग्णालयात नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र ह्या कर्मचाऱ्याची खरी होरपळ ही रुग्णालयात झाली. या रुग्णालयात अडसूळ यांना उपचारासाठी नेले असता त्याठिकाणी उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. दुसऱ्या रुग्णाला देण्यासाठी साधे रुग्णवाहिका देखील रुग्णालयात उपलब्ध नसल्याचा आरोप वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे या घटनेतुन समोर आले आहे.

या धक्कादायक घटनेनंतर स्मशानभूमीतील गॅस शवदाहिन्या आणि त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे १० दिवसांपासून या गॅस शवदाहिनीत तांत्रिक बिघाड असूनही तो दुरुस्त का केला गेला नाही? याबाबत केडीएमसीच्या संबंधित विभागाला माहिती देण्यात आली होती का? माहिती देण्यात आली असेल तर मग हा तांत्रिक बिघाड दुरुस्त का केला गेला नाही? यांसारखे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी या गंभीर विषयात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा अशा प्रकरणात स्मशानभूमीत अनेक नागरिकांचा राबता असतो. काही मोठी भीषण दुर्घटना झाली असती तर मनुष्यहानी ही झाली असती यात कुठलेही दुमत नाही.

-रोशन उबाळे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *