गेल्या दहा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने बळीराजा मात्र खूप सुखावला आहे. यामुळे भातशेती लावणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात भातलावणीच्या म्हणजे आवणीच्या कामाला जोरात सुरुवात झाली आहे.
कल्याण तालुक्यातील मुख्य पीक म्हणजे भाताचे होय. परंतु पेरणी नंतर दहा दिवस पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. पावसाने घेतलेल्या उघडीपिमुळे शेतकरी राजा कमालीचा हवालदिल झाला होता. मात्र दोन दिवसांपासून काही प्रमाणात पडत असणारा पाऊस हा शेतीच्या लागवडीसाठी पूरक असल्यामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. यामुळे शेतीची भात लागवडीचे काम करण्यासाठी शेतकरी राजा शेतात उतरला आहे.
जागोजागी भातलागवडीची कामे करत असणारा शेतकरी वर्ग दिसून येत आहे. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. परंतु अजून जास्त पावसाची गरज असून जोराचा पाऊस शेतीला मिळाला तर भाताचे पीक चांगले येत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.
-कुणाल म्हात्रे