आज दि.२४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास खडेगोळवली कल्याण पूर्व येथून एक चार वर्षांचा मुलगा हरवला होता. पोलिसांना खबर दिल्या नंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या मुलाचा शोध लावला आणि त्याला पालकांच्या हवाली केले.
वेदांत अनिल सिंग हा ३ वर्षे ११ महिन्यांचा मुलगा सायंकाळी पाऊने सहाच्या दरम्यान खडेगोळवली परिसरातून बेपत्ता झाला. त्याच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला, विचारपूस केली मात्र तो कुठेही सापडला नाही. वेदांतला कुणी तरी पळवून नेले असावे असा संशय त्यांना बळावला आणि भेदरलेल्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे, क्राईम पोलीस सर्जेराव कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे आणि सर्व टीमने आपले संपर्क वापरून नागरिकांना याबाबत अवगत केले आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली. आणि काही तासानंतर शोध घेताना हा हरवलेला बालक सापडला. त्यानंतर या बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी कमी वेळात घेतलेल्या या शोधाचे निश्चितच कौतुक होणे साहजिक आहे.
-संतोष दिवाडकर