कल्याण :- तरुणी सोबत अश्लील चॅटिंग आणि व्हडिओ कॉल करणाऱ्या एका युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित युवकाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
उल्हासनगर मध्ये राहणारा गुरूदीपसिंग चतुरसिंग खालसा हा तरुण फेशन शॉ साठी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करून त्यांचे व्हिडीओ समाज माध्यमांवर अपलोड करतो. एका जाहिरातीत काम करण्यास नकार दिल्याने एका तरुणीला त्याने निशाणा बनवले. आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल नंबरचा वापर करून त्याने या तरुणीशी संपर्क केला. पुढे अश्लील चॅट करून अश्लील व्हिडीओ कॉल केला. यामुळे संबंधित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
दाखल तक्रारी नुसार पोलिसांनी काहीही माहिती नसल्याने तांत्रिक आणि विविध बाबींच्या आधारे तपास केला. यात आरोपीने कश्या पद्धतीने हा प्रकार केला हे उघड झाले. यात विविध कंपन्यांचे आयपी एड्रेस वापरला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आरोपीस ताब्यात घेतले असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-संतोष दिवाडकर