कल्याण :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कल्याणमध्ये व्यक्त केली जात नसली तरी कल्याणच्या एसटी डेपोत दररोज अहमदनगरहून जवळपास ८० बसेस येतात. या बसमधून कल्याणमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालिकेने विविध अँटिजेंन टेस्ट आणि इतर सेवा पुरवली पाहिजे अन्यथा कोरोना रुग्णाचा आकडा या माध्यमातून वाढू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने शिरकाव केला आहे. या जिल्ह्यातील ६९ गावे लॉकडाऊन करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील ४० टक्के कोरोना रुग्ण पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेतात अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच पुण्यात दिली. कल्याण हे देखील वाहतूकीच्या दृष्टीने जंक्शन आहे. कल्याण अहमदनगर या मार्गावर रेल्वे मार्ग नाही. अहमदनगरहून शेतकरी शेतमालाची वाहतूक याच मार्गे करतात. तसेच सामान्य प्रवाशाला खाजगी बस आणि वाहनाने प्रवास परवडत नाही. त्यामुळे हा प्रवासी एसटीला पसंत देतो.
कल्याण अहमदनगर हा एसटीच्या उत्पन्नाचा मार्ग आहे. या मार्गावर ८० एसटी बसेस चालविल्या जातात. या मार्गे अहमदनगरहून कल्याणमध्ये कोरोनाची तिसरी लाट दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर हा मार्ग कोरोना मार्ग होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान अहमदनगर वरून येणाऱ्या प्रवाशांची एसटी महामंडळाने चाचणी करणं बंधनकारक केले पाहिजे. अन्यथा पुन्हा कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना थैमान घालेल अशी भीती रुपेश भोईर (मनसे शहर संघटक कल्याण) यांनी निवेदन देऊन वर्तवली आहे या गंभीर मुद्द्या कडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
-रोशन उबाळे