कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा वाढता कहर शहरवासीय आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागला आहे. कालच्याच दिवशी दि. २३ मार्च २०२० रोजी कोरोनाने शहरातील आतापर्यंतचा हाय स्कोर आकडा दिला होता. ७११ रुग्ण काल नोंदवले गेले होते. परंतु आज पुन्हा कोरोनाने तो आकडा मोडून लांब उडी घेतल्याने प्रशासनाला हादरून सोडले आहे.
क.डों.म.पा. क्षेत्रात आज दिवसभरात कल्पनेपेक्षाही अधिक तब्बल ८८१ रुग्ण आढळून आले आहेत. काल प्रथमच ७०० चा आकडा पार करीत हाय स्कोर रचला होता. मात्र हा रेकॉर्ड मोडीत काढीत कोरोना जवळ जवळ ८०० चा आकडा पार करीत सरळपणे ९०० ला येऊन खेटला आहे. आजच्या या आकड्यामुळे प्रशासन देखील हादरले आहे. महापालिका क्षेत्रात निर्बंध लागू असतानाही वाढलेला प्रकोप हा चर्चेचा विषय बनला आहे.
आज आलेल्या आकड्या नंतर महापालिका क्षेत्रात आता एकूण ५९२९ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. आजच्या दिवसात दोघांनी जीव गमावला असून ४०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सापडलेल्या ८८१ रुग्णांपैकी सर्वाधिक २७१ रुग्ण कल्याण पश्चिमेतील आहेत. यानंतर २६३ रुग्ण डोंबिवली पूर्व, १४९ रुग्ण कल्याण पूर्व, १४४ डोंबिवली पश्चिम, ३८ मांडा टिटवाळा, १५ मोहना तर १ रुग्ण पिसवली येथील आहे. आजचा आकडा हा महापालिका क्षेत्रातील सर्वोच्च आकडा बनला आहे. यामुळे प्रशासन आता काय करतंय याचीच भीती येथील व्यापारी आणि नागरिकांना लागून आहे.
शहरात वाढलेल्या आकड्यांवरून मनसेनं मात्र आता थेट सवाल केला आहे.
“गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने शहरात वेकसिनेशन सेंटर वाढवावीत. बंद केलेली कोरोना हॉस्पिटले पुन्हा सुरू करावीत. अख्या देशात कोरोना फक्त महाराष्ट्रातच आहे का ? कोलकत्ता मध्ये विविध पक्षांच्या लाखोंच्या सभा होतात. हजारोंचे मोर्चे आसाम,पश्चिम बंगाल, केरळ मध्ये निघतात. तिकडे कोरोना नाही का ? ताप हा फक्त कोरोनाचाच असतो का ? डेंगू, मलेरिया हे प्रकार गेले कुठे ? लोकांना घाबरवायचे धंदे बंद करा. लोकांना जगू द्या लोक आधीच वर्षभर पिचलेले आहेत. आणि जगाला वॅक्सिन पुरवण्या आधी देशातील नागरिकांना वाटा.”
मनोज घरत (मनसे शहराध्यक्ष, डोंबिवली)