उल्हासनगर मध्ये आयपीएल सामन्यावर बेटिंग केल्याप्रकरणी तीन बुकींना अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आणि उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. २ ऑक्टोबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदरच्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील थारासिंग दरबार शेजारी असलेल्या ‘माँ बजाज व्हिला’ या बंगल्यात ठाणे पोलिसांच्या सेंट्रल युनिटने शनिवारी संध्याकाळी धाड टाकली. यावेळी या बंगल्यात ‘आयपीएल’च्या सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुध्द दिल्ली कॅपिटल्स या खेळल्या जाणा-या क्रिकेट सामन्यावर बेटिंग नावाचा जुगार खेळला जात असताना तीन बुकींना पोलिसांनी अटक केली. धर्मेंद्र बजाज, राहुल बजाज आणि चिरंजीव अनिल आहुजा असे या ताब्यात घेतलेल्या बुकींची नावे आहेत.

पोलिसांना घटनास्थळी लॅपटॉप, मोबाईल फोन, ट्रान्समिशन मशिन, इंटरनेट राउटर आदी साहित्याचा वापर करून मोबाईलवर लाईव्ह चालू असलेल्या लाईव्ह क्रिकेट मॅचवर खेळणा-या आणि खेळविणा-या इसमांशी संपर्क साधून हवाला व्दारे व गुगल पे व्दारे क्रिकेट बेटिंग घेवून लॅपटॉप वर जे.एम. डी. खेल खेल खेल या नावाच्या लेजर सॉफ्टवेअर नोंद केली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
पोलिसांनी बुकींकडून एकूण २५ लाख रुपये रोख, एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले. हि कारवाई दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजेपर्यंत सदरच्या बंगल्यात सुरू होती. या प्रकरणी उल्हासनगर च्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फसवणूक कायदा, आय टी ऍक्ट आणि जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-संतोष दिवाडकर