सातत्याने इंधनाच्या किमतींमध्ये वाढ होत असून यामुळे सर्वसामन्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. दररोज वाढणाऱ्या इंधनांच्या किमतीमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यासाठीच कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेत्तृत्वाखाली इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी सहजानंद चौक येथे केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदारांना निवेदन देत नागरिकांच्या वतीने रोष व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून संपूर्ण देशभरात इंधन, घरगुती गॅस सिलेंडर, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे तेल तसेच सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव झपाट्याने वाढत आहेत. सातत्याने इंधन दरवाढ होत असून सर्व सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. सरकारने इंधन दरवाढ कमी करून देशातील सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
देशातील नागरिकांवर कोरोना महामारीचे संकट आले आहे. त्यामध्ये बहुतांश लोकांनी स्वतःचे रोजगार, नोकऱ्या गमावल्या आहेत. बहुतांश कुटुंबाचे प्रमुख मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे आणि त्यातच केंद्रातील मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे सतत दरवाढ करून सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे इंधन दरवाढ थांबवून त्यांच्या किमती कमी कराव्यात अन्यथा उपासमारीला कंटाळून आपल्या देशातील गरीब आणि सामान्य नागरिक आत्महत्या करतील आणि त्यासाठी पूर्णपणे केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार असेल असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचीटणीस संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाने कल्याण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कांचन कुलकर्णी, सेवादल अध्यक्ष लालचंद्र तिवारी, काँग्रेसचे जेष्ठ नेते रवी पाटील, माजी गटनेते नंदू म्हात्रे, शारदा पाटील, वैशाली वाघ,लता जाधव,प्रवीण साळवे,विमल ठक्कर,मुन्ना,तिवारी,जपजित माटा, शकील खान आदी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-शरद शिंदे