कल्याण-डोंबिवली घडामोडी

उंबर्डे घनकचरा प्रकल्प बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा भाजपाचा इशारा

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र त्वरित बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत भाजपा जिल्हा सरचिटणीस चिंतामण लोखंडे यांनी केडीएमसीचे उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापक  रामदास कोकरे यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

      आधारवाडी डम्पिंग ग्राउंड महापालिकेने बंद केल्यानंतर याठिकाणी टाकण्यात येणारा कचरा हा उंबर्डे येथील घनकचरा प्रकिया केंद्रावर टाकण्यात येत होता. याठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त कचरा टाकण्यात येत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि माशांचे प्रमाण वाढले होते. या त्रासाला कंटाळून येथील ग्रामस्थांनी चिंतामण लोखंडे यांच्या नेत्तृत्वाखाली या घनकचरा प्रकल्पाबाहेर कचरागाड्या रोखून धरत आंदोलन केले होते.

उंबर्डे येथील ‘ब’ आणि ‘क’ प्रभाग क्षेत्र वगळता इतर अनेक ठिकाणाचा कचरा येत असून तो त्वरित बंद करावा. येथे खूप मोठया प्रमाणात कचरा डम्प करत असून रोगराईची समस्या निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या उंबर्डे गाव येथे मोठया प्रमाणाने दुर्गधीची मोठी समस्या झाली असून याकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे. त्यामुळे मोठया प्रमाणात आरोग्याला धोका निर्माण झाला असून सदर परिसरातील लहान मुले तसेच वरिष्ठ लोकांना व नागरिकांना कचऱ्याचा दुर्गधीचा, मच्छरांचा व माशांचा मोठया प्रमाणात त्रास होत आहे.

कल्याणात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून उंबर्डे गावच्या लोकांना अशा त्रासाला सामोरे जावे लागत असून लोक मोठया प्रमाणात आजारी पडत आहेत. याबाबत भाजपा जिल्हा सरचिटणीस चिंतामण लोखंडे यांच्या शिष्टमंडळाने घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेत हा घनकचरा प्रकल्प त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. येत्या चार दिवसात याची अमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी अनिल भंडारी, नरेश पाटील,  नवनाथ म्हात्रे, अनिल म्हात्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता, उंबर्डे घनकचरा प्रकल्पाची क्षमता ३५० मेट्रिक टन असून या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी केले आहे. सध्या याठिकाणी २५० मेट्रिक टनच्या आसपास कचरा टाकला जात आहे. डोंबिवली आणि टिटवाळा येथील कचरा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात या प्रकल्पावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आणखी कमी होणार असल्याची प्रतिक्रिया कोकरे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *