कल्याण-डोंबिवली घडामोडी

उल्हास नदीवरील जलपर्णीचं साम्राज्य झालं कमकुवत ; लवकरच नष्ट होणार जलपर्णी ?

गेल्या काही दिवसांपासून उल्हास नदीच्या वरप, कांबा, आपटी या भागांतील जलपर्णी सैल होऊ लागल्याचे दिसून आले आहे. जलपर्णीवर प्रक्रिया केल्याने जलपर्णीचा विळखा सैल झाला असून ती आता पिवळी पडू लागली आहे. येत्या काही दिवसांत ही जलपर्णी नष्ट होण्यास सुरुवात होईल असे या प्रकल्पाचे प्रमुख चंद्रशेखर भडसावळे यांनी स्पष्ट केले आहे.

काही आठवडय़ांपूर्वी उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी नदीपात्रात मोठे आंदोलन झाल्यानंतर त्याची दखल घेत जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जलपर्णी काढण्यासाठी सगुणा रुरल फाऊंडेशनची मदत घेत कामाला सुरुवात केली होती. उल्हास नदीत मिसळणाऱ्या नागरी आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होत असून त्यामुळे नदीपात्रात जलपर्णी तयार होत असल्याचे समोर आले होते. ‘मी कल्याणकर’ सामाजिक संस्थेचे नितीन निकम , कैलास शिंदे, उमेश बोरगावकर यांनी नदीपात्रात या जलपर्णी काढण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्याची दखल घेत जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि उल्हासनगर महापालिका आयुक्तांसह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट दिली होती. त्यानंतर सगुण रुरल फाऊंडेशनच्या मदतीने या जलपर्णीवर जैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उल्हास नदी जलपर्णीमुक्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. याच्या पहिल्या टप्प्यात उल्हास नदीच्या रायते येथील पात्रात विविध प्रकारचे मासे सोडण्यात आले होते. त्यानंतर या जलपर्णीवर प्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यात मोहने बंधारा, वरप, कांबा, आपटी येथील बारवी आणि उल्हास नदीचा संगम आणि बदलापूर या भागांत जलपर्णीवर प्रक्रिया करण्यात आली.

मे महिन्याच्या मध्यावधीत ही प्रक्रिया केल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीलाच वरप, कांबा या भागांतील जलपर्णी सैल होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. जलपर्णीचे घट्ट आच्छादन हळूहळू वेगळे होत असून जलपर्णीचा रंग बदलून पिवळा होऊ लागल्याचे उल्हास नदी बचाव कृती समितीचे अश्विन भोईर यांनी सांगितले आहे. यापूर्वी जलपर्णीचा रंग गडद हिरवा होता. तो आता बदलू लागला असून ही जलपर्णी नष्ट होण्याची प्रक्रिया असल्याचेही भोईर यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात जलपर्णी संपण्यास सुरुवात होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

उल्हास नदीच्या जलपर्णीवर मे महिन्यात प्रक्रिया करण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी चंदेरी आणि गवत्या प्रजातीचे मासे नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्यांच्या मदतीने पाण्यातील शेवाळ आणि जलपर्णीला खाद्य देणाऱ्या वनस्पती संपवण्याचा प्रयत्न सुरू होता. जलपर्णीवर प्रक्रिया केल्याने वरूनही जलपर्णी संपवण्याचा प्रयोग केला. येत्या १५ दिवसांत ही जलपर्णी सैल होऊन नष्ट होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
चंद्रशेखर भडसावळे, सगुणा रुरल फाऊंडेशन यांनी आश्वस्त केले आहे. राज्यात पहिल्यांदाच नदीतल्या वाहत्या पाण्यातील जलपर्णी हटवण्यासाठी प्रकल्प हाती घेतला होता. ह्या मोहिमे साठी सीएसआर योजनेतुन निधी उपलब्ध करुन दिला आहे. जैविक प्रक्रियेतून त्याचे बहुतांशी काम झाले आहे. करोनाच्या संकटात काही अडथळे आले होते. मात्र आता जलपर्णीबाबत झालेले काम दिसू लागले आहे. या कामाची नोंद नियमितपणे घेतली जाते आहे. असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे म्हणणे आहे.

-शरद शिंदे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *