कल्याण-डोंबिवली घडामोडी

एम.आय.डी.सी परिसरातील रस्त्यांना येणार अच्छे दिन ; खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश

कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली येथील निवासी व औद्योगिक विभागातील भागातील रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. महापालिका, ग्रामपंचायत आणि एमआयडीसी यांच्या हद्दीच्या वादात या रस्त्यांची दुरुस्ती व काँक्रिटीकरणाचे काम रखडले होते. अखेरीस खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे एमआयडीसी आणि महापालिका यांनी या रस्त्यांच्या कामासाठी प्रत्येकी ५०% टक्के खर्च करणार असून हा पेच सुटला आहे. आता निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामांनालवकरच सुरुवात होईल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या परीसरातील, तसेच निवासी क्षेत्रातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली ५ वर्षे सदर रस्ते व्हावेत म्हणून सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न चालू होते. त्यानुसार दि. २५ जानेवारी २०२० रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्या दालनात कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता सपना कोळी यांच्या नियोजित बैठकीमध्ये औद्योगिक वसाहत टप्पा क्र. १ व २ या विभागातील रस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करणार असून उर्वरित निवासी वसाहतीमधील रस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घ्यावे असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.

महापालिका व एमआयडीसी या दोन्ही प्राधिकरणांनी या रस्त्यांसाठी खर्च करावा, अशी भूमिका घेत खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच, त्यानुसार त्यानुसार सदर रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन सुमारे ११० कोटी रुपयांच्या प्रस्तावास एमआयडीसीने मंजुरी दिली.

महापालिकेने ४० टक्के रस्त्यांसाठी निविदा काढल्यानंतर महामंडळही उर्वरित ६० टक्के रस्त्यांची कामे हाती घेणार होते. त्यानुसार, ५५.१५ कोटी रुपये एमआयडीसीकडे वर्ग करण्यासाठीच्या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. परंतु, महापालिकेची आर्थिक अवस्था लक्षात घेऊन नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यास यश येऊन श्री. शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून विस्तारित नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ५७.३७ कोटी रुपये अर्थसहाय्य अनुदान स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.

सदर रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. याबद्दल महापालिका व खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि एमएमआरडीए व सर्व संबधित प्रशासनाचे आभार मानले आहेत.

– कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *