मुंबई :- एसटी कामगारांनी मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रभर संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी एसटी कामगार शासनाकडे आग्रही आहेत. मात्र ऐन दिवाळीत त्यांच्या या संपाचा पुरेपूर फायदा खाजगी ट्रॅव्हल्सवाले करून घेताना दिसत आहेत.
एसटीत काम करणारे कामगार हे अत्यंत कवडीमोल पगारात केवळ सरकारी नोकरी म्हणून काही वर्षे राबत आहेत. वाहनचालक आणि वाहक यांना मिळणारा मासिक पगार अगदी नगण्य आहे. कुटुंबापासून लांब राहूनही कुटुंबाची जबाबदारी निभावू न शकल्याने कंटाळून अनेक कामगारांनी आत्महत्या केल्या. कामगारांचे शासनात विलीनीकरण करा ही एक मोठी मागणी हे कामगार आता करीत आहेत. या काही मागण्यांसह एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
एसटी कामगारांच्या या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. पर्यायाने खाजगी वाहनांचा अवलंब करून प्रवासी प्रवास करीत आहेत. मात्र यात काही खाजगी ट्रॅव्हल्सने आपले भाडे वाढवले आहे. त्यामुळे एसटीचा संप मागे येई पर्यंत लुटता येईल तितका लुटण्याचा मानस यांचा आहे का ? असा सवाल सामान्य प्रवासी विचारत आहेत. यात प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसत आहे. आता राज्यसरकार एसटी कामगारांचा विचार करणार की नेहमीप्रमाणे अश्वसनांचा भडीमार करणार हे आता पहावे लागणार आहे.
-संतोष दिवाडकर