कल्याण येथील आधारवाडी कारागृह नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा हे कारागृह एका वेगळ्या प्रकारामुळे चर्चेत आले आहे. कारण येथील स्वच्छतागृहातून पोलिसांनी एका मोबाईल फोनसह विद्युत वायर, स्टील पिन आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे पोलीस डि.सी.आर. (दैनंदिन गुन्ह्यांची नोंद वही) मध्ये गुन्ह्याची नोंद असल्याने ही गंभीर बाब उजेडात आली आहे.
आधारवाडी कारागृहातील कर्मचा-यांनी शुक्रवारी अचानक तुरुंगांची पाहणी केली. यावेळी एका बॅरेकमध्ये पाहणी करण्यासाठी हे कर्मचारी गेले. पाहणी करताना या बॅरेकमधील शौचालयात त्यांना दोन पाण्याच्या ड्रममध्ये लोणच्याचे भांडं नजरेस पडले. लोणच्यासाठी वापरले जाणारे हे जार त्यांनी तपासणीसाठी उघडले असता त्यांना त्यात चक्क एक मोबाईल फोन आढळून आला. या बरोबरच एक इलेक्ट्रिक वायर, २५ ते ३० स्टील पिन, इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड आणि सीलंटची दोन पाकिटे त्यात ठेवले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे इतके सामान व मोबाईल फोन तुरुंगातील बॅरेकमध्ये कसे पोहोचले ? याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. यानंतर संबंधीत कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र या वस्तू कारागृहाच्या आत कशा पोहचल्या ? व त्या कशासाठी जमा करण्यात आल्या होत्या ? हे प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे.

यासंदर्भात खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा दाखल केल्याचे मान्य केले. परंतु याबाबतची अधिक माहिती आम्ही देऊ शकत नाही तुम्ही कंट्रोल रूममधून माहिती घ्या असे उत्तर दिले. तर वरिष्ठ अधिका-यांनीही आम्ही माहिती देऊ शकत नाही तुम्ही कारागृहाच्या अधिका-यांकडून माहिती घ्या असे सांगितले. तर जेल अधीक्षक ए. एस सदाफुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊनही इतक्या गंभीर विषयावर पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ का केली? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक पोलीस यंत्रणा काहीवेळेस गंभीर गुन्ह्यांबाबत वाच्यता करण्यास टाळाटाळ करताना दिसतात. मात्र ठाणे पोलीस डी सी आर मध्ये रजिस्टर गुन्ह्यांची रोज नोंद केली जाते आणि याच माहितीच्या आधारे आधारवाडी कारागृहातील प्रकार उघडीस आला आहे आणि प्रसिद्धी माध्यमात याचे वृत्त आले आहे. पाच वर्षांपूर्वीही याच कारागृहात मोबाईल सापडल्याचा प्रकार समोर आला होता.
-रोशन उबाळे