कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात घर काम करणाऱ्या एका महिलेच्या हत्येने आज सकाळी खळबळ उडाली होती. दगडाने ठेच्चून निर्घृणपणे या महिलेची हत्या करण्यात आली आहे. एखाद्या वैमनस्यातुन जसे एखाद्याची हत्या केली जाते त्याच प्रमाणात प्रचंड संतापातून ही हत्या केल्याचे दिसत आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून हत्येचा संशय महिलेच्या पतीवर आहे. सध्या खडकपाडा पोलिस या हत्येचा तपास करीत आहेत.
कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोडचे काम सुरु आहे. आज सकाळी १० च्या सुमारास या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना देण्यात आली. खडकपाडा पोलिस पथकासमवमवेत घटनास्थळी दाखल झाले. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते असे आहे. ही महिला त्याच परिसरात घर काम करणारी आहे. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण सध्या तो बेपत्ता आहे.

लक्ष्मीची हत्या मोठ्या निर्दयीपणे दगडाने ठेचून करण्यात आली आहे. ही घटना मुख्य उच्चभ्रू वस्तीत घडल्याने परिसरात या महिलेच्या हत्येने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि पंचनामा केला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी पोलीस पथक तपास करीत असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
-रोशन उबाळे
