मंगळवार दि.३१ ऑगस्ट रोजी कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला. हा मृतदेह कुणाचा आहे ? व त्याचा मृत्यू कसा झाला ? याबाबत पोलिसांकडे माहिती नव्हती. त्यामुळे ही हत्या असण्याची शक्यता वर्तवली जात होती. आणि त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू झाला. व आता या प्रकरणाचा यशस्वी शोध करण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात त्यांना मृतकाच्या गळ्यावर जखमा दिसल्या. त्याच्या अंगावर टेटू आढळला. टेटू आणि अंगावरील कपड्यांच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला. याचदरम्यान मृतकाच्या पत्नीने देखील जवळच्या पोलीस स्थानकात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळे मृतदेहाची ओळख पटली. आणि मृतकाबाबत अधिक माहिती पोलिसांकडे प्राप्त झाली. विठ्ठलवाडी पोलिसांनी आपली सूत्र हलवली. पोलिसांनी यासाठी तपास टीम तयार केली. मिसिंग दाखल झालेल्या ठिकाणा नुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. हा तपास सुरू झाला आणि अनेक गोष्टींचा उलगडा पोलिसांना होऊ लागला. आधी अपहरण व नंतर झालेल्या हत्येचा गुन्हा कसा घडला? याचा शोध सुरू झाला. मारेकरी हे लांबून आलेत याची माहिती पोलिसांच्या हाती मिळाल्यानंतर पोलिसांनी आपल्या टीम मार्फत २४ तासातच हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली.

दोघांना ताब्यात घेतल्या नंतर पुढील प्रकरण उजेडात येऊ लागले. मृतकाच्या पत्नीशी शेजारच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मृत पतीने त्या तरुणाशी वाद घातला होता. याच वादातून त्या तरुणाने मित्राच्या मदतीने वाद घालणाऱ्या तिच्या पतीचा वचपा काढायचे ठरवले. सुरुवातीला नवी मुंबई परिसरातून त्याचे अपहरण केले गेले. आणि नंतर त्याची कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात आणून हत्या केली. क्रूरपणे त्यांनी तो मृतदेह गावदेवी तलावात फेकला आणि तिथून पोबारा केला.
साजन मारुती कांबळे राहणार घणसोली नवी मुंबई आणि डिव्हाईन गोन्साल्विस राहणार वरळी कोळीवाडा, मुंबई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चंद्रकांत शेलार असे हत्या झालेल्या त्या इसमाचे नाव आहे. २४ तासातच अंगावरील टॅटू आणि कपडे यांच्या सहाय्याने तपास करीत विठ्ठलवाडी पोलिसांनी या मर्डर मिस्ट्रीचा शोध लावला. मात्र या घटनेसह अनेक तलाव आणि खदानी असुरक्षित झाल्यात हे देखील अधोरेखित झाले आहे.
-शरद शिंदे
