कल्याण : कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी मार्केट) इमारतीच्या छतावर असलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरसाठी फिडर पिलरमधून थेट वीजचोरी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यात टॉवरसाठी ८ लाख १९ हजार रुपये किंमतीची ५६ हजार १५० युनिट वीज चोरून वापरल्याबद्दल मे. सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वीजचोरी शोध मोहिमेत शिवाजी चौक शाखा एकचे सहायक अभियंता मोहम्मद आरिफ शब्बीर खान, कर्मचारी विलास गायकवाड यांच्या पथकाने ८ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सी टाइप इमारतीच्या छतावरील मोबाईल टॉवरच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. याठिकणी अधिकृत वीजजोडणी न घेता विनामीटर थेट वीजवापर होत असल्याचे आढळले. सुयोग टेलेमॅटिक्सने एअरटेल मोबाईल टॉवरसाठी काळ्या रंगाची ४० मीटर केबल वापरून फिडर पिलरमधून थेट व अनधिकृतपणे वीजचोरी केल्याचे तपासणीतून उघड झाले.
१८ मे पासून वीज चोरीचा हा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वीज चोरीचे देयक व दंड भरण्याबाबत सुयोग टेलेमॅटिक्सला नोटीस बजावण्यात आली. परंतु संबंधित रकमेचा भरणा न झाल्याने सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध सहायक अभियंता खान यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध वीजचोरी गुन्हा दाखल केला आहे.
-कुणाल म्हात्रे